Today gold and silver rates : सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त
सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे, सोनं स्वस्त झाल्यानं ग्राहकांची मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे. दुसरीकडे चांदीचे दर देखील कमी झाले आहेत.

किशोर पाटील, प्रतिनिधी : सोन्यामध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं सोन्याचे दर वाढतच होते, मात्र आता सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे दर हे एक लाखांच्या आत आले आहेत.
जळगावच्या सराफ बाजारात पाच दिवसांत सोन्याचे दर तब्बल 3 हजार 300 रुपयांनी घसरले आहेत. 1 लाखांचा आकडा पार केलेल्या सोन्याचे दर आता जीएसटीसह प्रति तोळा 98 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान दुसरीकडे विक्रमी उच्चांकीवर पोहोचलेल्या चांदीच्या दरात सुद्धा गेल्या पाच दिवसांत अडीच हजार रूपयांची घसरण झाली असून चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो 1 लाख 9 हजार रुपयांवर आले आहे.
महिन्याच्या अखेरीस सोन्याचे दर पुन्हा एक लाखाच्या आत आल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून जळगावच्या सराफा बाजारामध्ये जून महिन्यात सोन्या, चांदीच्या दरात मोठे चढ उतार पाहायला मिळाले.
जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दराने एक लाखांचा आकडा पार केला होता. मात्र आता जून महिना अखेर सोन्याचे दर पुन्हा एक लाखाच्या आत आले असून, ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांमधील युद्धामुळे जून महिना हा सोन्या-चांदीच्या दरासाठी मोठा परिणामकारक ठरल्याचं मत सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केलं आहे.
पुढील काळात इराण आणि इस्रायलमध्ये कोणताही संघर्ष झाला नाही, युद्धजन्य परिस्थिती नसेल, शांतता असेल तर सोन्याचे दर आणखी घसरतील, ते 91 हजार रुपयांपर्यंत येऊ शकतात, असा अंदाज सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.
तर दुसरीकडे महिनाभरापासून भाव कमी जास्त होत असल्याने, सेन्याची खरेदी करायची की नाही अशी मनाची द्विधा अवस्था असल्याची प्रतिक्रिया सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी दिली आहे. एक लाखांचा आकडा पार केलेले सोन्याचे दर पुन्हा कमी झाल्यामुळे आता, मार्केटमध्ये पुन्हा एकदा गर्दी वाढली आहे.
