मालकाच्या मृत्यूनंतरही पाळीव कुत्र्याने सोडली नाही साथ, राजगडावरील घटनेने पर्यटकांचे डोळे पाणावले !
राजगडावरील ही घटना एका पर्यटकाच्या मृत्यूची दुःखद बातमी असली, तरी ज्या मालकाने आयुष्यभर प्रेम दिले, त्याची साथ मृत्यूनंतरही या मुक्या जीवाने सोडली नाही. या स्वामीनिष्ठेने उपस्थित पर्यटकांचे मन हेलावून गेले. माणसांनाही न जमणारी निष्ठा एका मुक्या जीवाने आपल्या कृतीतून दाखवून दिली..

अगदी प्राचीन काळापासून मानवाचा मित्र म्हणून कुत्र्याकडे पाहिले जाते.मांजर, गाय, बैल, बकरी अशा पाळीव प्राण्यात इतर प्राण्यापेक्षा स्वामीनिष्ठ कुत्राच अधिक इमानदारी दाखवतो. आपल्या मालकाच्या चेहरा जरी पडलेला दिसला तरी हे मुके जनावर समजते की आपल्या मालकाचे काही तरी बिनसले आहे. अशा या कुत्र्यांच्या स्वामीनिष्ठतेची साक्ष पुन्हा एकदा थेट राजगडावर पाहायला मिळाली आहे. त्यामुळे गिर्यारोहकांना देखील गहीवरुन आलं…
शनिवारी, १० ऑक्टोबर रोजी किल्ले राजगडावर एक विलक्षण अनोखी गोष्ट घडली. राडगड पाहण्यासाठी आलेल्या जिज्ञेश सदाशिव खांडाळकर (वय ३०) या हौशी गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या सोबत त्यांचा पाळीव कुत्रा देखील होता. आपल्या मालकाला काहीतरी झाले आहे हे या मुक्या प्राण्याला समजले. त्यामुळे हा पाळीव कुत्रा शेवटपर्यंत मालकाच्या सोबत होता.
जिज्ञेश सदाशिव खांडाळकर हे राजगड पाहण्यासाठी आले होते. त्यांना गड चढल्यानंतर थकवा जाणवू लागला. गडावर त्यांना दरदरुन घाम आल्याने ते एका दगडावर बसले. काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडून त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह गडावरून खाली आणण्यात येत असताना त्यांचा पाळीव कुत्रा सतत सोबतच चालत राहिला. आपल्या लाडक्या मालकाला काय झाले आहे ?, याची जाणीव त्याला होती की नव्हती हे माहिती नाही. त्याला सोडून जाण्याची कल्पनाही जणू त्या मुक्या जीवाला मान्य नव्हती.तो आपल्या मृत झालेल्या मालकासोबत गडावरुन खाली उतरत होता.
