भवानी माता द्विभुजाची पाहिजे की अष्टभुजाची? धाराशिवमध्ये 108 फुटी शिल्पावरून राजकारण तापले
तुळजापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फुटाचे शिल्प साकारण्यावरून धाराशिव मध्ये राजकारण तापले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

धाराशीव जिल्ह्यातील श्री तुळजाभवानीच्या विकास आराखड्याला राज्य सरकारने नुकतीच मंजूरी दिली आहे, मात्र यानंतर लगेच वादाला तोंड फुटले आहे. आराखड्यातील महत्त्वाचे आकर्षण असलेले छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फुटाचे शिल्प साकारण्यावरून धाराशिव मध्ये राजकारण तापले आहे.
या शिल्पामध्ये भवानी तलवार छत्रपतींना देताना तुळजाभवानी अष्टभुजा की द्विभुजा असली पाहिजे यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्यामध्ये सुप्त संघर्ष असल्याचं दिसत आहे. नेमका तुळजाभवानीच्या साकारण्यात येणाऱ्या शिल्पावरून काय वाद आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
श्री तुळजाभवानीच्या 1865 कोटी रुपयाच्या प्रारूप विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मात्र भवानी माता द्विभुजाची पाहिजे की अष्टभुजाची? यावरून धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांच्यात संघर्ष आहे. या राजकीय वादामध्ये आता भाविक भक्तांच्या भावनांचा अनादर होताना दिसत आहे.
या विकास आराखड्याच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. श्री तुळजाभवानीची मूळ मूर्ती ही अष्टभुजा असून तिला वेगळा इतिहास आहे. तुळजाभवानीने महिषासुराचा वध केला तेव्हा महिषासुरमर्दिनीचे रूप घेतले होते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असल्याच्या अख्याइकेमध्ये तुळजाभवानी द्विभुज असल्याचे दिसत आहे.
धाराशिव चे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शिल्प साकारण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी लहानपणापासून पाहत आलोय छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देताना तुळजाभवानी द्विभुज असल्याचं दिसत आहे” असे म्हणत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी छत्रपतींना भवानी तलवार देताना तुळजाभवानी द्विभुज असली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. मात्र याला भाजपाचे आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांचा विरोध आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाच्या 108 फुटी शिल्पामध्ये तुळजाभवानी माता अष्टभुजा असली पाहिजे असे मत तुळजापुरातील पुजाऱ्यांनी व्यक्त केले आहे. आता भवानी मातेच्या 108 फुटी शिल्पावरून तापलेले राजकारण हे फक्त राजकारण नसून तुळजाभवानीच्या देशभरातील भक्तांच्या भावनेशी खेळ असल्याचे मत अनेक भक्तांनी व्यक्त केलं आहे.
