Maharashatra News Live : मंत्री रावल यांनी स्व. राजीव देशमुख यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

Maharashtra News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashatra News Live : मंत्री रावल यांनी स्व. राजीव देशमुख यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
breaking
| Edited By: | Updated on: Nov 02, 2025 | 7:08 PM

आज कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पंढरपूर येथे विठ्ठलाची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटे दूर व्हावी आणि महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर यावे, असे साकडे एकनाथ शिंदेंनी विठ्ठलाकडे घातले. या पूजेसाठी नांदेड जिल्ह्यातील रामराव व सुशिलाबाई वालेगावकर हे दांपत्य मानाचे वारकरी ठरले. दरम्यान, नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असून, लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी 6,42 कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर दुसरीकडे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज दुपारी अडीच वाजता कर्जमाफीच्या विषयावर महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. ज्यात ते बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच, फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी करमाळा येथे विविध संस्था व संघटनांनी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. यात डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी विशेष पथक (SIT) मार्फत व्हावी आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवावे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Nov 2025 06:59 PM (IST)

    बोरिवलीत खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन

    उत्तर मुंबईतील बोरिवली येथे खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, योगेश सागर, मनीषा चौधरी, संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाल शेट्टी यांच्यासह अनेक भाजप नेते उपस्थित आहेत.

  • 02 Nov 2025 06:49 PM (IST)

    धुळे शहरात आगीत हॉटेल भस्मसात

    धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील रामभरोसे हॉटेलला आग लागून त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नााही. सोलर पॅनलच्या ठिकाणी शॉक सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

  • 02 Nov 2025 06:38 PM (IST)

    मंत्री रावल यांनी स्व. राजीव देशमुख यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

    कॅबिनेट मंत्री जयकुमार रावल यांनी स्वर्गीय राजीव देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले आहे.काही दिवसापूर्वी स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते.

  • 02 Nov 2025 06:15 PM (IST)

    बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यूने ग्रामस्थ संतप्त

     

    बेल्हा जेजुरी महामार्ग रोखण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह घरासमोर ठेवुन आंदोलन करण्याचा निर्णय.रात्री बेल्हा जेजुरी महामार्ग रोखण्यावर ग्रामस्थ ठाम असल्याने पोलिस त्यांची समजूत काढत आहेत.

  • 02 Nov 2025 05:55 PM (IST)

    अनेक लोक गावात आणि शहरात दोन्हीकडे मतदान करतात – संजय गायकवाड

     

    आमदार संजय गायकवाड यांनी मतदार यादीत दुरूस्ती करण्याची मागणी केली आहे, त्यांनी म्हटले की, मी मागणी केली होती की मागील 20 वर्षांपासून अनेकांची नावे ही मतदार यादीत दोन दोन वेळा आहे. ते लोक गावात आणि शहरामध्ये ही मतदान करतात. ती नाव काढल्या जावीत. निवडणूक आयोग ही नावं का काढत नाही? आम्हाला याचा फटका बसला, कारण ही नाव काँग्रेसला मतदान करणारी आहेत. सरकारने याची दखल घेऊन ही नाव एका फटक्यात मोकळी केली पाहिजेत.

  • 02 Nov 2025 05:40 PM (IST)

    परभणी: तीन प्रमुख रस्त्यांच्या कामाला अखेर सुरुवात सुरुवात

     

    परभणी महानगरपालिका हद्दीतील तीन प्रमुख रस्त्यांचे काम महाविकास आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांनी मंजूर केली होती. मात्र अनेक वर्ष उलटूनही या प्रमुख रस्त्यांची कामे होत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून परभणीकरांनी सुटकेचा विश्वास सोडलाय.

     

  • 02 Nov 2025 05:26 PM (IST)

    शिरूर: पिंपरखेड येथे तेरा वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

    पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात आज दुपारी तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या मुलावर घरा जवळ खेळत असताना शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या घातक हल्ल्यात रोहणचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.

  • 02 Nov 2025 05:15 PM (IST)

    पंजाब मध्ये उभारले जाणार महाराष्ट्र सदन

     

    पंजाब मध्ये महाराष्ट्र सदन उभारले जाणार आहे. अडीच एकर परिसरात भव्यदिव्य महाराष्ट्र सदन उभारले जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते थोड्याच वेळात भूमीपूजन होणार आहे. घुमान मधील महाराष्ट्र सदनमुळे मराठी लोकांना हक्काचं ठिकाण मिळणार आहे.

  • 02 Nov 2025 04:59 PM (IST)

    कर्जमाफी झाली नाही, तर भाजपला मत देऊ नका – कडू

     

    बच्चू कडू म्हणाले की, आजही एकनाथ शिंदे म्हणाले की कर्जमाफी होणार. आमच्या आंदोलनाने कर्जमाफीची तारीख मिळाली. सगळे शेतकरी नेते होते. सगळ्यांवर आरोप करायला निघाले. घरून बसल्या बसल्या आरोप करणं सोपं आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होणार याला तारीख नाही म्हणायचं का? हंगामा होईल 30 जून नंतर जर कर्जमाफी नाही झाली तर… जर कर्जमाफी झाली नाही तर भाजपला निवडणुकीत मत देऊ नका.

  • 02 Nov 2025 04:45 PM (IST)

    बुलढाणा: अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त, मात्र मंत्री नागरी सत्कारात व्यस्त

     

    सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बुलढाण्यात त्यांचा आमदार संजय गायकवाड यांच्याकडून स्थानिक गर्दे हॉल येथे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात जवळपास वीस गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेल असताना मंत्री मात्र नागरि सत्कारात व्यस्त असल्याचे चित्र समोर आले आहे.

  • 02 Nov 2025 04:31 PM (IST)

    शिरूर तालुक्यातील शेतकरी उद्ध्वस्त, झेंडू, काकडीचे पीक नष्ट

    पुणे –  शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील शेतकरी सुनील सोनवणे यांची फ्लॉवर शेती पूर्णपणे अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झाली आहे. त्यासोबत झेंडू व काकडीचे पीक देखील मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
  • 02 Nov 2025 04:08 PM (IST)

    बुलढाणा जिल्ह्यात तुफान पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

    बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडला आहे. 1 ऑक्टोबरच्या रात्री हा पाऊस झाला. रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे ढंगारपूर शिवारातील शेतकऱ्यांचं
    मोठं नुकसान झालं आहे. हातात आलेलं पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजाची
    चिंता वाढली आहे.
  • 02 Nov 2025 03:21 PM (IST)

    भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं झोडपून काढलं, शेतकऱ्यांचे नुकसान

    27 ते 31 ऑक्टोंबर दरम्यान भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं झोडपून काढलं. हातातोंडाशी आलेल्या भातपिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक नजर अंदाज अहवाल समोर आला असून यात जिल्ह्यातील 474 गावातील सुमारे 43 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. 18 हजार हेक्टर क्षेत्रातील भातपीक आणि भाजीपाला पिकांना याचा चांगलाचं फटका बसला आहे. भंडारा जिल्हा प्रशासनानं नुकसानग्रस्त शेतीचे तातडीनं पंचनामे करायला सुरुवात केली असून अंतिम अहवाल राज्य सरकारकडे तातडीनं पाठविण्यात येणार आहे. परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका साकोली तालुक्याला बसला असून 25,730 शेतकऱ्यांच्या 9 हजार हेक्टरमधील भातपीक आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं आहे….
  • 02 Nov 2025 02:56 PM (IST)

    नालासोपारा: मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात

    नालासोपारा मुंबई अहमदाबाद महामार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघातात रिक्षातील पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला तर, महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामूळे अपघाताच्या घटना वाढत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

  • 02 Nov 2025 02:41 PM (IST)

    भारत आणि आफ्रिकामध्ये महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रंगणार

    आज महिला वर्ल्डकपचा अंतिम सामना आज होणार आहे. महिला विश्वचषकाचा सामना आज भारत आणि आफ्रिकामध्ये होणार आहे. नवी मुंबईत थोड्याच वेळात महामुकाबला रंगणार आहे. सर्वांची उत्सुकता वाढली आहे.

  • 02 Nov 2025 02:34 PM (IST)

    थोड्याच वेळात विश्वचषकाच्या फायनलचा थरार

    थोड्याच वेळात विश्वचषकाच्या फायनलचा थरार सुरु होणार आहे. नवी मुंबईत थोड्याच वेळात महामुकाबला रंगणार आहे. क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार आहे.

     

  • 02 Nov 2025 02:11 PM (IST)

    महापालिकेत आमचा महापौर होऊ देत : उद्धव ठाकरेंचं गाऱ्हाणं

    ‘महापालिकेत आमचा महापौर होऊ देत’, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी गाऱ्हाणं घातलं आहे. संघर्ष म्हटलं की मराठी माणूस मागे हटत नाही असही त्यांनी म्हटलं आहे.

  • 02 Nov 2025 01:55 PM (IST)

    भारतीय महिला क्रिकेटसंघ जिंकल्यावर किती पैसे मिळणार?

    महिला वनडे वर्ल्ड कप 2025 जिंकणाऱ्या संघाला 4.48 मिलियन डॉलर बक्षिसाची रक्कम मिळेल. ही रक्कमभारतीय चलनात सुमारे 40 कोटी रुपये आहे.

  • 02 Nov 2025 01:42 PM (IST)

    मोताळा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार पीक उद्धवस्त

    काल रात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात मुसळधार पावसाचा हाहाकार बघायला मिळाला. रात्री सुद्धा मोताळा तालुक्यातील किन्होळा, धामणगाव बढे या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मक्याची शेती पूर्णतः उध्वस्त झाली आहे. शेकडो हेक्टर शेतीत अद्यापही फूटभर पाणी साचून असल्याने शेतकऱ्याने कापून ठेवलेला मका भिजला आहे. तर अनेक ठिकाणी मक्याला अंकुर फुटले आहेत. सोयाबीन गंजी, कापसाचे नुकसान झाले आहे.

  • 02 Nov 2025 01:41 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळणार 5328 रुपये प्रति क्विंटल भाव

    शेतकऱ्याच्या सोयाबीनला आधारभूत किंमत मिळावी म्हणून राज्य सरकारकडून आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी शेतकऱ्याची नाव नोंदणी धाराशिवच्या खरेदी विक्री सहकारी संघात सुरू झाली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्याच्या सोयाबीनला प्रत्येक क्विंटल ५३२८ रुपये आधारभूत किंमत मिळणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी गर्दी केली असून धाराशिवमध्ये 100 पेक्षा जास्त शेतकऱ्याचीं नोंदणी झाली आहे.

  • 02 Nov 2025 01:10 PM (IST)

    मुंबई अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात

    मुंबई अहमदाबाद महामार्गावर नालासोपारा पेल्हार हद्दीत ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. रिक्षाचालक पेल्हार पेट्रोल पंपा जवळ वळण घेताना गुजरातच्या दिशेला जाणाऱ्या ट्रकने उडविले आहे. यात रिक्षातील पिता पुत्राचा जागीच मृत्यू झाला असून, रिक्षाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे.

  • 02 Nov 2025 12:59 PM (IST)

    गणेश काळे हत्येप्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल

    गणेश काळे हत्येप्रकरणी बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. टोळी युद्धातूनच गणेश काळे याची हत्या झाली होती. गुन्ह्यातील आरोपी बंडू आंदेकर,कृष्णा आंदेकर,आमिर खान ,मयूर वाघमारे ,स्वराज वाडेकर ,अमन शेख ,अरबाज पटेल, इतर दोन अल्पवयीन आरोपींची गुन्ह्यात नावे आहेत.

     

  • 02 Nov 2025 12:49 PM (IST)

    आमदार संदीप जोशी राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी पोहोचले

    ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या कार्यकारणीचे सचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर १३ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणारे आमदार संदीप जोशी बैठकीसाठी पोहोचले आहेत. संदीप जोशी यांनी सचिव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल असून देखील क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे त्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप केला होता.

    शनिवार रात्रीपासून अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्या गटात मनोमिलनाचे वारे वाहू लागल्यानंतर आता संदीप जोशी देखील मंत्री दत्ता भरणे यांच्या बंगल्यावर सुरू असलेल्या बैठकीला पोहोचले.

  • 02 Nov 2025 12:36 PM (IST)

    राजकीय अस्तित्त्व संपलं म्हणून ठाकरे बंधूंना मराठी माणसाचा पुळका- प्रविण दरेकर

    “मराठी माणसांची ठाकरेंनी फसवणूक केली. त्यांनी मराठी माणसासाठी केलेल्या चार ठोस गोष्ठी दाखवा. राजकीय अस्तित्त्व संपलं म्हणून त्यांना मराठी माणसाचा इतका पुळका आलाय. उलट राज्य सरकार मराठी माणसासाठी प्रयत्न करत आहे,” असं प्रविण दरेकर म्हणाले.

  • 02 Nov 2025 12:21 PM (IST)

    मालेगावात लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी अन् गोळीबार

    मालेगाव- लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये हाणामारी आणि गोळीबाराचा थरार पहायला मिळाला. मुख्य आरोपी मेहताब अली उर्फ मेहताब दादाने दोन्ही हातात पिस्तूल घेत फिर्यादी लईक अहमद याच्यावर दोन फायर केले. सुदैवाने या हल्ल्यात तो थोडक्यात बचावला.

    १० ते १२ जणांनी मिळून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतकंच नव्हेत घरात घुसून तोडफोड केली आणि तलवारीने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मुख्य आरोपी मेहताब अलीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 02 Nov 2025 12:11 PM (IST)

    अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक

    अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक आहे. मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वचर्चेसाठी बैठक असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत सर्व मतदारांसोबत मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी बैठकीला सुरुवात झाली.

  • 02 Nov 2025 11:58 AM (IST)

    20 टक्के कमिशन हे परिणय फुके यांचे बालिशपणाचे वक्तव्य….

    भंडारा जिल्ह्याची कोणताही संबंध नसता वारंवार भंडारा जिल्ह्यात परिणय फुके यांच्या हस्तक्षेप …आमदार भोंडेकर यांचा आरोप… परीने फुके यांच्यामुळेच भंडारा आणि पवनी नगर परिषदेच्या विकास थांबला… पालकमंत्री परिणय फुके यांच्या ऐकत असतील तर हे अत्यंत गंभीर…

  • 02 Nov 2025 11:50 AM (IST)

    कोल्हार – घोटी महामार्गावर शेतक-यांचा रास्ता रोको…

    अकोले तालुक्यातील कळस येथे दिड तास रास्ता रोको… उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शेतकरी संतप्त…. सारखं सारखं फुकट, सारखं सारखं माफ कशाला हवं…  अजीत पवारांच्या विधानामुळे शेतक-यांमध्ये संतापाची लाट…

  • 02 Nov 2025 11:28 AM (IST)

    मजुरांचा केळी वाहतूक करणारा ट्रक उलटला

    जळगावच्या रसोदा, हिंगुणा जवळील घटना तब्बल 13 केळी वाहतूक करणारे मजूर जखमी झाले आहेत… चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे… जखमींना तातडीने ग्रामस्थांनी उपचारासाठी  अर्थ रुग्णालयात दाखल केले आहे….

  • 02 Nov 2025 11:18 AM (IST)

    नाशिकमध्ये पुन्हा सायबर फसवणुकीची घटना उघडकीस

    सेवानिवृत्त ५८ वर्षीय महिलेला ऑनलाइन शेअर मार्केट गुंतवणुकीचे आमिष… नफ्याचे आश्वासन देत महिलेकडून तब्बल ₹2 कोटी 24 लाख 23 हजारांची फसवणूक… संशयितांनी ऑनलाइन व्यवहाराद्वारे रक्कम वेगवेगळ्या खात्यांत वर्ग केली… नफा न मिळाल्याने महिलेला फसवणुकीचा संशय, सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल… पोलिसांकडून तपास सुरू; सायबर गुन्हेगारांचा शोध सुरू… ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी न पडण्याचं नागरिकांना आवाहन.

  • 02 Nov 2025 10:55 AM (IST)

    गंगापूर तालुक्यातील काही गावांना पुन्हा पावसाने झोडपले

    गंगापूर तालुक्यातील सायगाव, गोपालवाडी, वाघलगाव, शंकरपूर आणि काटे पिंपळगाव या भागात जोरदार पाऊस झाल्याने अनेक शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे कापसासह इतर पिके पाण्याखाली गेली आणि त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..

  • 02 Nov 2025 10:50 AM (IST)

    पहाटे आरती साठी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले

    तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी गळ्यातील मनी गंठण आणि कानातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावले. महिलेला मारहाण करत चोरट्यांनी चोरी करत महिलेला ढकलले, घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद. अज्ञात आरोपींविरोधात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे

  • 02 Nov 2025 10:40 AM (IST)

    पिंपरी-चिंचवडमध्ये प्रियकराचा प्रेयसीवर चॉपर हल्ला, 18 वर्षीय तरुणी गंभीर

    पिंपरी-चिंचवड परिसरात प्रेमसंबंधातून संशय बळावल्याने एका प्रियकराने मित्रांच्या मदतीने आपल्या 18 वर्षीय प्रेयसीवर चॉपरने जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीररित्या जखमी झाली असून, तिच्यावर हिंजवडीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 02 Nov 2025 10:30 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे मधील घटना

    अमरावतीत पोलिसांच्या मारहाणीत एका आरोपीच्या मृत्यूप्रकरणी ठाणेदारांसह ९ पोलीस कर्मचाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल. पोलीस रखवालीत मृतकास झाल्या होत्या जखमा. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला होता आरोपीचा मृत्यू. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसात गुन्हा दाखल…

     

  • 02 Nov 2025 10:20 AM (IST)

    वाहन चालकाचा वाहनवरील नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकला धडकून अपघात

    ठाण्याहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या कॅडबरी उड्डाणपुलावर मध्यरात्री कंटेनर चा अपघात.. नितीन कंपनी ते कॅडबरी उड्डाणपुल वाहतुकीसाठी काही वेळ बंद करण्यात आले होते. पर्यायी मार्ग म्हणून उड्डाण पुलाच्या खालून प्रवास सुरू आहे.

  • 02 Nov 2025 10:09 AM (IST)

    शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची फटकेबाजी

    माझ्या आयुष्यातली ही सर्वात कठीण सभा आहे. कारण मी राज्याचा मंत्री एका पक्षाचा नेता जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, एका आमदाराचा काका आहे. अशा चार-पाच अडचणीत मी या सभेत उभा आहे. दुसरीकडे सर्व पत्रकार उभे आहेत की, गुलाबराव पाटलांची नेमकी भूमिका काय आहे?

  • 02 Nov 2025 10:00 AM (IST)

    बीडमध्ये जागेच्या वादातून क्रूर प्रकार, केजमध्ये 10-12 महिलांकडून घर तोडून कुटुंबाला बेदम मारहाण

    बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट येथे जागेच्या वादातून एक गंभीर घटना उघडकीस आली आहे. सुमारे 10 ते 12 महिलांच्या टोळक्याने जयश्री दळवी यांच्या कुटुंबाला घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत बेदम मारहाण केली. या हल्लेखोर महिलांनी घरातील साहित्यांचीही तोडफोड केली. एवढेच नाही, तर दळवी कुटुंबाला घराबाहेर काढत त्यांच्याकडील रोख रक्कम आणि काही सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या क्रूर प्रकाराबद्दल दळवी कुटुंबाने पोलीस अधीक्षक आणि केज पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.

  • 02 Nov 2025 09:54 AM (IST)

    नाशिक सिंहस्थ कुंभमेळा, 6,042 कोटींच्या 55 कामांचे आचारसंहितेपूर्वी उद्घाटन

    नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच, कुंभमेळ्याशी संबंधित 55 कामांचा बार उडणार आहे. या कामांसाठी एकूण 6,042 कोटी रुपयांच्या खर्चाला प्रारंभ होणार आहे. कुंभमेळा प्राधिकरणाकडून या संबंधित कामांची यादी तयार करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी सिंहस्थ कामांचे उद्घाटन व भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

  • 02 Nov 2025 09:43 AM (IST)

    महाडीबीटीमुळे दिव्यांग लाभार्थी अनुदानापासून वंचित

    महाडीबीटीमुळे दिव्यांग लाभार्थी अनुदानापासून वंचितधाराशिव जिल्ह्यात महाडीबीटी (MahaDBT) प्रणालीमुळे 80% पेक्षा अधिक दिव्यांग लाभार्थी गेल्या एक वर्षापासून त्यांच्या अनुदानापासून वंचित आहेत. जिल्ह्यामध्ये असे 113 दिव्यांग लाभार्थी आहेत, तर संपूर्ण महाराष्ट्रात ही संख्या मोठी आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून या दिव्यांगांना महिन्याकाठी 1,500 रुपये अनुदान मिळते. परंतु, डिसेंबर 2024 मध्ये महाडीबीटी प्रणाली सुरू झाल्यापासून या लाभार्थ्यांचे आधार अपडेट होत नसल्यामुळे त्यांना अनुदान मिळू शकलेले नाही. आधार अपडेट न झाल्यामुळे हे दिव्यांग लाभार्थी सध्या अनुदानापासून वंचित आहेत.

  • 02 Nov 2025 09:31 AM (IST)

    बच्चू कडूंची आज अमरावतीत पत्रकार परिषद, कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलणार

    अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू आज, दुपारी अडीच वाजता अमरावती येथे कर्जमाफीच्या विषयावर महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. बँकेअंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ते काही महत्त्वपूर्ण घोषणा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 02 Nov 2025 09:22 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिरातील अभिषेक हॉल पाडकामाच्या मार्गावर, पुजाऱ्यांकडून पर्यायी व्यवस्थेची मागणी

    धाराशिव येथील श्री तुळजाभवानी मंदिराच्या 58 कोटी रुपयांच्या जतन व संवर्धन कामांतर्गत छत्रपती संभाजीनगरच्या पुरातत्त्व विभागाने मंदिर संस्थांनला 40 वर्षांपूर्वी बांधलेल्या तीन मजली अभिषेक हॉलचे पाडकाम करण्याबाबत पत्र दिले आहे. 3 नोव्हेंबर रोजी सवानी कन्स्ट्रक्शन हॉल पाडकामासाठी ताब्यात घेणार आहे. मात्र, देशभरातील भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाडकाम करण्यापूर्वी अभिषेकसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पुजारी वर्गाने केली आहे. तसेच, मंदिराच्या मुख्य शिखराच्या कामाबद्दल पुजाऱ्यांनी आधीच आक्षेप घेतला असून, मुख्य गाभाऱ्याच्या कामासाठी केंद्राच्या पुरातत्त्व विभागाचा अंतिम अहवाल येणे बाकी आहे.

  • 02 Nov 2025 09:17 AM (IST)

    राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, उदय सांगळे यांचा भाजपामध्ये प्रवेश

    नाशिकमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते उदय सांगळे हे उद्या भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये प्रवेश करणार आहेत. सांगळे यांनी मागील निवडणुकीत सिन्नर मतदारसंघातून मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा हा प्रवेश सिन्नरमध्ये भाजपची ताकद वाढवण्याचा प्रयत्न म्हणून पाहिला जात आहे. हा प्रवेश मंत्री रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे यांनी

  • 02 Nov 2025 09:11 AM (IST)

    कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरात भक्तीचा महापूर, चंद्रभागेत सात लाख भाविकांचे स्नान

    कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूर नगरी वारकऱ्यांनी फुलून गेली असून, जवळपास सात लाख भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या चंद्रभागा नदीत पहाटेपासूनच पवित्र स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी उसळली आहे. चंद्रभागेच्या काठी ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’चा जयघोष करत वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करत आहेत, ज्यामुळे सध्या नदीकिनारी भक्तीचा महापूर आल्याचे आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

  • 02 Nov 2025 09:04 AM (IST)

    कार्तिक एकादशी निमित्त पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

    कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आज पंढरपुरात पहाटे विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील रामराव आणि सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याला उपमुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठलाची महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे यंदा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2 विद्यार्थ्यांनाही पूजा करण्याचा मान यंदा प्रथमच देण्यात आला. विशेष म्हणजे आषाढी नंतर कार्तिकी अशा दोन्ही एकादशीला महापूजा करणारे एकनाथ शिंदे हे मानकरी ठरले आहेत. शिंदे यांनी आपला मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा केली.