Mumbai, Maharashtra Rains News LIVE : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

Mumbai, Maharashtra Rains News LIVE Updates in Marathi: देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Mumbai, Maharashtra Rains News LIVE : मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 8:44 AM

सोशल माध्यमावर पोस्ट करत जातीय तेढ निर्माण केल्या प्रकरणात बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले याच्यावर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात कासलेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने हा अर्ज फेटाळला आहे.वादग्रस्त पोलिस अधिकारी रणजित कासलेने सोशल माध्यमावर व्हिडिओ पोस्ट करत जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. कृष्णा खोऱ्यातील कामांचे 1,300 कोटी रुपये रखडले. राज्य सरकारकडून कृष्णा खोरे विकास महामंडळाला धरणांची दुरुस्ती, कालव्यांची कामे तसेच अन्य कारणांसाठी मिळणारा 1 हजार 300 कोटींचा बिलांपोटीचा निधी गेल्या चार महिन्यांपासून रखडवून ठेवला आहे. परिणामी कामे रखडली असून कंत्राटदार हवालदिल. उर्वरित कामे कशी करायची, अधिकाऱ्यांसमोर प्रश्न.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Jul 2025 06:55 PM (IST)

    ठाणे: जुना कोपरी पुल आठ दिवस बंद राहणार

     

    ठाणे पूर्वेतील सॅटिस प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी रेल्वेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे जुना कोपरी पुल आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 26 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत जुन्या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

  • 25 Jul 2025 06:46 PM (IST)

    डोंबिवली: खराब पाण्यात केळी धूत फळांची विक्री, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

    डोंबिवली पश्चिमेतील गोकुळ बंगल्याजवळील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे खराब पाण्यात केळी धुत फळांची विक्री सुरु असल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आता या फळ विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

  • 25 Jul 2025 06:32 PM (IST)

    मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे उघडले

    गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजचे 15 दरवाजे 3 मीटरने उघडण्यात आले आहेत. सध्या धरणातून 1 लक्ष 40 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच पुजारीटोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले असून तिथूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  • 25 Jul 2025 06:18 PM (IST)

    नाशिक-मुंबई महामार्गावर विचित्र अपघात, 4 जण जखमी

    नाशिक-मुंबई महामार्गावर ओहोळाचीवाडी जवळ तीन गाड्यांच्या विचित्र अपघात झाला आहे. यात चार जण जखमी झाले आहे. पुढे जाणाऱ्या ट्रकवर पाठीमागून पीकअप जाऊन धडकला, त्यानंतर पिकअपवर स्विफ्ट कार येऊन धडकली, त्यामुळे हा अपघात झाला. सध्या कसारा येथे जखमींवर उपचार सुरु आहेत.

  • 25 Jul 2025 06:04 PM (IST)

    बदलापूरच्या बारवी धरणात 81 टक्के जलसाठा

    बदलापूरच्या बारवी धरणात 81 टक्के जलसाठा

    जुलै महिन्यात धरणक्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

    पावसामुळे धरणाच्या पाणीपातळी वाढ

    बारवी धरणाची पाणीपातळी 81 टक्क्यांवर

     

     

  • 25 Jul 2025 05:38 PM (IST)

    ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

    ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे गोकुळ साखर कारखान्याच्या चिमणीवर चढून आंदोलन

    सोलापुरात थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक

    गोकुळ साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बील दिले नसल्याने शेतकऱ्यांचे चिमणीवर चढत आंदोलन

    चालू आणि मागील वर्षीचे बिल न भेटल्यानं शेतकरी आक्रमक

    -जोपर्यंत उसाचे बिल अदा करणार नाही, तोपर्यंत खाली न उतरण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार

  • 25 Jul 2025 05:07 PM (IST)

    AI चा वापर करून सोलापुरात एकाच दिवशी 3 अतिजटिल हृदय शस्त्रक्रिया यशस्वी

    -सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय.  सोलापुरातील ए.सी.एस हॉस्पिटलचे डॉ. प्रमोद पवार यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.  हृदयरोगावरील शस्त्रक्रियेत अत्यंत जटिल समजल्या जाणाऱ्या आयव्हस, रोटा अब्लेशन, बायफरगेशन एन्जोप्लास्टी, इंट्रावॅस्क्युलर लिथो ट्रिप्सी, अल्ट्रा लो कॉन्ट्रास आदी पद्धतींच्या शस्त्रक्रियेत AI चा वापर करण्यात आलाय.

  • 25 Jul 2025 04:37 PM (IST)

    ‘युनेस्कोच्या जागतिक यादीतील 12 किल्ल्यांचा मास्टर प्लान तयार करण्याची गरज’

    ‘युनेस्कोच्या जागतिक यादीत समाविष्ट झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांबाबत आता मास्टर प्लान करून त्यांचे योग्य संवर्धन आणि जतन करण्याची गरज आहे. त्यांचे नियोजन होणे गरजेचे आहे. रायगड जिल्हा हा एकमेव असा किल्ला आहे ज्याचं शास्त्रोक्त पद्धतीने जतन आणि संवर्धन सुरू आहे. म्हणून रायगड मॉडेल प्रमाणे नवीन डी पी आर तयार करून रायगड मॉडेल प्रमाणे बाकीच्या किल्ल्यांचे जतन करावे लागेल.अस केलं नाही तर युनेस्को या जागतिक वारसा स्थळाच्या यादीतील ही गडकिल्ले पुन्हा रद्द करू शकते,’ असं मत रायगड प्राधिकरण विभागाचे अध्यक्ष आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी महाड येथे व्यक्त केलं.

  • 25 Jul 2025 04:26 PM (IST)

    शेतात पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने 30 वर्षीय महिलेचा मृत्यू

    शेतात पडलेल्या विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या दहिगावा रेचा येथील महीलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वीज वितरण कार्यालयात महीलेच्या नातेवाईकांनी मृतदेह आणला. यावेळी शेकडो नागरीक वीज वितरण कार्यालायात दाखल झाले. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्ण झालं होतं. मृत महिलेचे नाव रूपाली शुद्धधन सावळे असून त्यांना 15 वर्षाचा मुलगा व बारा वर्षाची मुलगी आहे.

  • 25 Jul 2025 04:09 PM (IST)

    नांदेड ग्रामीण पोलिसांची वाळू माफियांवर कारवाई

    नांदेड ग्रामीण पोलिसांनी वाळू माफियांवर कारवाई केली आहे. यात 21 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  पोलिसांनी वाळू उपसा करणारे तराफे जाळून नष्ट केले आहेत.  गोदावरी नदीपात्राच्या पाण्यात उड्या मारून पोलिसांनी कारवाई केली. आठ आरोपीविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 25 Jul 2025 03:59 PM (IST)

    राज्यातील 6 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट

    रायगड, रत्नागिरी, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात तसेच पुणे घाट आणि सातारा घाट या भागात आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. या बाबतची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे. त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 25 जुलैला संध्याकाळी साडे पाचपासून ते 27 जुलैला रात्री 8.30 वाजेपर्यंत 4.1 ते 4.8 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

  • 25 Jul 2025 03:52 PM (IST)

    कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिरपूरात आंदोलन

    कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिरपूरात आंदोलन केलं गेलं. कोकाटे यांच्या विरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या. पोलिसांनी महिला आंदोलकासह इतर आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

  • 25 Jul 2025 03:31 PM (IST)

    मनसेचं दहिसर टोल नाका परिसरात खड्ड्यांवर अनोखं आंदोलन

    मनसेकडून दहिसर टोल नाका परिसरात खड्ड्यांवर अनोखं आंदोलन केलं जात आहे. मनसेकडून रस्त्यावरील खड्ड्यांत जाळं टाकून गाजर, लॉलीपॉप, केळी पकडण्याचा प्रयत्न करुन प्रशासनाचा निषेध केला जात आहे.खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाला जाग आणण्यासाठी मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे. सम्राट हॉटेलजवळ मनसे कार्यकर्त्यांकडून वेगळ्या पद्धतीने निषेध आंदोलन केलं जात आहे.

  • 25 Jul 2025 03:11 PM (IST)

    नाशकात पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती

    पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिराला गळती लागली आहे. पावसामुळे मंदिरात अनेक ठिकाणी पाणी झिरपले. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. संस्थांकडून पुरातत्व विभागाला याबाबत अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आला आहे. मात्र मात्र पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत आल्याने मंदिराला दोन वर्षांपासून गळती लागल्याचं म्हटलं जात आहे. मंदिर प्रशासनाकडून 23 ऑक्टोबर 2023 रोजी पुरातत्व विभागाला पहिले पत्र दिले गेले होते. मात्र त्यानंतर देखील मंदिराचे सभामंडप, गाभारा आणि कळसातून पाण्याची गळती सुरुच आहे.

  • 25 Jul 2025 03:07 PM (IST)

    अजित पवार आणि विजय घाडगे यांची बैठक सुरु

    पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छावा संघटनेचे विजय घाडगे यांच्यात सर्किट हाऊसमध्ये बैठक सुरु आहे. सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर विजय घाडगे अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. गेल्या अर्धा तासापासून ही बैठक सुरु आहे. दरम्यान सर्किट हाऊसबाहेर मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

  • 25 Jul 2025 03:00 PM (IST)

    मुंबईत तीन दिवस जोरदार पाऊस, उद्या मोठी भरती

    मुंबईत तीन दिवस असाच पाऊस कोसळणार आहे.समुद्राला २६ जुलै रोजी सर्वात मोठी भरती येणार असून ४.६७ मीटर इतक्या उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

  • 25 Jul 2025 02:56 PM (IST)

    पुढील ३ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगरात जोरदार पाऊसाचा अंदाज

    पुढील ३ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. नागरिकांनी सर्तक राहावे

  • 25 Jul 2025 02:39 PM (IST)

    विजयकुमार घाडगे यांनी अजित पवार यांच्या भेटीला

    विजयकुमार घाडगे यांनी अजित पवार यांच्या भेटीसाठी निघाले आहेत. घाडगे यांच्या अटी आणि शर्ती अजित पवाराच्या टीमने मान्य केल्या आहेत. ऑडिओ व्हिडिओची क्लिप माध्यमांना देण्याची अजित पवार यांच्या टीमची मान्यता दिली आहे. अटी आणि शर्ती टाकल्याने विजयकुमार घाडगे हे आक्रमक झाले होते. घाडगे आता व्हीआयपी रेस्ट हाऊसला अजित पवार यांची भेट घेण्यासाठी निघाले आहेत.

  • 25 Jul 2025 02:35 PM (IST)

    पावसाने अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली

    मुसळधार पावसानंतर, अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली गेला आहे.अंधेरी सबवे आज पुन्हा तिसऱ्यांदा बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • 25 Jul 2025 02:33 PM (IST)

    येवल्यातील रस्तारोको आंदोलन स्थगित

    गेल्या तीन ते साडेतीन तासांपासून सुरु असलेला रस्ता रोको आंदोलन स्थगित झाला आहे. आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते विस्थापित गाळेधारकांचे रस्ता रोको आंदोलन सुरु होते.

  • 25 Jul 2025 01:45 PM (IST)

    वडगाव काशीबेगमध्ये बिबट्याचा थरार!

    वडगाव काशीबेगमध्ये कालवडीवर झडप घालण्यासाठी आलेल्या बिबट्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याच वेळी शेतकरी झोपेतून जागा झाला आणि बिबट्याचा बेत फसला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

  • 25 Jul 2025 01:30 PM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जेवणात सापडल्या आळ्या

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यापिठाच्या जेवणात आळ्या सापडल्या आहेत. 22 जुलै रोजी कॅन्टीनच्या जेवणात आळ्या आढळल्याचा आरोप विद्यार्थांनी केला आहे. वारंवार हा प्रकार घडत असून विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

  • 25 Jul 2025 01:16 PM (IST)

    हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमासची गळचेपी; संदीप देशपांडे संतापले

    हिंदी सिनेमासाठी मराठी सिनेमासची गळचेपी होत आहे हे दिसून येत आहे. अमेय खोपकर यांचा ये रे ये रे पैसा ३ सिनेमाचे शो काढून यशराज फिल्म्सच्या सैयारा या सिनेमाला देण्यात येत आहे हे दिसून येत आहे. आम्ही आताच त्यांना सांगतो आहे की ही गोष्ट आम्ही चालू देणार नाही. अमेय खोपकर यांची निर्मित असलेला सिनेमावर अशी गोष्ट होणं हे वाईट आहे असे संदीप देशपांडे म्हणाले.

  • 25 Jul 2025 12:57 PM (IST)

    साठेबाजांविरोधात कारवाई करणार

    या भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. दुबार पेरणीचे संकट येतं की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे? परिस्थिती उद्भवली बी बियाणं खाते देण्यासाठी सरकार कटीबद्ध राहील.. वेळेवर शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे यासाठी आम्ही तयार आहोत. या ठिकाणी युरिया आणि बियाणे भेटत नाही अशी तक्रार आहे. कृषी खात्याने छापेमारी करावी आणि शेतकऱ्यांना बी बियाणे आलेली खते प्राप्त झाली पाहिजे. याबाबत जिल्हाधिकारी शी बोलणार आहे. साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी कोणालाही पाठीशी घालणार नाही अशी भूमिका कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केली.

  • 25 Jul 2025 12:50 PM (IST)

    येवल्यात गेल्या एक ते दीड तासापासून रस्ता रोको आंदोलन

    येवल्यात गेल्या एक ते दीड तासापासून रस्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. मालेगाव-पुणे व नाशिक-छत्रपती संभाजी नगर राज्य मार्गांवरील विंचूर चौफुली येथे रस्तारोको आंदोलन केले. विस्थापितांना ई लिलाव न करता गाळे द्यावे. या मागणी आमदार किशोर दराडे यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन सुरु केले आहे.

  • 25 Jul 2025 12:37 PM (IST)

    गेल्या एक तासापासून भर पावसात रस्ता रोको आंदोलन

    ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह गावकऱ्यांनी गेल्या एक तासापासून भर पावसात रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. आता माघार नाही असा आंदोलकांचा आक्रमक पावित्र आहे. IPS पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली महादेव मुंडे खूनप्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणी आंदोलक करत आहेत.

  • 25 Jul 2025 12:24 PM (IST)

    पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरूच

    पुण्यात गाड्यांची तोडफोड सुरूच आहे. फुरसुंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड करण्यात आली. शिवशक्ती चौक आरु विहार सोसायटी येथील पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा फोडून दहशत निर्माण करण्यात आली. काही गुंडांनी हैदोस घातला. गेले 6 महिन्यातील 2 वेळा हा प्रकार झाला

  • 25 Jul 2025 12:10 PM (IST)

    आरोपी गोकुळ झा ला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

    कल्याण तरुणी मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा आणि रणजीत झा आरोपीला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कल्याण सत्र न्यायालयात सुनावणी झाली. तपासात अजून एक गुन्हा आरोपीवर दाखल असून त्यात तो फरार असल्याचे समोर आले.

  • 25 Jul 2025 12:00 PM (IST)

    विधिमंडळात जे घडलं ते लज्जास्पद

    विधिमंडळ कायदेमंडळाला एक दर्जा, लोकशाहीच्या मंदिरात जे चालू आहे ते लज्जास्पद’ आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सत्ताधारी आणि मुख्यमंत्र्यांनी शिस्त लावण्याचं काम करावं. सत्ताधारी पक्षाकडून बेशिस्त वर्तन होत आहे हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. सभागृहात वापरली जाणारी भाषा मुलांच्या कानावर पडली तर परिणाम होतील. सभागृहाच्या बाहेर गुंड आणून मारामाऱ्या होत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

  • 25 Jul 2025 11:51 AM (IST)

    कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा ताफा अडवण्याच प्रयत्न

    धुळे दौऱ्यावर असलेल्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा ताफा अडवण्याच प्रयत्न झाला. ताफ्यासमोर आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

  • 25 Jul 2025 11:41 AM (IST)

    सरकारला भिकारी म्हणणाऱ्यांना लाथ मारून बाहेर काढलं पाहिजे – विजय घाडगे

    सरकारला भिकारी म्हणणाऱ्यांना लाथ मारून बाहेर काढलं पाहिजे – माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

  • 25 Jul 2025 11:35 AM (IST)

    कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपी गोकूळ झा याची पत्रकारांना धमकी

    तुम्हाला परत भेटतो असे म्हणत कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपी गोकूळ झा याने पत्रकारांना धमकी दिली. तसेच पोलिसांसोबतही त्याची अरेरावी सुरू आहे. एवढंच नव्हे तर त्याने कल्याण कोर्टातही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता.

  • 25 Jul 2025 11:18 AM (IST)

    परळी – महादेव मुंडे हत्याप्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांचे कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन

    परळी – महादेव मुंडे हत्याप्रकरणात ज्ञानेश्वरी मुंडे यांचे कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. महादेव मुंडे हत्याप्रकरणातील आरोपींना अटक करा, अशी मागणी त्या गेल्या आनेक दिवसांपासून करत आहेत.  ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह ग्रामस्थही रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाले आहेत.

  • 25 Jul 2025 11:08 AM (IST)

    विभागीय अहवाल सादर केल्यानंतर आज मनसेच्या केंद्रीय समितीची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक

    विभागीय अहवाल सादर केल्यानंतर आज मनसेच्या केंद्रीय समितीची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक होईल.

    केंद्रीय समिती सोबत मुंबई अध्यक्ष आणि दोन्ही उपाध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार असून अहवाल सादर केल्यानंतर मनसे मध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

    विभागातील मनसेची परिस्थिती जाणून त्या ठिकाणी रिक्त पद भरण्यासंदर्भात राज ठाकरे निर्णय घेतील.

  • 25 Jul 2025 10:55 AM (IST)

    उल्हासनगर एक नंबर परिसरात लॅपटॉप दुकानाच्या आडून विदेशी दारूचा काळा धंदा

    परदेशातून राज्य उत्पादन शुल्काची रक्कम न भरता तस्करी करत महागड्या विदेशी दारूची उल्हासनगर मध्ये सुरू होती विक्री… कल्याण राज्य उत्पादन शुल्कच्या दोन पथकाने छापा मारत सुमारे साडेतीन लाखाच्या ७० पेक्षा अधिक महागड्या दारूच्या बाटल्या केल्या जप्त… तस्करी करणारा कमलेश जयरानी नावाच्या आरोपीलाही ताब्यात घेत त्याच्या इतर साथीदारांचा शोध केला सुरू…

  • 25 Jul 2025 10:45 AM (IST)

    अंधारी भुयारी मार्ग पाण्यात बुडाला  

    सबवेच्या आसपासच्या हॉटेल्स, दुकाने आणि घरांमध्ये पाणी भरू लागले आहे. सबवेभोवतीचा रस्ता पाण्यात बुडाला आहे, तो रस्त्यापेक्षा नदीसारखा दिसतो. लोकं पाण्यातून जाताना दिसत आहेत, कोणाची गाडी थांबली आहे, कोणाची ऑटो रिक्षा थांबली आहे आणि बाईक पाण्यात बुडलेल्या दिसत आहेत. अंधेरीजवळ कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सबवेमधील पाण्याची पातळी सतत वाढत आहे. सबवेकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

  • 25 Jul 2025 10:32 AM (IST)

    सतत पडणाऱ्या पावसामुळे मध्य रेल्वे मंदावली

    मध्य रेल्वे दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने धावत आहे…. कामावरती जाण्यासाठी चाकरमान्याना विलंबन लागत आहे… सध्यातरी कुठल्याही प्रकारे ठाणे स्थानक मध्य रेल्वे रुळावरती पाणी साचल्याचे चित्र दिसत नाहीत पावसाचा जोर वाढला तर सकल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे…

  • 25 Jul 2025 10:15 AM (IST)

    नवी मुंबईत पावसाला सुरुवात रात्रभर पावसाची संतधार सुरूच

    नवी मुंबईत पावसाला सुरुवात रात्रभर पावसाची संतधार सुरूच आहे. तुर्भे आणि जुईनगर बेलापूर वाशी परिसरात पाऊस… सर्वत्र ढगाळ वातावरण तसेच काळोख असल्याच पाहायला मिळत आहे.

  • 25 Jul 2025 09:51 AM (IST)

    मुंबईत रिमझिम पाऊस, पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल सेवा विस्कळीत

    मुंबई उपनगरात रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या लोकल सेवा विस्कळीत झाल्या आहेत. विरार-बोरिवली ते चर्चगेट दिशेने धावणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेन १० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांना उशीर होत असून, त्यांच्यात नाराजी दिसून येत आहे. मध्य रेल्वेच्या लोकलही पावसामुळे साधारण १० मिनिटे उशिराने धावत असल्याची माहिती आहे.

  • 25 Jul 2025 09:37 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात लम्पी आजाराचा 23 गावांमध्ये शिरकाव, 166 जनावरे लम्पीने बाधित

    जळगाव जिल्ह्यात लम्पी आजाराचा २३ गावांमध्ये शिरकाव केला आहे, ज्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६६ जनावरे लम्पीने बाधित झाली असून, त्यापैकी ५० जनावरे पूर्णपणे बरी झाली आहेत. सद्यस्थितीत ६६ जनावरे अजूनही बाधित असून, दुर्देवाने सहा जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, पशुसंवर्धन विभागामार्फत युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबविली जात आहे. लम्पी बाधित जनावरांचे आणि इतरही दूध उकळून पिण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून, नागरिकांनी कोणताही संभ्रम मनात ठेवू नये असे सूचित केले आहे.

  • 25 Jul 2025 09:25 AM (IST)

    मुंबई-ठाणे महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

    मुंबईतील संततधार पावसामुळे मुंबई आणि ठाण्यादरम्यानच्या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्याहून मुंबईच्या दिशेने तसेच मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड फटका बसत आहे. सततचा पाऊस, सिग्नल यंत्रणेतील अडचणी, रस्त्यांवरील खड्डे आणि सुरू असलेली अर्धवट कामे यामुळे ही कोंडी आणखी वाढली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत.

     

  • 25 Jul 2025 09:23 AM (IST)

    कल्याण डोंबिवली परिसरात दोन दिवसापासून पावसाची संततधार

    कल्याण डोंबिवली परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाची रिमझिम सुरू आहे. आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. तर अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बसत आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागातील रस्त्यावर पाणी साठण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • 25 Jul 2025 09:13 AM (IST)

    तुळजाभवानी मंदिरात चितळेंच्या लाडू प्रसादाची सेवा

    तुळजाभवानी मंदिरात चितळेंच्या लाडू प्रसादाच्या सेवेचा विधिवत शुभारंभ झाला. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांनचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी सपत्नीक पूजा करून या प्रसादाचे वाटप सुरू केले. चितळेंच्या लाडू प्रसादाचा पहिला लाडू तुळजाभवानी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आला. आज पहिल्याच दिवशी चितळेंकडून १००० लाडू तुळजाभवानी देवीच्या भाविकांना मोफत वाटण्यात येणार आहेत. यापुढे भाविकांना ३० रुपयांना एक लाडू याप्रमाणे हा प्रसाद उपलब्ध होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिली.

  • 25 Jul 2025 08:58 AM (IST)

    परळी महादेव मुंडे खून प्रकरण

    महादेव मुंडे यांच्या आरोपींना ताब्यात घ्यावे व त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सासर आणि माहेर या दोन्ही गावकऱ्यांच्या वतीने आज रस्ता रोको. महादेव मुंडे यांची 18 महिन्यापूर्वी निर्घुण हत्या करण्यात आली होती अजूनही आरोपी मोकाट. मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या कुटुंबाची भेट घेतली होती.

  • 25 Jul 2025 08:55 AM (IST)

    गरोदरपणात माहेरी आलेल्या मुलीच्या तपासणीत बालविवाह उघड

    पेण येथील 16 वर्षाच्या मुलीचा बालविवाह पालकांनी लावून दिल्यानंतर तीला सासरी पनवेल तालुक्यातील पोयंजेवाडी गावात पाठविण्यात आले. सात ते आठ महिन्यांची गरोदर मुलगी गरोदरपणासाठी पेण येथील आईवडीलांच्या घरी आली. पेण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना या मुलीच्या वयाविषयी संशय आल्याने त्यांनी मुलीच्या आधारकार्डावरून वयाची चौकशी केल्यानतंर बालविवाहाच्या प्रकरणाला वाचा फुटली.

  • 25 Jul 2025 08:46 AM (IST)

    श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्य पूजा 28 जुलै पासून सुरू होणार नोंदणी

    श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्य पूजा, तुळशी अर्चना पूजा, पाद्य पूजा, महानैवेद्य पुजेची पुढील सहा महिन्याची नोंदणी 28 जुलै पासून सुरू होणार आहे. यामध्ये महानैवेद्यपूजेचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विविध पूजांसाठी भाविकांकडून मोठी मागणी असते त्यासाठी मंदिर समितीने गेल्या वर्षीपासून पूजनाची ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे.

     

  • 25 Jul 2025 08:35 AM (IST)

    गटारी निमित्त पोलिसांनी तळी रामांची उतरवली झिंग, 111 जण ताब्यात

    गटारी निमित्त ठाणे पोलिसांनी तळी रामांची उतरवली झिंग. नाकाबंदीत 111 जण ताब्यात. थेट न्यायालयात कारवाई होणार. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 18 वाहतूक विभागात ठिक ठिकाणी बरेकेटिंग करून नाकाबंदी करण्यात आली होती. ठाणे पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ही बाब दिसून आली. ठाणे वाहतूक पोलिसांची 550 कर्मचाऱ्यांची टीम तयार करण्यात आली होती