
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ३७५ वा त्रिशत्कोत्तर अमृत महोत्सव वर्षपूर्ती सोहळा सांगता आज ३७६ वा बीज सोहळा संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने देहू नगरीत येणाऱ्या भाविक वारकऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्रिशत्कोत्तर अमृतमहोत्सवी तुकाराम बीज असल्याने देहू मध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे गुलामगिरीची, लाचारीची आणि अत्याचारांची आठवण करून देणारी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर सरकारने लवकर काढून टाकावी, अशी समस्त हिंदू समाजाची मागणी आहे. अन्यथा बाबरी ढाच्याप्रमाणे कारसेवा करून ही कबर उद्ध्वस्त करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने देण्यात आला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगपती गौतम अदानी यांची रात्री भेट झाली. मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर ही भेट झाली. यासह देश-विदेश, राज्यातील, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील सर्व महत्वाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
किल्ले शिवनेरीवर झालेल्या मधमाशी हल्ल्यात 47 पर्यटक जखमी झाले. जखमी पर्यटकांची प्रकृती स्थिर आहे. किल्ल्यावरील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शिवनेरी किल्ला आज पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बांधकाम पूर्ण होणं अपेक्षित आहे. तसेच त्यानंतर दुसऱ्या आठवड्यांत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. महापालिका पूल विभाग त्यादृष्टीने प्रयत्नशील असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
म्हाडा कार्यालयात नागरिकांची पायपीट थांबणार आहे. म्हाडाच्या जास्तीत जास्त ज्या विभागात नागरिक येतात त्या विभागात ऑनलाइन सुविधा उभारल्या जाणार आहेत. म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या रहिवाशांची प्राधिकरण आता सविस्तर माहिती गोळा करणार आहे. मुख्यालयातील कोणत्या विभागात कामानिमित्त दिवसाला किती रहिवासी येतात? याची माहिती म्हाडाला उपलब्ध होणार आहे. जेणेकरून भविष्यात त्या विभागातील सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा म्हाडाचा प्रयत्न असणार आहे.
बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे. प्रेम केल्याच्या संशयावरून तरुणाचा खून करण्यात आला आहे. जालन्याच्या तरुणाचा आष्टीत खून करण्यात आलाय. या प्रकरणात दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी 3 ओरीपांना ताब्यात घेतलं आहे. आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी गावात ही धक्कादायक घटना घडली. आरोपी भाऊसाहेब क्षीरसागर याच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर लाहे फाट्याजवळ धावत्या कारने पेट घेतली. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने गाडीतील लोकांना बाहेर काढले.
सांगलीच्या कासेगाव मध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आला आहे.पाच लाख रुपयांचा पहिलं बक्षीस बैलगाडी शर्यतीच्या मैदानासाठी ठेवण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून सुमारे दोनशेहून अधिक बैलगाडी चालक सहभागी झाले आहेत.
चंद्रपूर वन विकास महामंडळाच्या जंगलाला भीषण आग लागली. चंद्रपूर ते मूल महामार्ग लगत असलेल्या लोहार ते घंटाचौकी या भागात ही आग लागली. या आगीत मोठ्या प्रमाणात जंगल जळत आहे. सध्या वन विभागाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
औरंगजेब कबरीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त केला आहे. या ठिकाणी बॅरिगेटिंग वाढवले आहे. फक्त एकच माणूस प्रवेश करू शकेल या पद्धतीने बॅरिगेटिंग करण्यात आले. कबरीच्या मुख्य दरवाजा पोलिसांकडून बंद केला आहे.
धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जरांगे पाटील यांच्या बरोबर न्यायालयीन प्रक्रिये बाबत चर्चा केली. याविषयी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, ‘येत्या 26 तारखेपासून खऱ्या अर्थाने न्यायालयीन प्रक्रियेला सुरुवात होईल. जर तुम्ही आरोपीला वाचवण्याची तयारी करत असाल तर तुमचा विनाश हा जग जाहीर असेल. मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. काही लोक कुठेतरी या प्रकरणाला वेगळी दिशा देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.’
जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलची एकहाती सत्ता आली आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्या असून, चार जागांसाठी पाचजण रिंगणात होते. यामधे विद्यमान अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्या शिवनेर पॅनेलची एकहाती सत्ता आली आहे
औरंगजेबच्या कबरवरून होणाऱ्या चर्चांवर खासदार कल्याण काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ” हा चर्चा करण्यासारखा विषय नाही. निवडणुकाजवळ आल्या की कोणाला कबर दिसते, तर कोणाला प्रभू रामचंद्र दिसतात आम्ही सर्वधर्म समभाववाले आहोत, त्यामुळे आम्ही त्याच्यावर न बोललेलंच बरं.मात्र हे सगळे मुद्दे निवडणुकीपुरते आणि राजकारणापुरते मर्यादित असतात. इतके दिवस कबर इथे होती तोपर्यंत कोणाला काही वाटलं नाही, आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आल्या तर कबरीचा विषय सुरू झाला.” असं म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
क्रॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. ‘औरंगजेब क्रूर शासक होता फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. औरंगजेब आणि फडणवीसांचा कारभार एकसारखाच होता’ अशी खोचक टीका क्रॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
संगीतकार ए. आर. रेहमान यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात सकाळी दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारानंतर त्यांना आता डिस्चार्ज मिळाला आहे.
“संजय राऊत यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. युतीमध्ये समाविष्ट करावं आणि सत्तेत घ्यावं म्हणून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका करत आहेत. त्यामुळे ते इम्बॅलेन्स झालेले आहेत. पण त्यांना आता कळालंय की ते सत्तेत येणार नाहीत. आम्ही जर टीका करत बसलो तर हे लोक आम्हाला सत्तेत घेतील असं त्यांचं मतं आहे. त्यातून हे सर्व वक्तव्य ते करत आहेत,” अशी टीका खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
सांगली- अपक्ष खासदार विशाल पाटलांना भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांकडून भाजपसोबत येण्याची ऑफर देण्यात आली आहे. खासदार विशाल पाटलांच्या उपस्थितीत मंत्री चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटलांना भाजपमध्ये सोबत येण्याची जाहीर ऑफर दिली. “राजकारणामध्ये नेहमी वर्तमानावर चालावं लागतं. वर्तमानमध्ये विशाल पाटलांकडे चार वर्षे चार महिने आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी विशाल पाटील यांनी याचा विचार करावा,” असं ते म्हणाले. मात्र विशाल पाटलांनी यावर भाष्य करणं टाळत पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याचं स्पष्ट केलं.
बीड जिल्ह्यातील केळगाव येथील आश्रम शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली. धनंजय नागरगोजे गेल्या 18 वर्षांपासून केज तालुक्यातील केळगाव येथील श्री गजराम मुंडे निवासी आश्रम शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते.
नंदुरबार- विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव चर्चेत आहे. चंद्रकांत रघुवंशी यांना एकनाथ शिंदे यांनी मुंबईला बोलावलं आहे. रघुवंशी रात्री मुंबईकडे रवाना झाले आहेत. रघुवंशी यांना मुंबईत बोलावल्याने विधान परिषदेसाठी त्यांचं नाव निश्चित होण्याची चर्चा सुरू आहे.
रघुवंशी यांचा नंदुरबार-धुळे जिल्ह्यात मोठा प्रभाव आहे. चंद्रकांत रघुवंशी यांना आमदारकी मिळाल्यास शिवसेना शिंदे गटाला धुळे नंदुरबार जिल्ह्यात मोठा लाभ होईल.
जळगावात एजंटच्या मध्यस्थीने लग्न करणे तरुणाला चांगलेच महागात पडले, त्याची २ लाख ४४ हजारांत फसवणूक झाली आहे. जळगावातील रामेश्वर कॉलनी परिसरात लग्नाच्या तिसर्या दिवशी वधू दागिन्यांसह रात्रीतून पसार झाली आहे
अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजीयेथील संकेत हॉटेलवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात पाच जण जखमी, त्यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलविले आहे.करंजी येथील सलमान जमादार पठाण टोळीला अटक करण्याच्या मागणीसाठी आज करंजी गावात कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.
या महाराष्ट्रामध्ये 3000 च्या आसपास शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या याच्यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक आणि एकदा तरी आपली भूमिका व्यक्त केली का? बजरंग दल असेल विश्व परिषद असेल शेतकरी मेले जे हिंदू नाही का? महाराष्ट्र सारख्या प्रगत राज्यांमध्ये 3000 च्या आसपास शेतकरी आत्महत्या करतात आणि या देशावर राज्य करू इच्छिणारे आमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख यांना या देशाचे नाव बदलायचे आहे. शेतकर्यांच्या आत्महत्या वरती आमचे सर्व संघ चालक मोहनराव भागवत कधी बोलले ते दिसले का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे दाखल झाले आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
पुणे महानगर पालिकामध्ये असलेल्या 14 नाट्यगृहात नाटक होतात. यामध्ये नाटक होणं अपेक्षित आहे. मात्र याठिकाणी खाजगी कार्यक्रम होत असतात, अशी नाराजी अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. हे ॲप नाट्य गृह आरक्षणसाठी आहे आणि हे ओपन टू ऑल आहे. मग आम्ही जायचं कुठे, असा सवाल त्यांनी केला.
ऐरोली – टोलची प्रक्रिया अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि टोलवरील लागणारा वेळ व फास्टॅगचा गोंधळ टाळण्यासाठी प्रत्येक वाहनांना फास्ट टॅग लावणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
“पुणे महानगर पालिकामध्ये असलेल्या 14 नाट्यगृहात नाटक होतात. यामध्ये नाटक होणं अपेक्षित आहे. मात्र याठिकाणी खाजगी कार्यक्रम होत असतात. हे ॲप नाट्य गृह आरक्षणसाठी आहे आणि हे ओपन टू ऑल आहे. मग आम्ही जायचं कुठे?. आमची विनंती आहे या ॲपमध्ये असलेल्या त्रुटी यांचा विचार केला पाहिजे” अशी मागणी प्रशांत दामले यांनी केली आहे.
अजितदादा फक्त एकदाच बीडला गेले. अजित पवार पालकमंत्री म्हणून काय करतायत? बीडचे आमदार, मंत्री काय करतायत?. बीडमधील सर्व अधिकारी बदला, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी.
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्यासारखेच एक प्रकरण समोर आल्याचा दावा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. बीडमध्ये सध्या चाललंय काय, असा सवाल त्यांनी केला.
ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान यांना चेन्नईतील ग्रीम्स रोड इथल्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यातत आलं आहे. रविवारी सकाळी त्यांना छातीत दुखू लागल्यानंतर तातडीने चेन्नईतल्या रुग्णालयात नेण्यात आलं.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
पुणे विद्यापीठाची विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मुदतवाढ मिळाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागातील पदवी पदव्युत्तर आणि एकात्मिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी 30 एप्रिल पर्यंत तर पदवीधर अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी 20 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ संकुलात पदवी व पदवीधर अभ्यासक्रम प्रवेशासाठी आत्तापर्यंत अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.
पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा करण्यात आली. घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला जिल्हा व सत्र न्यायाधीश के.डी. शिरभाते यांनी दहा वर्ष सक्तमजुरी आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड भरल्यास दंडाची रक्कम पिढीतील नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी. तसेच दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावाच भोगाव लागेल असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे…
पुण्यात धुळवडीच्या दिवशी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून ४०० मद्यापी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी सहा हजार ११८ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करून ५० लाख ९४ हजारांचा दंड वसूल केला. ३८६ वाहने जप्त करण्यात आली.
पुणे : मुंढवा परिसरातून १७ लाखांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. मुंढवा भागात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून १६ लाख ८० हजारांचा २८ किलो गांजा जप्त करण्यात आला. प्रमोद सुधाकर कांबळे (वय ४४, रा. किल्ला वेस, करमाळा, जि. सोलापूर), विशाल दत्ता पारखे (वय ४१, रा. मोहननगर, आदित्य सोसायटी, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.