
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलनात उतरणार आहेत. तर दुसरीकडे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 12 वाजता हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक धडकणार आहेत. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर दुपारी 12 वाजता हे आंदोलन होणार आहे. त्यात उद्धव ठाकरेही सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत 15 ऑगस्टला मांसविक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. यावर सर्वसामान्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असून विरोधी पक्षांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. लोकांनी काय खावं आणि खाऊ नये हे सांगणारे पालिका अधिकारी कोण, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे.
यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्ट रोजी चिकन मटण विक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याला राष्ट्रवादी शरद पवार गटाने विरोध केला आहे. निर्णय मागे घ्या अन्यथा 15 ऑगस्ट रोजी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड केडीएमसी मुख्यालयात मांसाहार करणार असा इशारा शरद पवार गटाने दिला आहे.
परभणीच्या गंगाखेड शहरातून जवळच असलेल्या परळी राष्ट्रीय महामार्गावरील मंथन बियर बार हॉटेलवर जेवणासाठी आलेल्या ट्रॅव्हल्स चालकासह सहायकास भाडेकरु हॉटेल चालक, व्यवस्थापक व सहकाऱ्यांनी अमानुष मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली होती. मारहाण करणाऱ्या भाडेकरू हॉटेल चालक व व्यवस्थापकावर गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीत आज ‘इंडिया’ आघाडीने निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता. पोलिसांनी मोर्चाला रोखल्यानंतर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. दिल्लीत घडलेल्या घटनेचे पडसाद नांदेडमध्ये उमटले आहेत. दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ नांदेडमध्ये काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी कडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रोष व्यक्त केला.
महायूतीच्या वादग्रस्त मंत्र्यांच्या विरोधात धाराशिव मधील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्ते खेळों आंदोलन करण्यात आले. महायुतीचे अनेक मंत्री कलंकीत असून माणिकराव कोकाटे यांनी तर विधी मंडळात ऑन लाईन रम्मी खेळली या निषेधार्थ धाराशिव मध्ये उद्धव ठाकरे शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार मधील वादग्रस्त मंत्राच्या विरोधात पत्ते खेळून निषेध व्यक्त करण्यात आला.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेची युवासेना ऍक्टिव्ह मोडवर
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनेकडून निरीक्षक जाहीर…
मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रात युवासेनेचे निरीक्षक दौरा करून स्थानिक पातळीवर आढावा घेणार…
याअगोदर ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निहाय निरीक्षक जाहीर करून स्थानिक पातळीचा आढावा घेतला होता… यानंतर युवासेनेचे निरीक्षक आढावा घेणार आहेत…
महानगर पालिकेसोबत युवासेनेच्या कामाचा आढावा देखील याच्या माध्यमातून घेतला जाणार आहे…
युवासेनेच्या पदाधिकार्यांना दिलेली विधानसभा निहाय जबाबदारी
सिंधुदुर्ग जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज ओरोस जिल्हाधिकारी कार्यालय येथे राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन छेडण्यात आले. यावेळी राज्य सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कारवाई करावी अशी मागणी या जनआक्रोश आंदोलनातून करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिमाशंकरजवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे. भीमाशंकर येथील धबधब्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. सुबोध करंडे आणि तरुण दिलीप नवघरे अशी मृतांची नावं आहेत. सहा डॉक्टरांची टीम भीमाशंकर येथे फिरायला आली होती. डॉक्टर सुबोध करंडे यांना वाचवण्याच्या प्रयत्नात स्थानिक तरुण दिलीप वनघरे यांचाही बुडून मृत्यू झाला.
मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. सरकारमधील कलंकीत मंत्र्यांच्या राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी ही पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आंदोलनं केली. त्यानतंर आता ठाकरे काय बोलणार? याकडे कार्यकर्ते आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव फाटा ते बजरंगबली मंदिरापर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज पूर्ण नदी पात्रात जलसमाधी आंदोलन केले. ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.
मुंडे साहेबांच्या नेतृत्वानंतर 15 वर्ष राज्यात आणि देशात सरकार नव्हते. मात्र मुंडे साहेबांनी संघर्ष सोडला नाही. पद गेल्यावर फारसं लोकं विचारात नाहीत. मात्र पद गेल्यानंतर 15 वर्ष आपलं नेतृत्व टिकवून ठेवण्याचे काम मुंडे साहेबांनी शिकवलं. मी गोपीनाथ मुंडे यांची कार्यपद्धती पाहून राजकारण शिकलो”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सत्ता ही अनेक आमिष आपल्याला दाखवते, आपल्याला वष करते. पण सत्तेशी संघर्ष करायला शिक म्हणजे मोठा होशील, अशी शिकवण मला गोपीनाथ मुंडे यांनी दिली की, असंही फडणवीस यांनी म्हटलं.
एकीकडे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा पुतळा आहे. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्र आणि देशात लोकप्रियता मिळवली. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख दोन्ही मित्र स्मारकाच्या रूपाने पुन्हा एकदा एकत्र आले हा विलक्षण योगायोग आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातुरात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात म्हणाले.
महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या यादीत 1 नंबरवर, आम्ही भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरलो आहोत – उद्धव ठाकरे
परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दागी मंत्र्यांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. जुगाराचा डाव भरवत उबाठा कडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती पहायला मिळाली.
निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचं संसदेबाहेर आंदोलन सुरू असून पोलिसांनी त्यांना अडवल्याने खासदारांनी रस्त्यावर ठिय्या दिला. राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
केंद्र सरकार भेकड आहे, घाबरलं आहे, म्हणूनच असे प्रकार केले जात आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी केला आहे.
महायुतीच्या मंत्र्यांविरोधात अमरावती ठाकरे गटाचं अनोखं आंदोलन. राज्यमंत्री योगेश कदम यांचा मुखवटा लावून शिवसैनिकांनी नकली नोटा उडवल्या .
शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांच्या विरोधात ठाकरे गटाने जोरदार घोषणाबाजी केली.
संसदेबाहेर काही अंतरावरच इंडिया आघाडीचा मोर्चा अडवण्यात आला आहे. या मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत पोलिसांनी सर्वांना अडवलं असून त्यानंतर खासदरांनी रस्त्यावरच ठिय्या दिला आहे.
दिल्लीत निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडकण्यासाठी इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरुवात. 300 खासदार या मोर्चात सहभागी. शरद पवार आणि संजय राऊत या मोर्चात सहभागी. राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप.
इंडिया आघाडीच्या मोर्चाला सुरुवात. निवडणूक आयोगाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. लोकसभा, राज्यसभेच कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित. विरोधी पक्षाच्या खासदारांचा मोठा गदारोळ.
सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात डोंबिवलीत शिवसेना ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन. पत्ते खेळणारा मंत्री, वेटरला मारणारा बॉक्सर मंत्री यांची वेशभूषा धारण करून केले प्रतिकात्मक आंदोलन. भ्रष्ट मंत्र्यांचे करायचे काय, खाली डोके वरती पाय अशा घोषणा देत केला निषेध
बिहारमधील मतदार यादी पडताळणीवरुन गोंधळ. लोकसभेच कामकाज सुरु होताच विरोधकांचा गदारोळ. सभागृहात विरोधी पक्षाच्या खासदारांची घोषणाबाजी. राहुल गांधी यांनी केलेला मत चोरीचा आरोप
मुंबईमधील कुलाबा परिसरातील धोकादायक ठरलेल्या दोन महापालिका शाळांमधील सुमारे १५०० विद्यार्थी गेल्या २० दिवसांपासून शिक्षणापासून वंचित आहेत. १५ जुलैपासून या शाळा अचानक रिकाम्या करण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग बंद पडले. या ८ माध्यमांच्या शाळांपैकी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अद्याप कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ पर्यायी व्यवस्था न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षण हक्कावर गदा येत असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात 15 ते 17 दिवसापासून पाऊस नसला तरी तेलंगणा राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख तीन नद्या 90 टक्के भरल्या आहेत. प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या तीन नद्या 90 टक्के भरल्यामुळे छोटे नाले व तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग होत असून याच्या चांगलाच फायदा शेतकरी घेत आहेत. जिल्ह्यातील मेडिगट्टा धरण आणि चिचडोह धरण ही 90% पूर्णपणे भरलेला आहे. तर प्राणहिता नदी 90 टक्के भरली आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगावात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांचा ४० किलो गांजा जप्त केला आहे. एका कारमधून या गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांचा पाठलाग सुरू असताना आरोपीने एका ठिकाणी कार उभी करून पळ काढला. पोलिसांनी या कारमधून ४० किलो ४२४ ग्रॅम वजनाचा, १० लाख १० हजार ६०० रुपये किमतीचा गांजा आणि कार असा एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी ते लातूरला आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी शहरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
पुणे जिल्ह्यातील खराडी येथे डंपरने धडक दिल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. मयत तरुणाचे नाव योगेश चौधरी असे असून, पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नुकताच संजय राऊत यांनी म्हटले की, निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाहीये.
रक्षाबंधन दिवशी मेट्रोतून दोन लाख प्रवाशांची सफर; मिळाले २८ लाख ३१ हजार रुपयांचे उत्पन्न. रक्षाबंधनाच्या दिवशी शनिवारी महा मेट्रोतून दोन लाख ११ हजार २९६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मेट्रोला २८ लाख ३१ हजार ५२३ रुपयांचे उत्पन्न मिळाले.
अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी ते दुधनी दरम्यान बोरी नदीवरील पुलाजवळ घडली घटना. बबलाद गावातील रेवणसिद्ध श्रीमंत बिराजदार असे वाहून गेलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव.
सिद्धिविनायक मंदिरात १२ ऑगस्ट रोजी अंगारकी निमित्त श्रींच्या दर्शनासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहेदर्शनाची वेळ: पहाटे ३:१५ वाजता महापूजा झाल्यावर दर्शनासाठी मंदिर खुले होईल आणि रात्री ११:५० वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.
शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विकल्यानंतर आता अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर वाढले आहेत. सोयाबीनला पहिल्यांदाच उंचाकी चार हजार सातशे रुपये इतका दर मिळाला आहे. सोयाबीनच्या दरवाढीचा व्यापाऱ्यांना फायदा होत आहे. शेतीसाठी लागणारा खर्च काढण्यासाठी यापूर्वीच शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन विकले . शेतकऱ्यांनी 3800 ते 4 हजार रुपयांपर्यंत सोयाबीन विकले.
मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनासाठी धाराशिव जिल्ह्यात जोरदार तयारी सुरू आहे. या आंदोलनाच्या तयारीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘चलो मुंबई’ अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. जिल्ह्यातील गावोगावी सखल मराठा बांधवांच्या वतीने जनजागृतीसाठी बैठका घेण्यात येत आहेत. रिक्षा आणि फोर व्हीलरला बॅनर लावण्यासाठी बॅनर प्रिंट केले जात आहेत. 27 ऑगस्टला धाराशिव जिल्ह्यातून अंतरवली सराटीकडे आंदोलनासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव रवाना होणार आहेत.
राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेच्या कामाची ते पाहणी करणार आहेत. तसेच लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा उपसा सिंचन योजनेच्या विशेष दुरुस्ती कामाचे जनसंपदामंत्री विखे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.
डोंबिवलीत हाय प्रोफाइल सोसायटीच्या निवडणुकीत बोगस मतदानावरून राडा झाला आहे. डोंबिवलीच्या ऑर्चिड सोसायटीच्या निवडणुकीत दोन गटांत हाणामारी झाली असून पोलिसांनाही धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मानपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नाशिक- तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी लोटली आहे. तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा असल्याने भाविकांकडून मंदिरात गर्दी झाली आहे. पहाटे चार वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर दुपारी 12 वाजता हे आंदोलन होणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी 12 वाजता हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक धडकणार आहेत.