
मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात बहुतेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे देहूत आज संत तुकाराम महाराजांचा 340 वा पालखी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. सकाळी ११.३० च्या दरम्यान ही पत्रकार परिषद होईल. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यांमध्ये आणि पुणे आणि नाशिकच्या घाट भागात पुढील 3-4 तासांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांवर विरोधकांनी ते खासगी कारखान्यांचं समर्थन करतात असा आरोप केला होता. यावर बोलताना अजित पवारांनी म्हटले की, ‘मी खासगी कारखान्यांचं समर्थन करत नाही, मी सहकाराचं समर्थन करतो. मी सहकाराला बळकटी आणण्याचं काम करतो.’
नालासोपाऱ्यातील मदर वेलंकनी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये राडा झाला असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना लिव्हिंग सर्टिफिकीट आणि मार्कशीट देत नसल्याने मनसे कार्यकर्ते आणि शाळा ट्रस्टच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून पावसाची प्रतीक्षा लागलेली होती परंतु आज आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
अहमदाबाद विमान अपघातातील एकमेव वाचलेले विश्वास कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 12 जून रोजी अहमदाबाद विमान अपघातात विमानातील एक वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होते. विमानात एकूण 242 लोक होते. फक्त विश्वास कुमार बचावले.
पुण्यातील अंबरचंदजी मुनोत शिक्षण संस्थेचे मुनोत प्राथमिक विद्यालय गोकुळनगर या विद्यालयातील शिक्षक कर्मचारी आणि संस्थाचालक यांच्या वादामुळे अजूनही शाळा चालू करण्याचा निर्णय झालेला नाही .रोज विद्यार्थी शाळेच्या बाहेर येऊन उभे राहतात संध्याकाळी सहा वाजता परत घरी जातात असे गेले तीन दिवस रोज चालू आहे .संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16 तारखेपासून शाळा चालू झालेले आहेत मुनोत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे यासाठी मनसेच्या वतीने निषेधार्थ शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी एक मोठी घोषणा केली. मंत्री म्हणाले की, 15 ऑगस्टपासून 3000 रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास सुरू होणार आहे.
कल्याणच्या वल्लीपिर रोड परिसरात घरफोडीचा प्रयत्न करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्याने उझैर टॉवरमधील बंद घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. पण चोरट्याला कुलूप उघडण्यात अपयश आले आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
धुळे शहरातील वडजाई रोडवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमण महापालिकेच्या वतीने हटवण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून विविध ठिकाणी रस्त्याला लागून असलेले वाहतुकीला अडथळा असलेले अतिक्रमण महापालिकेच्या वतीने हटवण्यात आले आहे. अनेक पत्र्याचे शेड हातगाड्या अतिक्रमण विभागाने काढले काढून टाकले आहे.
वाशिम जिल्ह्यतील मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या अंगावर खुलेआम पैशे फेकण्याची घटना घडली आहे. ही घटना मालेगाव पंचायत समिती कार्यलयात घडली. घरकुल आवास योजनेचे हफ्ते लवकर लाभार्त्यांना मिळण्याकरिता पैशाची मागणी होत असल्याने ब्राम्हणवाडा गावचे सरपंच गोपीनाथ नागरे यांनी चक्क गट विकास अधिकाऱ्याच्या अंगावर पैसे फेकले.
तुळजापूरमध्ये बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांचे तीन दिवसांपासून महाराष्ट्र बँकेच्या दारात आमरण उपोषण सुरू आहे. आज उपोषणाचा तिसरा दिवस असून शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे. सिबिलचे कारण सांगून कर्ज देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी केला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळा आणि वारीमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील व राज्याबाहेरील अनेक वारकरी अलंकापुरीत दाखल झालेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यासोबत विठू रायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांना लागली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पालघरच्या सातीवली जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक येण्यास सुरुवात झाली आहे. या बैठकीला तेजस्वी घोसाळकर उपस्थित राहणार का याकडे लक्ष राहणार आहे. उद्धव ठाकरेंची मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत बैठक आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होते. आज आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे.
मदरशात 11 वर्षांच्या मुलीला विजेचा शॉक देऊन त्याची हत्या करण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील निजामिया मदरशामधील ही धक्कादायक घटना आहे. मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून आरोपीने मुलीची हत्या केली. पोलिसांकडून या घटनेबाबत अधिक तपास सुरू आहे.
अंबरनाथ शहरात पावसाला सुरुवात झाली असून अवघ्या दहा मिनिटाच्या पावसात रस्ता जलमय झाला आहे. अंबरनाथ स्टेशन रोडवर पाणी साचल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. साचलेल्या पाण्यातून नागरिक वाट काढत असल्याचं दृश्य पहायला मिळत आहे.
केंद्रात मोदींची सत्ता तरी गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही. राज्य सरकार भाषा का लादत आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी महाराष्ट्र सरकारला केला आहे.
आज हिंदी सक्ती केली तर उद्या मराठी भाषा संपून जाईल. हा केंद्राचा विषय नाही, राजकारण काय सुरू आहे तेच कळत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
मुख्याध्यापकांनी सरकारचे मनसुबे उधळून लावावेत. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, त्यामुळे सक्तीचा प्रश्नच नाही – राज ठाकरे
शैक्षणिक धोरणात हिंदी भाषा सक्तीची करण्यास मनसेचा विरोध आहे. हिंदीची सक्ती फक्त महाराष्ट्रातच का ? दक्षिणेत कराल का ? असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
हिंदीची सक्ती मनसे खपवून घेणार नाही असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा दिला आहे,
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हवाई सुंदरी रोशनी सोनघरेचा मृतदेह अद्याप नातेवाईकांच्या ताब्यात मिळालेला नाही; दुसऱ्या फेरीच्या DNA रिपोर्टची प्रतीक्षा आहे.
12 जून 2025 रोजी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला. त्यामध्ये डोंबिवलीतील रोशनी सोनघरे हिचा ही दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर एक आठवडा उलटूनही रोशनीचा मृतदेह अद्यापही नातेवाईकांना मिळालेला नाही.
पहिल्या फेरीतील DNA चाचणीत रोशनीचा मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले नाही. दुसऱ्या फेरीतील DNA चाचणी अहवाल आल्यानंतर मृतदेह ताब्यात दिला जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर हे अचानक पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. एक अती महत्वाच्या विषयाबाबत दरेकर हे आयुक्तांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.
सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशावरून एकनाथ खडसेंनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.
सुधाकर बडगुजर यांचा आता भाजपात प्रवेश झाला त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे पवित्र झाली आहे. पण एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश देताना आक्षेप आहे, म्हणून प्रवेश दिला गेला नाही तेव्हा भाजपा अपवित्र होत होता का? आता बडगुजर यांना प्रवेश दिल्याने भाजप पवित्र झाली का ? असा खोचक सवाल खडसे यांनी विचारला.
“भाजपा बकवास पक्ष आहे. देश द्रोही हा शब्द लागू होतो. देशातील सत्ता भ्रष्ट लोकांच्या आधाराने घेतली. मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे. भारतीय जनता पार्टी भंगार गोळा करून मोठा झालाय. 90% आमदार आमचे आहेत. शैक्षणिक धोरण भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोईसाठी केलं जातं. आम्ही हिंदीला विरोध केला नाही. पण सक्ती नको” असं संजय राऊत म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांची चाल तिरकी असते. त्यांना सलीम कुत्ता चालतो, उद्या दाऊद चालेल. मी वारंवार तेच सांगत होतो, शरद पवार अशा लोकांना सोबत घेणार नाहीत. जे संधीसाधू तिकडे गेलेत, आम्ही त्यांचा विचार देखील करत नाही. भारतीय जनता पक्ष्याने सलीम कुत्ता याला संत म्हणून पदवी दिलीय” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
जूनच्या शेवटच्या आठवड्यात पूरपरिस्थितीची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्राने जूनची सरासरी 16 दिवसांत ओलांडली. घाट माथ्यावर विक्रमी पावसाची नोंद. कोकणात 23 जूनपर्यंत अतिवृष्टीचा इशारा. मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधारेचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सूनने 48 तसात 65 टक्के देश व्यापला.
“आदल्या दिवशी मला प्रवेशाचा फोन आला. एवढा ताफा घेऊन जाणे अवघड बाब असते. आता भाजप वरिष्ठ सांगतील ते करणार. महापालिका निवडणुकीत वरिष्ठ नेते आदेश देतील ते करणार. भाजपच्या 100 + जागा निवडणून येणार” असं उद्धव ठाकरे गट सोडून भाजपात प्रवेश करणारे सुधाकर बडगुजर म्हणाले.
मुंबईच्या मातोश्री बाहेर एकनाथ शिंदे यांची जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मातोश्री बाहेर ठाकरेंचा एकच बॅनर पाहायला मिळत आहे. मात्र शिंदेंचं सर्वत्र बॅनर हा चर्चेचा विषय बनला आहे.शिवसेनेचा 19 जून रोजी वर्धापन दिन आहे. या निमित्ताने शिवसेनेकडून संपूर्ण बांद्रा परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनगरच्या माध्यमातून शिवसेनेचे एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच भगवा महाराष्ट्राचा भगवा हिंदुत्वाचा भगवा शिवसैनिकांचा असा आशय या बॅनरव पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना भारत भेटीचं निमंत्रण दिलं आहे. ट्रम्प यांच्याकडून निमंत्रणाचा स्वीकार केला असून लवकरच भारतात येऊ, असं आश्वासन त्यांनी पंतप्रधान मोदींना दिलं आहे. तसेच ट्रम्प यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका भेटीचं निमंत्रण दिलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिट फोनवर चर्चा झाली.
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर अंबिका हॉटेल जवळ कंटेनर आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. रोडवरून दुभाजक ओलांडताना कंटेनरने ॲसिडने भरलेल्या ट्रकला धडक दिली. मंगळवारी संध्याकाळी हा अपघात झाला. अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या कंटेनर आणि ट्रकच्या भीषण अपघातात एक ठार झाला आहे. तर एक जण जखमी आहे. सदर जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालय उपचारासाठी दाखल केलं आहे. तसेच या अपघातामुळे सोलापूरहून हैद्राबादला जाणारी वाहतूक काही वेळासाठी खोळंबली होती.
मुंबईतील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज पहाटे 6 च्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. या तलावाची 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता आहे. मात्र हे पाणी पिण्यायोग्य नाही. हे पाणी औद्योगिक वापरासाठी आणि आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी केला जातो. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या गेल्या 2 दिवसात पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे. सद्यस्थितीत तलावाची पाणी पातळी 195.10 फूट इतकी आहे.
पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी यंदा मध्य रेल्वेने ८० पेक्षा जास्त विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. सोलापूर मध्य रेल्वे स्थानकाचे वाणिज्य विभागीय व्यवस्थापक योगेश पाटील यांनी ही माहिती दिली. या विशेष गाड्या पुणे, नागपूर, अमरावती, कलबुर्गी, भुसावळ, मिरज आणि कोल्हापूर अशा विविध महत्त्वाच्या स्थानकांवरून धावतील. यामध्ये पुणे-मिरज, नागपूर-मिरज, न्यू अमरावती-पंढरपूर विशेष, खामगाव-पंढरपूर विशेष, भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष, मिरज-कलबुर्गी, आणि कोल्हापूर-कुर्डूवाडी अशा फेऱ्यांचा समावेश आहे. केवळ रेल्वे सेवाच नाही, तर पंढरपूर स्टेशनवर वारकऱ्यांसाठी ५ मदत केंद्रे, वॉटरप्रूफ मंडप आणि २४ तास उपलब्ध विशेष रेल्वे अधिकारी अशा सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. कर्नाटक राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठीही विशेष गाड्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या सहा महिन्यांत डोंबिवली वाहतूक पोलिसांनी नियम मोडणाऱ्या तब्बल ५ हजार रिक्षाचालकांवर धडक कारवाई केली आहे. गणवेश न घालणे, परवाना नसणे, रिक्षावर नावफलक नसणे अशा विविध कारणांसाठी ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेषतः, रिक्षाचालकाच्या बाजूला ‘चौथी सीट’ बसवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांचे विशेष लक्ष आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास परवाना आणि रिक्षा परवाना रद्द करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी रिक्षाचालकांना दिला आहे. प्रवाशांनीही अशा जीवघेण्या आणि धोकादायक प्रवासापासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज, बुधवार, १८ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता दादर येथील शिवतीर्थावर एका तातडीच्या पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेवेळी राज ठाकरे महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधणार आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते यवत दरम्यानची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या मार्गावर सहा पदरी उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) उभारण्यासोबतच, सध्याचा रस्ताही सहा पदरी करण्यात येणार आहे. ‘बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा’ (Build-Operate-Transfer – BOT) तत्त्वावर हे काम होणार असून, यासाठी ५,२६२.३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा शासननिर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच काढला आहे. मात्र, वाहनांची वाढती संख्या आणि तीन वर्षांपेक्षा जास्त लागणारा कामाचा कालावधी पाहता, हे काम खरोखरच वाहतूक कोंडी सोडवेल की यामुळे तात्पुरती कोंडी आणखी वाढेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.