
बुलढाणा जिल्ह्यातील काही भागांमध्ये केसगळतीनंतर आता रुग्णांमध्ये नखगळतीचीही लक्षणं आढळून येत असल्याने केंद्र सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या नऊ विभागांतील तज्ज्ञांचं पथक आज जिल्ह्यात दाखल होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ही माहिती दिली आहे. हे पथक बाधित गावांतील रुग्णांना प्रत्यक्ष भेटून तपासणी करणार आहे. तिथल्या तथ्य संकलनाच्या माध्यमातून या आजारामागील नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगाव, बोंडगाव, तसेच शेगाव सह नांदुरा तालुक्यातील १३ गावांमध्ये केसगळतीचे प्रकार समोर आले होते. विशेष म्हणजे केसगळतीनंतर काही रुग्णांमध्ये नखगळतीचंही प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलं. तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सकाळी 9 वाजता मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थिगिती देण्यात आली आहे. हिंदी भाषा ‘अनिवार्य’ या शब्दाला स्थगिती देतोय. तसेच हिंदी भाषा बंधनकारक नसणार, अशी माहिती मंत्री दादा भुसे यांनी म्हटलं आहे. या संदर्भात सुधारित शासन निर्णय जारी करणार असल्याचंही दादा भुसे यांनी सांगितलं.
मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 पर्यटक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे.
बुलडाणामधून मोठी बातमी समोर आली आहे. जिल्हयातील केस आणि नखं गळती प्रकरणी केंद्रीय पथक बोंडगाव मध्ये दाखल झालं आहे. केंद्रीय पथकात 9 सदस्य आहेत. या 9 सदस्यांचं पथक रुग्णांची तपासणी करत आहेत.
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये एमसीडीचे एक मोठे ऑपरेशन सुरू आहे. एमसीडीने परिसरात बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारती पाडण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अलिकडेच, या परिसरात एक 4 मजली इमारत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि 22 जणांना वाचवण्यात आले होते.
गुजरातमधील अमरेली येथील शास्त्री नगर भागात एका प्रशिक्षण विमान अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला. अग्निशमन अधिकारी एच.सी. गढवी म्हणाले, “आम्हाला विमान अपघाताची माहिती मिळाली. माहिती मिळताच, पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. आम्ही आगीवर नियंत्रण मिळवले. पण अपघातात पायलटचा मृत्यू झाला.”
लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव म्हणाले की, भाजप जो काही निर्णय घेतो तो हिसकावून घेण्यासाठी असतो. अँग्लो-इंडियन लोकांना लोकसभा आणि विधानसभेत आरक्षण होते, त्यांनी ते हिसकावून घेतले. जीएसटी लागू करून त्यांनी व्यवसाय हिरावून घेतला, अनेक व्यवसाय बंद पडले. खाजगीकरण करून त्यांनी आरक्षण हिसकावून घेतले. आता त्यांनी जमीन हिसकावून घेण्यासाठी वक्फ विधेयक आणले आहे, ही भारतीय जनता पक्ष नाही तर भारतीय जमीन पक्ष आहे, एक भू-माफिया पक्ष आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये एक मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. येथे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केले. माहितीनुसार, काही पर्यटकांवर गोळ्याही झाडण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर आता भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते महाराष्ट्राच्या हिताचंच आहे.आणि एकत्र यायचं कि नाही या निर्णयाबद्दल ठाकरे बंदूच ठरवतील” असं वक्तव्य करत भास्कर जाधव यांनी मनसे-शिवसेना युतीवर प्रतिक्रिया दिली आहे
कांद्याच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी घट झाल्याचं समोर आलं आहे. विदेशात जास्त निर्यातीसाठी लासलगाव बाजार समिती पाठपुरावा करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. अपेडाच्या आकडेवारीत कांद्याची निर्यात कमी झाल्याची बाब समोर आली आहे. 7 लाख 46 हजार क्विंटल कांद्याची निर्यात कमी झाल्याचंही समोर आलं आहे.
अनुराग कश्यपनं अखेर माफी मागितली आहे. अनुराग कश्यपनं ब्राह्मण समाजाविरोधात एक वक्तव्य केलं होतं त्यानंतर वाद निर्माण झाला होता. अनुरागवर टिकेची झोड उठली. ‘फुले’ चित्रपटावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक विधान केलं होतं ज्यावर ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला होता. यानंतर आता अनुरागने फेसबुक पोस्ट आणि ट्विट करत माफी मागितली आहे.
अंबाजोगाईच्या तहसील कार्यालय परिसरात टॉवरवर चढून 3 तासांपासून आंदोलन करण्यात येत आहे. गायरान प्रश्नी अचानक केलेल्या या आंदोलनाने प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर नवनाथ हारेंनी आंदोलन स्थगित केलं आहे.
मुंबईतल्या सर्व लँड स्कॅमचे बादशाह उद्धव ठाकरे आहेत, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी केला. उद्धव ठाकरेंच्या डोक्यात नेहमी लँडस्कॅम असतं असंही ते म्हणाले. भाजपच्या कार्यशाळेत शेलार यांनी ही टीका केली.
दारूच्या नशेत पाच जणांच्या टोळक्याकडून पती पत्नीला मारहाण, पुण्यातील पाषाण भागात धक्कादायक प्रकार घडला आहे.
हॉर्न का वाजवला म्हणून पाषाण सर्कल येथे दांपत्याला पाच जणांकडून मारहाण करण्यात आली तसेच धमकावण्यातही आलं.
पुण्यातील चतुश्रिंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
एसएसपीई आजाराने ग्रस्त असलेल्या मुलांच्या पालकांचे मंत्रालयाबाहेर आंदोलन. आरोग्य विभागाकडून उपचारांत दिरंगाई होत असल्याचा संतप्त पालकांचा आरोप. आमच्या मुलांचा जीव वाचवा, अशी पालकांची सरकारकडे मागणी आहे.
पिंपरी- चिंचवड शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांना उलटी, जुलाबाने हैराण झालेत. शहरातील रावेत, मोशी, वाल्हेकरवाडी, जाधववाडी, चऱ्होली परिसरातील नागरिक जुलाब आणि उलटी ने त्रस्त झाले आहेत. दूषित पाण्यामुळे नागरिकांना अशा आजारांना सामोरे जाव लागत असल्याच सांगितलं जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील तांडा वस्तीच्या निधी मंजूरीवरून किनवट भाजपाचे आमदार भीमराव केराम हे नाराज असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे आमदार बाबुराव कदम, भाजपाचे आमदार तुषार राठोड यांच्यासह आता किनवट भाजपाचे आमदार भीमराव केराम याचं ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येतील का? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला असता, त्यांनी या प्रश्नाला बगल दिली. राज्यात गुन्हेगारी वाढल्याबाबत आपण अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधत असल्याचे ते म्हणाले. राज्यात पाण्याची समस्या वाढली आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, असे त्या म्हणाल्या.
पश्चिम विदर्भात BRS ला खिंडार पडणार आहे. बीआरएसची टीम राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे. बीआरएसचे राज्याचे नेते नाना गाडबैले पाटील आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.
कुर्ल्यातील नेहरू नगर येथील BMC शाळेच्या मुख्य परिसरात भारतीय संविधानाची प्रास्ताविका आणि थोर महापुरुषांचे छायाचित्रे लावण्यात आली असून, यामागे वंचित बहुजन आघाडीच्या प्रभावी हस्तक्षेपाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे.
आज २२ एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन आहे. हा वसुंधरा दिन देशातील ८ राज्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दिल्लीत साजरा होणार आहे. पृथ्वीवर अलिकडच्या काळात ५० अंश सेल्सिअस तापमान पोचणार असण्याची शक्यता आहे.
सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या पाचही नेत्यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते राष्ट्रवादी अजित पवार गटात आज मुंबईत जाहीर प्रवेश होणार आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.
पहाटे मुंब्र्यातील चांदनगर परिसरातील चार मजली इमारतीच्या पहिला मजल्यावरील काही भाग कोसळला… चार मजली इमारतीतील नागरिकांना स्थलांतर करण्याचे काम सुरू… बाल्कनीचा भाग कोसळल्याने घरातील सामानाचे आणि 5 ते 6 दुचाकीचे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे… पालिका प्रशासन घटनास्थळी दाखल…
गँगस्टर डिके राव यांना जामीन मिळालेली आहे. त्यांचे ऍडव्होकेट विपुल दुसिंग यांनी सगळे पेपर घेऊन अथर्व जेल मध्ये आले आणि डी के राव यांची मुलाखत घेतली. काही वेळामध्ये त्यांची सुटका होणार…
अमरावतीत अंड्या पेक्षा निंबू महाग एका निंबूला पाच रुपये दर… ठोक बाजारात एका अंड्याची किंमत 4-5 रुपये तर एका निंबूची किंमत 5 रुपये… उन्हामुळे लिंबूच्या उत्पादनात घट झाल्याने आणि मागणी वाढल्याने लिंबूच्या दरात मोठी वाढ… थंड पेयाची मागणी वाढल्याने फळांचीही किमती वाढल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, 22 एप्रिल 2025 ला सौदी अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जेद्दाह इथं जाणार आहेत. या दौऱ्यात ते सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहेत. हा दौरा भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील रणनीतिक भागीदारीला अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील सौदी अरेबियाचा हा पहिला दौरा आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे यांना अखेर आदिवासी विकास महामंडळाने निलंबित केले. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बन्सोड यांनी आदेश काढला. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावच्या हद्दीतील अरततोंडी आणि शिरपूर येथे दोन वर्षात झालेल्या धानाच्या अफरातफरप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
आमदार अभिजीत पाटील यांच्या साखर कारखान्यात ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सहा आरोपींना अटक. आरोपींपैकी काही जण अभिजीत पाटील यांच्या ओळखीचे दररोज कार्यालयात येजा असायची. पंढरपूर येथील तीन, हरियाणातून एका तर आटपाडी आणि नगर येथील एका आरोपीला अटक. पुण्यातील एका लॉजवरून तीन आरोपींना घेतले ताब्यात, धाराशिव सायबर पोलिसांची कारवाई.
बार्शी ड्रग्स प्रकरणातील आरोपीची संख्या सहावर पोहोचली. वसीम बेग (वय ३६, रा. परांडा), जावेद मुजावर (वय ३६, रा. परांडा), जमीर पटेल (वय २८ रा. गाडेगाव रोड बार्शी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या आधी असद देहलूज (वय ३७, रा. परांडा), मेहफूज शेख (वय, १९ रा. बावची, ता. परांडा), सर्फराज शेख (वय ३२, रा. काझी गल्ली बार्शी) यांना अटक करण्यात आली होती. 17 एप्रिल रोजी बार्शी परांडा रोडवरील एका हॉटेलजवळ छापा टाकून तीन आरोपींना अटक करून त्यात कारसह 20 ग्राम एमडी ड्रग्स आणि गावठी पिस्तूल पोलिसांनी जप्त केले होते
जळगाव महापालिकेच्यावतीने प्रत्येक मालमत्ता धारकाला आता दर महिन्याला मालमत्ता कराची माहिती एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहे. शहरात १ लाख ३४ हजार मालमत्ताधारक असून, त्यापैकी १ लाख १० हजार मालमत्ताधारकांचे मोबाइल क्रमांक, तसेच ई-मेल आयडी अपडेट झाले आहेत. मालमत्ता करासंदर्भात सवलत, शास्ती किंवा अन्य काही योजना राबविली जात असेल, तर त्याची माहिती प्रत्येकाला एसएमएसवर मिळणार आहे.
आजपासून अमरावती आणि बडनेराचा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दिली आहे. नेरपिंगळाईजवळ 1500 मिमी व्यासाची पाईपलाईन लीक झाल्याने ते दुरुस्तीचं काम सुरू आहे. दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने अमरावती आणि बडनेरा शहरावर जलसंकट आलंय. 24 तारखेला अमरावती आणि बडनेरा शहराचा पाणीपुरवठा नियमित सुरु होणार आहे.
काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सकाळी 9 वाजता मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि चांदुर रेल्वे तालुक्यातील सात गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय. अमरावती जिल्ह्यातील 776 गावांसाठीच्या तातडीच्या उपायोजना 50% वरच आहेत. मागील तीन दिवसांपासून अमरावतीच्या तापमानात वाढ झाली असून पाणी टंचाईचं सावट भीषण होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक तापमानात अमरावती शहर देशात चौथ्या क्रमांकावर आहे. सोमवारी अमरावती शहराचं तापमान 44.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. एप्रिल महिन्यातील सर्वात उच्चांक तापमान हे काल नोंदवलं गेलंय. पुढील काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
पालघरमध्ये एका तरुणाचा मृतदेह पिंपळाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. बोईसर शहरातील चित्रालय परिसरातील हनुमाननगर इथली ही घटना आहे. बोईसर पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून तरुणाची आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत.
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. डॉ. वळसंगकर यांनी आत्महत्या कारण्यापूर्वी आपल्या मृत्युपत्रात बदल केल्याची सूत्रांची माहिती आहे. तर पोलिसांकडून डॉ वळसंगकर यांचे पुत्र अश्विन आणि सून शोनाली यांची चौकशी करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी, ढगफुटी, अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे अनुदान मंजूर करण्यात आलं होतं. मात्र हे अनुदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाटल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. यामध्ये शेतकऱ्यांचे अनुदान लाटणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अंबड आणि घनसावंगी तालुक्यात 31 मार्चपर्यंत 12 हजार शेतकरी बोगस आढळून आले होते. मात्र त्यात आता वाढ झाली असून 15 एप्रिलपर्यंत ही संख्या 25 हजारांवर गेली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं अनुदान लाटण्याचा आकडाही 50 कोटींवरून 57 कोटींवर गेल्याचं समोर आलंय.
पुणे- राजेंद्र घनवट यांची पत्नी मनाली घनवट यांचं निधन झालं आहे. पुण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात अकस्मात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या मृत्यूचं कारण अजून अस्पष्ट आहे. राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपनीत संचालक आहेत. राजेंद्र घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या असून या जमिनींची चौकशी व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महसूल मंत्र्याकडे मागणी केली आहे.