
राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर शिवसेना शिंदे गटाला देखील मोठं यश मिळालं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये राज्यात भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले तर शिवसेना शिंदे गट या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. दरम्यान मुंबईमध्ये देखील भाजपला चांगलं यश मिळालं, मुंबई महापालिकेत भाजपला 89 जागा मिळाल्या आहेत, मात्र जरी असं असलं तरी देखील भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही, त्यामुळे मुंबईत महापौरपदासाठी आता भाजपला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये नेऊन ठेवले आहेत. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटाकडून भाजपकडे अडीच वर्षांसाठी महापौर पदाची मागणी करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
महापालिका निवडणुका पार पडल्या, राज्यभरात शिवसेना नंबर दोनवर आहे. आम्हाला राज्यात 402 ठिकाणी विजय मिळाला आहे. आमच्यावर जे आगपाखड करत होते, त्यांना 100 देखील जागा मिळाल्या नाहीत. आम्ही नगरसेवकांना हाॅटेलमध्ये ठेवलं त्यावरून उलट सुलट चर्चा सुरूआहे. मात्र जे पूर्वी झालं तसं आता काही होणार नाही. आम्ही युतीत निवडणुका लढवल्या आहेत, काही लोकं आमची नाहक बदनामी करत आहेत. मात्र नाॅट रिचेबल कोण आहे? हे येणाऱ्या काळात कळेल. 2019 मध्ये उठाव झाला, त्यातून काहीतरी आत्मचिंतन करणं गरजेचं होतं, असं म्हणत त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक पक्षातील नेत्यांना वाटतं आपला महापौर व्हावा
आम्ही माध्यमांमध्ये काही चर्चा पाहात आहोत. निवडणुकीत जिथे कुठे आमचं चुकलं, त्याचं आम्ही नक्कीच आत्मपरीक्षण करू, ज्यानी 2019 मध्ये निवडणुकीत युतीत लढून काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला, त्यांच्यामुळे राज्यात एमआयएमची ताकद वाढली. मुंबईतही वाढली, असा हल्लाबोल यावेळी उदय सामंत यांनी केला आहे. ही आमची उठावानंतर पहिली महापालिका निवडणूक होती, अनेक ठिकाणी चांगला निकाल आला, जिथे कमी पडलो त्याचं आत्मपरीक्षण करू, असं यावेळी उदय सामंत यांनी म्हटलं आहे.