…म्हणून त्यांना हॉटेलमध्ये बंदीस्त करून ठेवले असेल, भाजपाच्या बड्या नेत्याचा दावा
जागावाटप संदर्भात काही ठरले नसले तरी दोन-चार दिवसात युतीचा निर्णय लावायचा आहे, आणि जास्त काळ रेंगाळत ठेवायचं नाही, कारण आम्हाला तयारी करायची आहे आणि आज पासून युतीच्या बोलणीला सुरुवात होणार आहे असेही यावेळी या नेत्याने स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर : सगळ्या देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगर पालिका निवडणूकीत भाजपा महायुतीला मोठे यश मिळाले आहे. राज्यातही २९ पैकी २४ महानगर पालिकात महायुतीचे सरकार येत आहे.एकीकडे मुंबई महानगर पालिकेच्या महापौर पदाची निवडणूक होणार असताना महायुतीचे घटक पक्ष एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड एण्ड हॉटेलमध्ये बंदीस्त केल्याने चर्चांना ऊत आला आहे. असे असताना आता भाजपाच्या बड्या नेत्याने यावर भाष्य केले आहे.
मुंबई महानगर पालिकात २५ वर्षांनंतर शिवसेनेची अनभिषिक्त सत्ता जाऊन भाजपाचा महापौर बसवण्याची तयारी सुरु झाली असताना आता वेगळेच नाट्य कालपासून सुरु आहे.मुंबई महापालिकेत २२७ जागांपैकी महायुतीने ११८ जागा जिंकल्या आहेत. याच एकट्या भाजपाचा ८९ जागांवर विजय होत, तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने २९ जागा जिंकल्या आहेत. या २९ नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड एण्ड हॉटेलमध्ये बंदीस्त केले आहे. या संदर्भात भाजपाचे नेते, खासदार भगवान कराड यांना विचारले असता ते म्हणाले की मुंबईमध्ये युतीचाच महापौर होईल, परंतु महापौरांचा कालावधी किती असावा हे सर्व प्रदेश भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडवणीस ठरवतील, त्यावर आम्ही टिप्पणी करणे योग्य नाही अशी सावध प्रतिक्रिया कराड यांनी दिली आहे.
एकनाथ शिंदे यांची अडीच वर्षाची मागणी
शिंदे यांनी महापौर पद अडीच वर्षे मिळावे अशी मागणी केली आहे. कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे शताब्दी वर्षे येत असल्याने या वर्षात महापौर शिवसेनेचा झाला तर बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण होईल अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे. यावर कराड यांना विचारले असता ते म्हणाले की,’ आम्हाला ते वर्तमानपत्रातून कळले आहे, एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षे महापौर पदाची मागणी केली आहे. यामध्येही दोन्ही नेते ठरवून निर्णय घेतील असे कराड यांनी स्पष्ट केले.
महापौर हा महायुतीचाच होणार आहे. परंतू नगरसेवकांची ओळख व्हावी, आपसात नाती जोडावी म्हणून त्यांना हॉटेलमध्ये ठेवले असावे, असे आपण पेपरमध्ये वाचले आहे. परंतु याचा दुसरा अर्थ असू शकत नाही असे भागवत कराड यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले की परंतू आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की,महापौर महायुतीचाच होईल आणि शिंदे सेना आणि भाजप एकत्र येऊन महापौर करतील.
राष्ट्रवादीचा नारा एक आहे तर सेफ आहे..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारा दिला होता, “एक आहे तर सेफ आहे” त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक झाल्या तरी महायुतीला काही फरक पडणार नाही. परंतू अजितदादा आमच्यासोबत आहेत, त्यामुळे ते कधीही महायुतीला सोडून जातील असे मला वाटत नाही असेही कराड यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हा परिषद निवडणूक
छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेचा 16 तारखेला निकाल लागल्यानंतर रात्री प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत बावनकुळे यांची बैठक झाली आणि काल ऑनलाईन कोअर कमिटीची बैठक होऊन आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी आम्ही बैठक घेतल्याचे कराड यांनी यावेळी सांगितले. आमचे 63 जिल्हा परिषद सर्कलमध्ये उमेदवार इच्छुक आहेत, तसेच 126 पंचायत समिती सर्कलसाठी अर्ज मागवले आहेत आणि उद्यापासून मुलाखतीला सुरुवात होणार असल्याचे भगवान कराड यांनी सांगितले.
परंतू यावेळेस आम्ही इच्छूक उमेदवारांना स्पष्ट सांगितले आहे की ज्यांना बी फॉर्म मिळेल त्यांनीच उमेदवारी अर्ज भरायचा आहे. आणि ज्यांना बी फॉर्म मिळणार नाही त्यांनी सरळ भाजपाचे काम करायचे आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी बऱ्याच जणांनी अपक्ष फॉर्म भरले आणि त्यांना समजावण्यात आमचा वेळ गेला आणि आता तशी परिस्थिती होऊ नये अशी आम्ही काळजी घेतल्याचेही ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्षाकडून आम्हाला निरोप आला आहे की युतीसाठी बैठका करा. आमचे ग्रामीणचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाप्रमुखांसोबत बसून युतीची बोलणी सुरू करणार आहोत.भाजपा पुढाकार घेत शिवसेनेच्या दोन्ही जिल्हाध्यक्ष सोबत युती संदर्भात बोलणी करणार आहे आणि आमची मागणी काय आहे सांगणार आहोत. पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, मी स्वत: भागवत कराड, संदिपान भुमरे अशी कोअर कमिटी आहे, ज्यामध्ये चार- चार नाव आहेत आम्ही युती संदर्भात बोलणी करणार आहोत.
