
शिंदेंची शिवसेना नाहीच, तो एसंशि गट (एकनाथ शिंदे गट) आहे. ती शहांची कपटनिती आहे, तोडा, फोडा आणि राज्य करा ही त्यांची निती. त्याला मी काही यश मानत नाही. आतासुद्धा जे चाललं आहे. धाक दपटशाह, जोरजबरदस्ती. जे बिनविरोध लोक निवडून येत आहे. बिनविरोध निवडणुका होत आहेत, आत्तापर्यंत असे लोक निवडून येत नव्हते. पण आम्ही त्याच्यावरती टीका केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मिरचीची धुरी का लागली ? असा सवाल विचारत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं. टीव्ही9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमित शाह, भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीसाठी प्रचार निर्णायक टप्प्यात आला असून राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारील मतदान तर 16 तारखेला मतमोजणी होईल. मात्र या निवडणुकीच्या आधीच अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले असून तो मुद्दा गाजतोय. महायुतीचे 60 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात भाजप आणि एकनाथ शिंदे नगरसेवकांची संख्या जास्त आहे. टीव्ही 9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्यांवरून निशाणा साधला.
आमचा एकही माणूस बिनविरोध कसा नाही ?
फडणवीस हे सत्तेचा दुरूपयोग करत आहेत, त्यांचे जे आरओ असतील, त्यांना कोणत्या मंत्र्यांचे फोन गेले, काय बोलणं झालं ते चेक करा. बिनविरोध निवडणूक करायची असेल तर मग आमच्यापैकी एकही माणूस बिनविरोध निवडून कसा आला नाही ? असा बिनतोड सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. तसं बघितलं तर मग सगळ्याच पक्षांचे लोक बिनविरोध निवडून यायला पाहिजेत ना . बिनविरोध करायाल राहुल नार्वेकर स्वत: तिथे जातात. त्यामुळे आता अक्षरश: मिरचीचा मसाला देवेंद्र फडणवीसांच्या डोळ्यात गेलाय असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला. आम्ही मिरची लावल्यावर काय होईल ते पाहा. आम्ही मिरच्या लावल्या तर यांना कुठे कुठे झाकावं लागेल ते पाह असंही ते म्हणाले.