
Uddhav Thackeray : विरोधकांच्या सत्याच्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले होते. या मोर्चात वैचारिक मतभेद विसरून सर्व विरोधक एकत्र आले होते. याच मोर्चात मतदार याद्या अगोदर स्वच्छ करा. मतदार याद्यातील घोळ मिटवा नंतरच निवडणूक घ्या, अशी मागणी करण्यात आली. यावेळी मतदार याद्यांमध्ये कसा घोळ केला जातोय, याचे काही पुरावेही सादर करण्यात आले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तर त्यांच्यासोबतच घडलेल्या एका अजब प्रकाराची माहिती दिली. माझे तसेच संपूर्ण ठाकरे कुटुंबाचे नाव मतदार यादीतून हटवण्यासाठी मोठा कट रचला जातोय, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर आता मतदार याद्यांसंदर्भातील आरोपांना एका प्रकारे बळच मिळाल्याचे बोलले जात आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मतचोरी होत असल्याचा आरोप केला. सोबतच त्यांनी मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे. अनेकांची नावे दोन ठिकाणी आहेत. काही मतदारांचा पत्ता व्यवस्थित नाही, तर काही मतदारांचे नाव बरोबर नाही असा दावा ठाकरे यांनी केला. हे सांगताना ठाकरे यांनी स्वत:सोबत घडलेल्या प्रसंगाचीही माहिती दिली. माझे तसेच ठाकरे कुटुंबाचे नाव मतदार यादीतून हटवण्यासाठी कट रचण्यात आला, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. दोन दिवसांपूर्वी मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसे आली होती. मी त्यांना बोलावलं त्यांना सांगितलं काय माहिती पाहिजे. मी म्हणालो तुम्हीच सांगा तुम्हाला काय हवंय. ते म्हणाले की टेलिफोन नंबर खोटा आहे. मी अनिल परब, सुरज, अनिल देसाईंना विचारलं. आम्ही कोणीही निवडणूक आयोगाकडे अर्ज केला नाही. माझ्या नावाने कालच्या 23 तारखेला अर्ज केला गेला. सक्षम नावाच्या अॅपवरून हा अर्ज करण्यात आला.
हा प्रकार समजल्यानंत मी रितसर तक्रार केली. माझ्या नावाने खोट्या मोबाईल क्रमांकाच्या मदतीने ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला. कदाचित १४ किंवा १५ तारखेला हे काम केलं गेलं. म्हणजे माझ्यासकट घरातील चारही लोकांची नावे मतदार यादीतून बाद करण्याचा हा डाव आहे. हे कोणी केलं याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच मी पक्षाचा प्रमुख आहे. आम्हाला या गोष्टी नाही कळत? असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला.