Raj Thackeray: अरे मग थांबवलंय कोणी…लपून छपून…सत्याच्या मोर्चात राज ठाकरेंचा हल्लाबोल, महायुतीवर संतापले!
विरोधकांच्या सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. या भाषणात राज ठाकरे यांनी सत्ताधारी यांच्यावर सडकून टीका केली आहे. मतदार याद्या स्वच्छ केल्यानंतरच निवडणुका घ्या, अशी मागणी त्यांनी केली.

MNS MVA Mumbai Protest : मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चात हजारो लोक सहभागी झाले. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तसेच अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या मोर्चाच्या माध्यमातून मतदारयाद्या स्वच्छ करा, दुबार मतदारांची नावे हटवा, या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली. राज ठाकरे यांनीदेखील जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी महायुतीवर सडकून टीका केली. मतदार याद्यांतील घोळ संपवल्याशीवाय निवडणुका घेऊ नका, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
अरे तुम्हाला मग आडवलं कुणी
एखादे वर्ष निवडणूक लांबवली तर काही फरक पडणार नाही. अगोदर मतदार याद्या स्वच्छ करा. शेकडो दुबार मतदार आहेत. मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. तुम्ही ताकदीने मोर्चाला जमले आहात. मतदार याद्यांचा हा विषय फार मोठा नाही. आम्ही बोलत आहोत. उद्धव ठाकरे बोलत आहेत. शरद पवार बोलत आहेत. यात दुबार मतदार आहेत, असे सांगत आहोत. शेतकरी कामगार पक्ष बोलत आहे. कम्युनिस्ट पार्टी, काँग्रेसचे लोक बोलत आहे. भाजपचे लोकही बोलत आहेत दुबार मतदार आहेत. शिंदेंची लोक बोलत आहेत. अजित पवारांचे लोक बोलत आहेत दुबार मतदार आहे, असे म्हणत अरे तुम्हाला मग आडवलं कुणी. निवडणूक घेण्याची घाई का करत आहात, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
मतदार याद्या साफ केल्यावर निवडणूक घ्या
साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा. मतदार याद्या साफ केल्यावर निवडणूक घ्या. यश कुणाचं अपयश कुणाचं मान्य होईल. सर्व लपूनछपून करण्याची गरज काय. कल्याण ग्रामीण, डोंबिवली, भिवंडी आणि मुरबाड भागात ४ हजार ५०० मतदार हे दुबार आहेत. इकडच्या मतदारांनी मलबार हिल मतदारसंघातही मतदान केलं आहे. असे लाखो लोक आहेत महाराष्ट्रात की जे या मतदानासाठी वापरले गेले, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
