
Uddhav Thackeray On Loan Waiver : अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी पुरता खचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी करण्यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने 30 जून 2026 पर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करू, असे सांगितले आहे. बच्चू कडू यांनी सरकारच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. परंतु विरोधकांनी मात्र सरकार वेळकाढूपणा करत आहे. शेतकऱ्यांना झुलवत ठेवले जात आहे, असा आरोप केला आहे. असे असतानाच माजी मुख्यमंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार उद्धव ठाकरे यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी तत्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना फसवण्याचा खेळ बंद करा, असेही ठाकरेंनी सरकारला सुनावले आहे.
कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभार चालू आहे. अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्च्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जुनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असे अनेक सवाल उद्धव ठाकरेंनी केले आहेत.
इतर मदत करण्याआधी खरडून गेलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी माती मागतो आहे. पण त्याविषयी सरकार काहीच करायला तयार नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज भयंकर संकटात सापडला आहे. पाऊस अजूनही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. सरकारने हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली; पण शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे, असे म्हणत ठाकरेंनी सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.
महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो आहे. शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाल 1 आहे. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी ‘योग्य वेळ’ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे. मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्च्या कानावर आदळत नाहीत काय? तरीही सरकारने कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा, हे चीड आणणारे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. जूनपर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय? असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
यासह, सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्ताच्या हालअपेष्टा तशाच राहणार, पुढच्या जूनचा गुळ सरकारने शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता आवाज करायचा नाही, असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकऱ्यांना फसवण्याचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार ठाकरेंच्या या भूमिकेवर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.