
शिवसेनेत फूट पडल्यानंतर डोंबिवली शहरातही मोठा उलटफेर झाला होता. ठाणे जिल्ह्यावर एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असल्याने या फूटीचा डोंबिवली शहरातही परिणाम झाला होता. डोंबिवली तसा भाजपाचा बाले किल्ला मानला जातो. येथे पूर्वीपासून संघाचे प्राबल्य राहिलेले आहे. आता डोंबिवली शहरात मोठी घडामोड घडली आहे. भाजपाच्या माजी नगरसेवकाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे माजी नगरसेवकाचा आता ठाकरे गटात प्रवेश होणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्याची पत्नी कविता म्हात्रे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे.नुकताच भाजपाचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना पक्षाकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. त्यामुळे या भेटीकडे राजकीय दृष्टया पाहिले जात आहे. विकास म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार? अशी चर्चा आता डोंबिवलीत रंगली आहे.
डोंबिवली भाजपमधील मोठा भूकंप घडवणाऱ्या माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे यांनी काल पक्षाला राजीनामा दिल्यानंतर आज आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपेश म्हात्रे यांनी आज विकास म्हात्रे यांच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतल्याने कविता मात्रे आणि विकास म्हात्रे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार? अशी चर्चा रंगली आहे.
या वेळी आज विकास म्हात्रे यांच्या आईचे वर्षश्राद्ध असल्याने सदिच्छा भेट म्हणून आपण त्यांच्या घरी गेलो होतो. राजकीय चर्चा झाली नाही. पण लवकरच चांगली बातमी मिळेल अशा आशयाचे विधान दीपेश म्हात्रे यांनी मीडियाशी बोलताना केले आहे. जेव्हा एखादा नगरसेवक तळमळीने कामासाठी पक्षाला साकडे घालत असतो आणि त्याला प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा त्याने निर्णय घेणं योग्यच आहे. विकास म्हात्रे आमचे नातेवाईक आहेत. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. योग्य मानसन्मान देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही दीपेश म्हात्रे यांनी म्हटलं आहे.
लवकरच उद्धव ठाकरे डोंबिवलीत येणार असुन मोठा जल्लोष होणार असल्याचे सुतोवाच दीपेश म्हात्रे यांनी केल्याने काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागले आहे.