
Solapur Zilla Parishad Election 2026 : महापालिकेची रणधुमाळी संपल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. राज्यात वेगवेगळ्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. 27 जानेवारी रोजीपर्यंत इच्छुकांना अर्ज करता येणार आहेत. तर 5 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. तर 7 फेब्रवारी रोजी मतमोजणी म्हणजेच निकाल जाहीर केला जाईल. दरम्यान, या निवडणुकीमुळे जिल्हा पातळीवरील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. अनेक बडे नेते सोईच्या पक्षात उड्या मारत आहेत. तर राजकीय शत्रूत्त्व निभावण्यासाठी आणि विजयाचे गणित साधण्यासाठी जमेल त्या पद्धतीने युती आणि आघाडी केली जात आहे. दरम्यान, याच शह आणि काटशहाच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबर धक्का बसला आहे. ठाकरे गटाने काँग्रेसची साथ सोडत थेट भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे आता निवडणुकीचे सगळे गणितच बदलून जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्य मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही तास शिल्लक राहिलेले असताना ठाकरे गटाने मोठी राजकीय खेळी केली आहे. येथे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपाला पाठिंबा दिला आहे. अक्कलकोटमध्ये जिल्हा परिषदेसाठी काँगेसने शिंदे गटाच्या शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुखाने थेट भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज मागे घेत थेट पदाचा राजीनामाही दिला आहे. तसेच भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटाच्या या निर्णयानंतर आता अक्कलकोट जिल्हा परिषदेची राज्यभरात चर्चा होत आहे. हा निर्णय घेतल्यानंतर आनंद बुक्कानुरे यांनी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या विचाराला हारताळ फासल्याने आम्ही अर्ज मागे घेतले असून पक्षाचा राजीनामा दिला आहे. तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगितले आहे.