
आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी या मोर्चाच आयोजन करण्यात आलं आहे. त्या संदर्भात खासदार आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत बोलले आहेत. त्यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर नेहमीप्रमाणे टीकेचे जोरदार बाण चालवले. “मोर्चावर टीका टिप्पणी करणं हा महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे. आजचा हंबरडा मोर्चा जो आहे, हा शेतकऱ्यांचा आक्रोश, हंबरडा फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत नाही, तर महाराष्ट्रातील आक्रोश, हंबरडा दिल्लीपर्यंत पोहोचावा यासाठी हा मोर्चा आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“कशाप्रकारे शेतकऱ्याची फसवणूक सुरु आहे, कशाप्रकारे शेतकऱ्याच्या हालपेष्टा सुरु आहेत. कशाप्रकारे शेतकऱ्याला फसवलं जातय. सुल्तानी-अस्मानी दोन संकटांशी सामना करताना मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करत आहे. पॅकेजच्या नावाखाली कशी धुळफेक केली जातेय” अशी संजय राऊत यांनी टीका केली. “31 हजार कोटींच पॅकेज देवेंद्रजी मला सांगा, हे पॅकेज फार-फार तर साडेपाच ते सहा हजार कोटींच आहे. बाकी धुळफेक आहे, यावर मी आता बोलणार नाही” असं संजय राऊत म्हणाले.
‘भाजप ठेकेदारांचा पक्ष’
“प्रचंड मोठा मोर्चा होईल. आमचा आक्रोश, हंबरडा देवेंद्रजींपर्यंत गेला तर ते विचार करतील. भारतीय जनता पार्टी निगरगट्ट मनाचा पक्ष आहे. ठेकेदारांचा पक्ष आहे. त्यांना शेतकऱ्यांची कुठे चिंता आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “उद्धवजी येत आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा होईल. मराठवाड्यातील, राज्यातील शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत. काय केलं मला सांगा ना, 50 हजार हेक्टरी मागणी आहे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली का?. कर्जमाफी मागणी आहे, दिली का?. आम्ही जिवंतच आहोत. तुमच्या छाताडावर बसलो आहोत, म्हणून तुम्हाला आमची भिती वाटते” असा दावा संजय राऊत यांनी केला. MIM ने म्हटलय की तुम्ही बोलावलं तर आम्ही मोर्चात सहभागी होऊ. त्यावर संजय राऊत म्हणाले की, या मोर्चाचे आयोजक अंबादास दानवे आहेत. आमचे तिथले नेते चंद्रकांत, तिथले आमदार-खासदार आयोजक आहेत.