निर्मला सितारमण पेपरफुटीचे फायदे सांगताहेत, तर राजनाथ सिंह….; उद्धव ठाकरे शिवाजी पार्कातून कडाडले
निर्मला सितारमण पेपरफुटीचे फायदे सांगताहेत, तर राजनाथ सिंह....; उद्धव ठाकरे शिवाजी पार्कातून कडाडले

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंनी जल्लोष केला. शिवाजी पार्कातील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला. धर्मेंद्र प्रधान यांना वाचवण्यासाठी निर्मला सीतारमण पेपरफुटीचे फायदे सांगत होत्या. तर राजनाथ सिंह हे प्रधानांचं संरक्षण करत होते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
दादरमधील जल्लोष सभेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आज केवळ अभिनंदन करत नाही, तर देशभक्तांना अभिवादन करत आहे. आज कोणतीही निवडणूक कोणीही जिंकले नाहीत. तर अंधभक्तांच्या विरोधात देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षांची सुरुवात झाली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध देशभक्त असा झाला आहे. आपण सर्वज जातपात धर्म, पक्ष विसरून देशभक्ताच्या भावनेने सहभागी झालात. एका झुरळाने हुकूमशहाला नमवलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे’.
‘मोदीजी देशाकडे लक्ष द्या. तुमचे मंत्री पक्ष फोडण्यात व्यग्र आहे. आता देशाकडे लक्ष द्यावे. तुमच्या अर्थमंत्री रुपयाबद्दल बोलत नाहीत. महागाई बद्दल बोलत नाही. पण पेपरफुटीचे फायदे सांगतात. राजनाथ सिंह हे संरक्षण मंत्री आहेत. पण प्रधानांच्या संरक्षणासाठी पुढे आले. खड्डामंत्री..नाही…रस्ते मंत्री इथेनॉलवर बोलत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिमंडळातून काढताना मोदींना यातना झाल्या. त्याहून जास्त यातना आत्महत्या केलेल्या मुलांच्या आई-वडिलांना झाल्या आहेत, असे ते म्हणाले.
‘आम्ही यातना विसरू शकत नाही. देशात ठिणगी पडली आहे. देशात वणवा पेटला आहे. लगेच म्हणतात, निवडणुकीला तीन वर्ष आहेत. निवडणुका गेल्या खड्ड्यात. कारण मोदींनी पाहिलं की, मत चोरी करता येते. पण माणसं आणि मन चोरी करता येत नाहीत. मन ही पेटली आहेत. ही ठिणगी जागती ठेवा. सोशल मीडियावर सर्व अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. या अंधभक्तांना राष्ट्रभक्ती शिकवा. कधी कधी शब्दांपेक्षा स्थिती महत्त्वाची ठरते. तुम्ही देशातील इतिहासातील सुवर्ण पान लिहिलं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा वंदन करतो, असे त्यांनी पुढे सांगितले.