Uddhav Thackeray : मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंच सूचक वक्तव्य, ‘जे महाराष्ट्राच्या मनात ते..’
Uddhav Thackeray : "काही जण तिकडे जातात. तिकडे गेल्यावर काहींना पश्चात्ताप होतो. पण तुम्ही जे धाडस आणि हिंमत दाखवली ते फार कमी लोकांमध्ये आहे. लाचारांमध्ये धाडस राहत नाही. तुम्ही अनुभव संपन्न झाला आहात. तुम्ही आणखी जोरात काम कराल" असं उद्धव ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत गेलेल्या सुजाता शिंगाडे यांनी आज पुन्हा उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. मातोश्रीवर हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. त्यानंतर उद्धव ठाकरे मीडियाशी बोलले. “सुजाता ताईंनी त्यांच्या भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्या. त्या शिवसेना सोडणार हे ऐकून धक्का बसला. वाईट वाटलं. ठिक आहे. तो इतिहास झाला आहे. तिथे बेबंदशाही पाहिली. कशासाठी लोक तिकडे जात आहेत हे तुम्ही जवळून पाहिलं. तिथे तुम्ही कुणाशी जुळून घ्याल असं वाटत नव्हतं. वातावरण विचित्र होतं. काही जण तिकडे जातात. तिकडे गेल्यावर काहींना पश्चात्ताप होतो. पण तुम्ही जे धाडस आणि हिंमत दाखवली ते फार कमी लोकांमध्ये आहे. लाचारांमध्ये धाडस राहत नाही. तुम्ही अनुभव संपन्न झाला आहात. तुम्ही आणखी जोरात काम कराल” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युती संबंधी पत्रकारांनी विचारलं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बघु, जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल’. उद्धव ठाकरे यांनी एका वाक्यात या प्रश्नाच उत्तर दिलं. “बाकीचे बारकावे आम्ही पाहत आहोत. सुजाता ताई आज आपल्या घरी आल्या आहेत. ती महत्त्वाची बातमी आहे. त्यांचा पुनरप्रवेश हा तमाम शिवसैनिकांसाठी संदेश आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संदेश कशाला? मी बातमीच देईन
मनसे-ठाकरे गटाच्या युतीवर तुम्ही काय संदेश द्याल? यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “संदेश कशाला? मी बातमीच देईन तुम्हाला. माझ्याकडे शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही सैनिक आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही सैनिकांमध्ये संभ्रम नाही. आम्ही जी बातमी द्यायची ती देऊ”
संजय राऊत आज काय म्हणालेले?
राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे, असे मोठे वक्तव्य आज संजय राऊत यांनी केले. “आम्ही सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे तुम्ही हे समजून कसं घेत नाही. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे. आम्ही सकारात्मक आहोत. राज ठाकरे सकारात्मक आहेत, त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. उद्धव ठाकरे सकारात्मक आहेत. अत्यंत सकारात्मक असल्यामुळे जमिनीवरच्या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच मनोमिलन झालं असेल, त्याच्यामध्ये चिंतेच कारण काय” असे राऊत म्हणाले.
