
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाबेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत असून शेतकऱ्यांशी चर्चा करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे शेतकरीही उत्साही असल्याचे दिसत आहे. आज एका आजीने आपुलकीने उद्धव ठाकरे यांना शिदोरी दिली. तसेच काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना सरकारकडून मिळालेला खराब तांदुळदेखील दाखवला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिवमधील काही गावांमध्ये जाऊन शेतमालाची पाहणी केली. यावेळी पाथरूडमधील एका आजींनी शिदोरी दिली. यावेळी भाषण करताना धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की, काहीजण म्हणतात निवडणुका आहेत म्हणून दौरा सुरु आहे. पण मला ऐवढं सांगायचं आहे की जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. मला शेतकऱ्यांना विचारायचं आहे, आताच्या दिवाळीला आनंदाचा शिधा मिळाला का? हीच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी साहेब इथे आले आहेत.
यावेळी बोलताना अनिले मोरे या शेतकऱ्याने म्हटले की, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या वतीने सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. 70 टक्के लोकांना आज रुपया मदत आली नाही, खात्यावर पैसे आले नाहीत. फार्मर आयडी अॅक्टिव्ह नाही यांचं कारण सांगितलं जातं. सरकार आम्हाला मुर्खात काढतंय. पंजाबच्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त मदत करणार म्हणाले होते, शेतकरी खूष झाला. पण 3 हजारच्या वर काही शेतकऱ्यांना रुपया आला नाही.
विश्वासघातकी महायुती सरकार आणि त्यांच्या पोकळ आश्वासनांमुळे बळीराजा पुरता खचलाय. त्याला धीर देण्यासाठी आज भूम तालुक्यातील पाथरुड ह्या गावी पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शेतकरी मायबापासोबत संवाद साधला.
काहीही झालं तरी नुकसान भरपाई आणि कर्जमुक्ती मिळवून घ्यायचीच, हा… pic.twitter.com/JWvu9r6GTb— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 5, 2025
या भागात सोयाबीन कांदा, ऊस, तूर ही पीकं आहेत, सोयाबीनचा भाव साडेतीन हजार, सर्व माल शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या खिशात घातला. काही शेतकऱ्यांचं पीक निघालं, बाकी सगळ्यांचं वाहून गेलं. सोयाबीनचा एकरी खच 25 हजार आहे आणि आम्हाला पट्टी 23 हजार येते. कांद्याचीही तीच परिस्थिती आहे. नवीन कांद्याचा भाव आहे 10 रुपये. दुध प्रमुख व्यवसाय आहे, भूम तालुका 1 नंबर होता. दूध आता 25 टक्क्यावर आलंय. आम्हाला कर्ज माफी करु नका, जगाची बाजारपेठ आमच्यासाठी खुली करा अशी मागणी यावेळी मोरे यांनी केली.