
मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच मुंबईत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक लोक पक्षांतर करताना दिसत आहेत. काही पक्ष स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत. तर काही पक्षांनी युती, आघाडी करूनच लढण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना मोठा झटका दिला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या हक्काची माणसं म्हणून ज्या डबेवाल्यांकडे पाहिलं जात होतं, त्यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त करत डबेवाल्यांनी त्यांना जय महाराष्ट्र केला असून देवेंद्र फडणवीस यांना भरभक्कम साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेना, मराठी माणूस, कोळी बांधव आणि डबेवाले हे मुंबईतील समीकरण आहे. आता याच समीकरणाला पहिली चूड लागली आहे. डबेवाल्यांनी साथ सोडल्याने ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील हजारो डबेवाल्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. डबेवाला असोसिएशनने महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. गेल्या निवडणुकीत ठाकरेंनी वचनांची पूर्तता न केल्याचा आरोप करत डबेवाला असोसिएशनने त्यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरे गटाची मोठी अडचण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकही घोषणा पूर्ण नाही
डबेवाला संघटनेचे नेते सुभाष तळेकर यांनी आज आपली भूमिका जाहीर केली. ही भूमिका जाहीर करताना त्यांनी ठाकरे गटावर नाराजी व्यक्त करतानाच ठाकरेंवर आरोपही केले आहेत. 2017च्या वचननाम्यामध्ये शिवसेनेने डबेवाल्यांना अनेक आश्वासने दिली होती. त्यात डबेवाल्यांसाठी कंपनी स्थापन केली जाईल, त्या कंपनीला 5 कोटी रुपये भाग भांडवल दिलं जाईल आणि त्या माध्यमातून डबेवाल्यांसाठी कामे केली जातील. डबेवाल्यांच्या मुलांच्या आरोग्यासाठी योजना राबवल्या जातील. डबेवाल्यांसाठी स्टेशनच्या बाहेर सायकल स्टँड उभे केले जातील अशा विविध घोषणा केल्या होत्या. पण त्या पूर्ण केल्या नाहीत, असं सुभाष तळेकर यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरे अडीच वर्ष…
आम्हाला डबेवाला भवनही देणार होते. या पाच वर्षात शिवसेनेकडे मुंबई महापालिका होती. नाही म्हणायला उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते. पण या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. डबेवाल्यांच्या घरांचा प्रश्नही प्रलंबित होता. नाही म्हणायला डबेवाला भवन दिलं. पण बाकीच्या मागण्या प्रलंबितच आहेत, असा आरोप तळेकर यांनी केला.
घराचा प्रश्न सुटला
आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक निर्णय घेतला आहे. फडणवीस यांनी डबेवाल्यांना दिवेअंजूर येथे 25 लाखात घर देण्याची घोषणा केली आहे. तसे म्हाडाला निर्देश दिले आहेत. डबेवाल्यांच्या घराचा प्रश्न त्यांनी सोडवला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या पाठी उभं राहून त्यांना पाठिंबा देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.