AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : अचानक धूर आला, त्याने गाडी थांबवली अन् 10 सेकंदात...; धावत्या कारमध्ये अडकलेल्या 4 जणांसोबत काय घडलं?

VIDEO : अचानक धूर आला, त्याने गाडी थांबवली अन् 10 सेकंदात…; धावत्या कारमध्ये अडकलेल्या 4 जणांसोबत काय घडलं?

| Updated on: May 11, 2026 | 7:53 AM
Share

उल्हासनगरमधील शहाड पूर्व भागात धावत्या टोयोटा क्रिस्टा कारला भीषण आग लागली. यावेळी चार प्रवाशांनी वेळीच गाडीतून उडी मारल्याने प्राण वाचले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

राज्यात सध्या उष्णेतेचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी धावत्या गाड्यांना आग लागत असल्याच्या घटना घडताना दिसत आहे. त्यातच उल्हासनगर शहरात शुक्रवारी दुपारी एका धावत्या टोयोटा क्रिस्टा कारला अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर ही घटना घडली. यावेळी कारमधील चार प्रवाशांनी प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला. या भीषण आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उल्हासनगरातील क्रिस्टा कार पॅराडाईज प्लाझा परिसरातील मुख्य रस्त्यावरून जात होती. अचानक चालकाच्या लक्षात आले की कारच्या हुडमधून धुराचे लोट येत आहेत. त्याने तात्काळ गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, पण काही समजण्याच्या आतच आगीने रौद्र रूप धारण केले. यावेळी गाडीत बसलेल्या चारही जणांनी क्षणाचाही विलंब न लावता दरवाजे उघडून बाहेर धाव घेतली. ते बाहेर पडताच संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

परिसरात घबराटीचे वातावरण

या कारने भरवस्तीत आणि मुख्य रस्त्यावर अचानक पेट घेतल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे काळे लोट दूरवर दिसत होते, ज्यामुळे रिलायन्स डिजिटल समोरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. जवळच असलेल्या दुकानदार आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अग्निशमन दलाची कारवाई

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी वाहतूक थांबवली आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग इतकी भीषण होती की तोपर्यंत गाडीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता.

आगीचे कारण काय?

प्राथमिक अंदाजानुसार, इंजिनमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे वायरिंग गरम होणे किंवा तांत्रिक बिघाड हे यामागचे कारण असू शकते. सुदैवाने, कारमधील प्रवाशांनी वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे ते चार जण मोठ्या संकटातून बचावले. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

विक्रोळीत बर्निंग कारचा थरार

दरम्यान मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास विक्रोळी येथील गांधीनगर पुलावर एक भीषण अपघात झाला. सायनकडून मुलुंडच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या एका कारने आपल्या पुढील वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक देणारी कार जागीच पलटी झाली. त्यानंतर काही वेळातच त्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली. यावेळी काही मिनिटातच संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पोहोचली आणि पाहता पाहता गाडीचा कोळसा झाला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित बचावले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले, तर पोलिसांनी जळालेली कार आणि अपघातग्रस्त दुसरे वाहन बाजूला करून वाहतूक कोंडी कमी केली. या घटनेमुळे काही काळ मुलुंडकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र सध्या पोलिसांनी दोन्ही वाहने हटवून रस्ता सुरळीत केला असून स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक कायदेशीर तपास करत आहेत.

Published on: May 11, 2026 07:50 AM
Follow Us