कुणाचा लघवी करताना करंट लागून, तर कुणाचा वीज पडून मृत्यू, राज्यात अवकाळी पावसाचे 7 बळी
महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. अंबरनाथमधील तरुणाला आणि पुण्यातील १० वर्षीय मुलाला विजेच्या धक्क्याने जीव गमवावा लागला. पश्चिम विदर्भात २७६ गावांना पावसाचा फटका बसला असून, सात जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून उकाड्यामुळे वैतागलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण याच अवकाळी पावसाचा फटका बसून काहील जणांना जीवही गमवावा लागला आहे. पावसात लघवी करताना विजेचा झटका बसून अंबनाथच्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पुण्यात मुसळधार पावसात विद्युत पोलमध्ये करंट उतरून त्याचा शॉक लागल्याने अवघ्या 10 वर्षांच्या मुलाला जीव गमवावा लागला. अवकाळी आलेला पाऊस सर्वांसाठीच सुखद ठरलाय असं चित्र सध्या दिसत नाहीये.
पावसात लघवी करताना विजेचा झटका, अंबरनाथमधील युवकाचा दुर्दैवी मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, पाऊस सुरू असताना लघवी करायला गेलेल्या तरूणाला नाल्यात असलेल्या वीज प्रवाहाचा झटका लागला आणि त्याने जीव गमावला. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास अंबरनाथ पश्चिमेच्या नवीन भेंडीपाडा परिसरात घडली. यामध्ये विघ्नेश कचरे या 16 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. मात्र अवकाळी पावसामुळे अंबरनाथमध्ये तरुणाचा नाहक बळी गेला असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
पुणे विद्युत पोलचा शॉक लागून 10 वर्षाच्या मुलाने गमावला जीव
तर पुण्यात विद्युत पोलचा शॉक लागून दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मयंक प्रदीप आढागळे असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी येथे मुसळधार पावसात विद्युत पोल मध्ये करंट उतरला होता. मयंक याला पोलच्या करंटचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावात अवकाळी पावसाचा कहर
तर 1 ते 18 मे दरम्यान पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावात अवकाळी पावसाचा कहर झाला असून आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 771 घरांची पडझड झाली असून, 12 हजार 269 हेक्टर शेत जमीन बाधित तर 95 जनावरे दगावली आहेत. पावसामुळे संत्रा, कांदा ,पपई ,केळी ज्वारी ,भुईमूग सह आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा मोठा फटका बसलाय.
वादळी वाऱ्यामुळे जालना शहरात मोठे झाड कोसळले
जालना शहरात जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे एका कारवर निलगिरीचे मोठे झाड कोसळल्याची घटना समोर आली.सुदैवाने कार मधील बसलेले दोघ तिघ यामध्ये थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ या ठिकाणी टळला.शहरातल्या जे.ई.एस कॉलेज रोड वर ही घटना घडली असून काही वेळानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.तर दुसरीकडे विजेच्या तारावर देखील झाड कोसळल्याने काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता.