साहित्य संमेलनातच लसीकरणाचा मांडव, लस न घेतलेल्यांना जागेवरच डोस; शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर

साहित्य संमेलनात लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, अशी घोषणा यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. आता साहित्य संमेलनाच्या शेजारी चक्क लसीकरणाचा मांडव टाकण्यात येणार आहे. संमेलनस्थळी मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

साहित्य संमेलनातच लसीकरणाचा मांडव, लस न घेतलेल्यांना जागेवरच डोस; शाळांचा निर्णय 10 डिसेंबरनंतर
नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाचा लोगो.

नाशिकः साहित्य संमेलनात लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिले आहेत. आता साहित्य संमेलनाच्या (Sahitya Sammelan) शेजारी चक्क लसीकरणाचा (Vaccination) मांडव टाकण्यात येणार आहे. संमेलनस्थळी मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरनंतर घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. साहित संमेलन आणि आढळलेला नवा ओमिक्रॉन विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज सकाळी 11 वाजता तातडीचे बैठक बोलावली होती. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय, पोलीस, आरोग्य, सुरक्षा, महापालिका अधिकारी यांच्यासोबत संमेलन नियोजन समितीचे सदस्यही उपस्थित होते. नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कडक निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

लसीशिवाय प्रवेश नाही

जिल्हाधिकारी म्हणाले, साहित्य संमेलनाच्या ठिकाणी लसीकरणाशिवाय प्रवेश नाही. संमेलन स्थळी लसीकरणाची सुविधा असेल. फास्ट ट्रॅक प्रमाणे दोन प्रवेश द्वार असतील. 2 डोस घेतलेल्यांना प्रवेश, तर डोस न घेतलेल्यांनाच जागेवरच डोस देण्यात येणार आहे. ताप असेल तर तपासणी करूनच संमेलनाला यावे. ज्यांना त्रास जाणवत असेल त्यांनी येऊ नये. परिसंवादात येणाऱ्या वक्त्यांना देखील दोन डोस अनिवार्य केले आहेत. मास्कशिवाय साहित्य संमेलन स्थळी प्रवेश नाही. मास्क संमेलन स्थळी फेकू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

परिसर सॅनिटाइझ करणार

साहित्य संमेलनाच्या उपस्थितीवर पहिल्या दिवसापासून मर्यादा आहे. आता आसनव्यवस्थेत क्षमतेनुसार अंतर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दोन कार्यक्रमांच्यामध्ये संपूर्ण परिसर सॅनिटाइझ केला जाणार आहे. दोन डोस झाल्यानंतर देखील कोरोना होतो, पण त्याची तीव्रता कमी असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. शाळांबाबत 10 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल. पहिली लाट येताना जी काळजी घेतली, तशाच पद्धतीने काळजी घेणार आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिले. एअरपोर्ट प्रशासनाने स्व घोषणापत्र घ्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

तर निर्बंध लादणार

जिल्हाधिकारी म्हणाले की, साऊथ आफ्रिकेत स्पर्धा जिंकून आलेल्या स्पर्धकांच्या टेस्ट निगेटीव्ह आहेत. त्यांचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करतो आहोत. जे लोक स्वागत समारंभात उपस्थित होते, त्यांनी टेस्ट करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सीएम साहेबांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. ओमिक्रॉनचे 32 म्यूटन्ट आहेत. लगेच निर्बंध घातले जाणार नाहीत. मात्र, काळजी घेणे महत्वाचे आहे. संख्या वाढल्यास निर्बंध लादावे लागतील. आता मात्र पहिल्या लाटेसारखे सेन्सेटीव्ह व्हावे लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

इतर बातम्याः

साहित्य संमेलनात झणझणीत बेत; चक्क खान्देशी भरीत अन् कळण्याची भाकरी, सोबतीला अजून बरंच काही…!

आनंदवार्ताः नाशिक – कल्याण रेल्वेने सुस्साट, डिसेंबरमध्ये लोकलची चाचणी, नववर्षाचे गिफ्ट मिळणार?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI