
ठाकरे गटाने ज्या पद्धतीने कल्याण मतदारसंघातून वैशाली दरेकर-राणे या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली ही चांगली बाब असल्याचे म्हणत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांनी व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर-राणे यांना उमेदवारी देणं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे यांच्यातली नांदी समजावी का? असा खोचक सवाल वंचिक बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांनी केला आहे.
“एक प्रश्न आमच्या मनात उभा राहिला आहे तो आम्हाला उद्धवजींना विचारावासा वाटतो की, उद्धवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कल्याणमधून उभे आहेत आणि आम्ही असं ऐकलं होतं की, तुम्ही त्यांच्या विरोधात खुद्द आदित्य ठाकरे यांना तेथून उमेदवारी देणार आहात, पण काही काळानंतर आम्हाला कळलं की तुम्ही दुसरेच नाव पुढे केले. उद्धवजी ही तुमच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मैत्रीचे नांदी समजावी का?” असा प्रश्न नदाफ यांनी विचारला आहे.
“भविष्यामध्ये आपण हळूहळू एकत्र येण्याचा विचार करताय का? आणि जर असे असेल, तर तुम्ही जो हा मार्ग स्वीकारला आहे, जो मार्ग अवलंबला आहे याचे वंचित बहुजन आघाडी स्वागत करते. तुम्ही या पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा द्याल, एक नवीन मार्ग दाखवाल, अशी आम्ही अपेक्षा करतो आणि स्वागत करतो”, असेही त्यांनी म्हटले आहे.