वसई, नाशिक टू थेट युपी, एक चूक अन् चोरटे दाम्पत्य पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?

वसईच्या अंबिका ज्वेलर्समध्ये भरत शहा यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती-पत्नीला गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत अटक केली आहे. कर्जबाजारीपणातून हा हल्ला करण्यात आला होता.

वसई, नाशिक टू थेट युपी, एक चूक अन् चोरटे दाम्पत्य पोलिसांच्या जाळ्यात, नेमकं काय घडलं?
vasai arrest
| Updated on: Dec 11, 2025 | 10:01 AM

वसईच्या वालीव परिसरात असलेल्या अंबिका ज्वेलर्सचे मालक भरत शहा यांच्यावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या पती-पत्नीला केवळ 12 तासांच्या आत अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा कक्ष 4 च्या पथकाला हे मोठे यश मिळाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना अटक केली. हे आरोपी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना नाशिक रेल्वे स्थानकातून बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी १० डिसेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास आरोपी पती-पत्नी आपल्या दीड वर्षाच्या मुलीसह अंबिका ज्वेलर्समध्ये आले. यावेळी त्यांनी प्रथम सोनं खरेदी करण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांनी ज्वेलर्स मालक भरत शहा यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. भरत शहा पाणी देण्यासाठी दुकानाच्या आतील खोलीत गेले असता, आरोपींनी त्यांना खोलीत बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपी आणि ज्वेलर्स मालक यांच्यात झटापट झाली.

याच झटापटीत आरोपी सोहेल खानने धारदार चाकूने भरत शहा यांच्यावर वार केला. रक्तबंबाळ झालेल्या भरत शहा यांना पाहून हे चोरटे दाम्पत्य त्यांच्या स्विफ्ट कारमधून घटनास्थळावरून त्वरीत फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसरात नाकाबंदी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींनी वापरलेल्या स्विफ्ट कारचा नंबर मिळवला. या कारच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेऊन आरोपींचा ठावठिकाणा निश्चित करण्यात आला. हे पती-पत्नी उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असताना, गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना नाशिक रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले.

यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता कर्जबाजारीपणातून झटपट मुक्त होण्यासाठी आरोपींनी ज्वेलर्स लुटण्याचा कट रचला होता, अशी माहिती त्या दाम्पत्याने दिली. या ज्वेलर्सचे मालक भरत शहा यांनी या लुटीला विरोध केल्याने आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. सोहेल शराफत खान (23) आणि त्याची पत्नी फिरदोस बानो सोहेल खान अशी अटक केलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. त्यांच्यासोबत त्यांचे दीड वर्षांचे लहान मूल देखील होते. हे दाम्पत्य मूळचे उत्तर प्रदेशातील झांशी जिल्ह्यातील टेहरोली तालुक्यातील रहिवासी आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. तर जखमी ज्वेलर्स मालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.