
महाराष्ट्रातील भोंदू बाबांच्या कृत्यांची मालिका थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात यांचे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्वतःला महादेव आणि पीडित महिलेला पार्वती असल्याचे सांगून एका स्वयंघोषित धर्मगुरूने ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी ऋषिकेश वैद्य याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋषिकेश वैद्य हा आमची वसई या संस्थेचा प्रमुख आणि स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेतो. त्याची आणि पीडित महिलेची ओळख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवरून झाली होती. महिला धार्मिक वृत्तीची असल्याने ऋषिकेश वैद्यने तिला अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढले.
यानंतर डिसेंबर २०२३ मध्ये ऋषिकेश वैद्य पीडित महिलेला भेटण्यासाठी पुण्यात गेला होता. मी महादेवाचा अवतार आहे आणि तू माझी पार्वती आहेस, असे भासवून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला पुणे जिल्ह्यातील मांजरी येथील एका लॉजवर नेले. तिथे तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, या दरम्यान त्याने महिलेचे अश्लील छायाचित्रेही काढली.
या छायाचित्रांच्या आधारे वैद्यने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. मे २०२५ मध्ये त्याने तिला पुन्हा वसईतील हॉटेल एक्सप्रेस इन येथे भेटायला बोलावले. त्यानंतर त्याने तिथे पुन्हा तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. अखेर या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून महिलेने पोलिसांत धाव घेतली.
याप्रकरणी पीडित महिलेने प्रथम वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, मुख्य घटना पुण्यातील मांजरी परिसरात घडल्याने माणिकपूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तो पुणे हडपसर येथील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. तसेच अशाप्रकारे भोंदूगिरी करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान सध्या महाराष्ट्रातील नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशोक खरात हा स्वतःला दैवी शक्ती असल्याचे सांगून लोकांच्या अज्ञानाचा आणि असहायतेचा फायदा घेत असे. महिलांना बाळ होण्याचे आमिष दाखवून किंवा कुटुंबातील अडचणी दूर करण्याच्या बहाण्याने त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप त्याच्यावर आहेत. नाशिक पोलिसांनी याप्रकरणी कडक पावले उचलत खरातला बेड्या ठोकल्या आहेत. एकामागून एक अशा घटना समोर येत असल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे. ही भोंदूगिरी रोखण्यासाठी जादू टोणा विरोधी कायद्याची अधिक कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे.