
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या 2008 साली झाल्ल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल तब्बल 17 वर्षांनी आला आहे.सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आज मुंबई सत्र न्यायालय विशेष एनआयए कोर्टाद्वारे हा निकाल जाहीर करण्यात आला. यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली होती. आज विशेष न्यायालयाने निकाल देताना 17 वर्षानंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
न्यायाधीश ए. के. लाहोटींकडून निकालाचं वाचन करण्यात आलं. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, यांच्यासह 7 जणांवर याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. या बॉम्बसफोट प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून न्यायालयाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नेमकं काय झालं होतं ?
आजपासून सुमारे 17 वर्षांपूर्वी 29 सप्टेंबर 2008 साली महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे रात्रीच्या सुमारासबॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता. तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. रमजानमध्ये लोक नमाज अदा करण्यासाठी जात असताना हा स्फोट झाला. त्यामुळेच जखमींची संख्या जास्त होती. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, 30 सप्टेंबर 2008 साली, मालेगावच्या आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी कलम 307, 302, 326, 324, 427, 153-ए, 120बी, स्फोटके कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय रायकर, समीर कुलकर्णी, सतीश चतुर्वेदी या लोकांचा यामागे हात होता अशी माहिती समोर आली होती. हिंदुत्ववादी विचारसरणीचा भाग म्हणून ही बॉम्बस्फोटाची योजना आखण्यात आली होती आणि तिची अंमलबजावणी देखील करण्यात आल्याचा आरोप या सर्वांवर होता. एनआयएने सात आरोपींसाठी मृत्युदंडाची मागणी केली होती.
गेल्या 17 वर्षापासून याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. सुरुवातीला ATS कडे हा तपास होता, नंतर एनआयएकडे हा तपास वर्ग करण्यात आला. एनआयएने साध्वी प्रज्ञासिंह यांना जामीन देखील मंजूर केला होता. अखेर आज या खटल्याचा निकाल समोर आला असून पुराव्यांअभावी 7 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण काय ?
तारीख – 29 सप्टेंबर 2008
वेळ – रात्री 9.35, नवरात्रीच्या पूर्वसंध्येला, रमजान महिन्यात
एकूण स्फोट – एक
ठिकाण – भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ
मृत्यू – 6 ठार, 101 जखमी
तपास – एटीएस आणि त्यानंतर एनआयए तपासात सामील
कोणा-कोणावर आरोप ?
अभिनव भारत या हिंदू कट्टरपंथी संघटनेचा सहभाग
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त) (पुणे रहिवासी, बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा आणि शिकवण्याचा आरोप)
समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर (पुणे येथील रहिवासी, बॉम्ब बनवण्यासाठी साहित्य मिळवण्यास मदत केली)
अजय उर्फ राजा राहिरकर (अभिनव भारतचे पुणे येथील कोषाध्यक्ष)
लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (मुख्य कट्टरपंथी, गटाचे प्रेरक, आरडीएक्स मिळवण्यास मदत केली)
स्वामी अमृतानंद देवतीर्थ (स्वयंघोषित शंकराचार्य, जम्मू-काश्मीरचे रहिवासी, कट रचणारा)
सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर (ठाण्याचे रहिवासी, त्याच्याकडे शस्त्रे सापडली असा दावा एटीएसने केला होता, तो कटात सहभागी होता)