भोंदू बाबा खरातनेच एकनाथ शिंदेंना…, ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी दावा केला आहे की एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीचा मार्ग खरातनेच दाखवला होता. या प्रकरणी दीपक केसरकर यांची SIT चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

भोंदू बाबा खरातनेच एकनाथ शिंदेंना..., ठाकरे गटाचा मोठा गौप्यस्फोट
eknath shinde
| Updated on: Mar 22, 2026 | 7:35 AM

सध्या संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी या प्रकरणी एक मोठा दावा केला आहे. विनायक राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीचा मार्ग अशोक खरातनेच दाखवला, असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला. त्यामुळे वातावरण तापले आहे.

कसून चौकशी सुरु

भोंदू बाबा अशोक खरातने भोंदुगिरीच्या मदतीने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. एका महिलेने समोर येत बलात्कार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अशोक खरातचे हे बिंग फुटले आहे. त्याने वेगवेगळ्या महिलांवर अत्याचार केलेले जवळपास 100 व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. यातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सध्या अशोक खरातला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.

आता याप्रकरणी विविध राजकीय प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत. नुकतंच विनायक राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक मोठा दावा केला. माजी मंत्री दीपक केसरकर यांची याप्रकरणी SIT चौकशी व्हायला पाहिजे. दीपक केसरकर यांनीच एकनाथ शिंदे यांची ओळख अशोक खरातशी करून दिली. त्यानंतरच अशोक खरातने एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला जाण्याचा मार्ग दाखवला. खरात जेव्हा आपले तोंड उघडेल, तेव्हा सध्याच्या मंत्रिमंडळातील अर्धे मंत्री उघडे पडतील. त्यांचे काळे कारनामे जनतेसमोर येतील, असे विनायक राऊत म्हणाले.

मंत्रिमंडळातील कलंकित मंत्र्यांवर कारवाईची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली. मंत्रिमंडळातील भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांची तातडीने चौकशी करून त्यांना पदावरून दूर करावे, असेही ते म्हणाले. पुरोगामी महाराष्ट्रात, जिथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आहे, तिथे संविधानात्मक पदावर बसलेले नेते अशा व्यक्तींचे पाय धरत आहेत, ही राज्यासाठी शरमेची बाब आहे, अशा शब्दात विनायक राऊत यांनी टीका केली.

खरातच्या जीवाचे रक्षण करावे

अशोक खरात याच्या सुरक्षिततेबाबतही विनायक राऊत यांनी टीका केली. जोपर्यंत या प्रकरणाची आणि व्हिडीओची पूर्ण चौकशी होत नाही, तोपर्यंत खरातच्या जीवाला धोका असू शकतो. ज्या बड्या नेत्यांची नावे या प्रकरणात येण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडून खरातचा घातपात होऊ शकतो. त्यामुळे गृहमंत्री म्हणून खरातच्या जीवाचे रक्षण करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे, असेही विनायक राऊत म्हणाले.

या प्रकरणात जर आमच्या पक्षातील एखाद्या नेत्याचे नाव आले, तरीही त्याची हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका राऊत यांनी घेतली. या प्रकरणाशी संबंधित कोणताही नेता असो, महाराष्ट्रातील जनतेने त्याला थारा देऊ नये आणि अशा नेत्यांवर सामाजिक बहिष्कार टाकावा, असे आवाहनही विनायक राऊत यांनी केले. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

Follow Us