Manoj Jarange Morcha : …तर आज चित्र वेगळं असतं, ती आमची मोठी चूक झाली, विनोद पाटलांचं मनोज जरांगेंबद्दल मोठं वक्तव्य

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघाला आहे, हा मोर्चा आज मुंबईमध्ये पोहोचणार आहे, मात्र त्यापूर्वी विनोद पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

Manoj Jarange Morcha : ...तर आज चित्र वेगळं असतं, ती आमची मोठी चूक झाली, विनोद पाटलांचं मनोज जरांगेंबद्दल मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2025 | 2:51 PM

मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अमरण उपोषण करणार आहेत.  त्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा बांधवांचं आंदोलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आता विनोद पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले विनोद पाटील? 

जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत. मित्र आहेत. त्याच काळात त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली नसती आणि निवडणूक लढवली असती तर आज आमचं चित्र वेगळं असतं, असं विनोद पाटील यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की. आम्ही निवडून आलो असतो,  पडलो असतो, पण राज्यामध्ये एक राजकीय दबदबा राहिला असता. आज निवडणुका निघून गेल्या आहेत.

निश्चितपणे त्यांनी निवडणुकीतून माघार घ्यायला नको होती. मात्र त्यावेळी मिस्टेक झाली आणि आमची मोठी चूक झाली. आम्ही जर निवडणूक लढवली असती, कमी जास्त मत पडली असती, परंतु त्या -त्या भागामध्ये आमचं एक नेतृत्व तयार झालं असतं आणि राजकीय पक्षांना सुद्धा दखल घ्यावी लागली असती, असंही यावेळी विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

माझी भावना एकच आहे, मी न्यायालयाची लढाई लढतो आहे. मुंबई हायकोर्टात आम्ही जिंकलो परंतु सुप्रीम कोर्टात हरलो. मनोज जरांगे पाटील सुद्धा रस्त्यावरची लढाई लढत आहेत. त्यामुळे आमच्या दोघांचा उद्दिष्ट एकच आहे. की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.  रस्त्यावरची लढाई सुद्धा महत्त्वाची आहे आणि न्यायालयीन लढाई सुद्धा महत्त्वाची आहे. समितीला मुदतवाढ देण्याची पद्धत आहे. ते जितक्या वेळेस मागतील तितक्या वेळेस द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया यावेळी विनोद पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान सरकारनं मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानावरील आंदोलना फक्त एक दिवसांची परवानगी दिली आहे. त्यावर देखील विनोद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  कुठलेही आंदोलन असेल तर पोलीस प्रशासन, किंवा कोणतंही प्रशासन त्यांच्या सोयीप्रमाणे अटी घालत असतात. न्यायालयाचा निर्देश आहे,  त्यामध्ये अटी घातल्या आहेत, हा त्यांचा अधिकार आहे. परंतु प्रश्न हा आहे की, आंदोलन एक दिवस असेल, एक महिना असेल हा संपूर्ण कायद्याचा विषय आहे. यामध्ये राज्य सरकार काय भूमिका घेईल? हे त्यांच्याकडूनच स्पष्ट झाल्यावर कळेल, असं यावेळी विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.