
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येचा कट रचला होता असा दावा मनोज जरांगेंनी केला. त्यानंतर जालना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी धनंजय मुंडे यांचा सहकारी दादा गरडला अटक केली. आता दादा गरडचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘गंगाधर काळकुटेंना डुकरासारखं उचलून नेतो, असं मुंडे म्हणाले‘ अशी कबूली दिली.
काय आहे व्हिडीओ?
मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येच्या कट प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या दादा गरड यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अंतरवाली सराटी येथील हा व्हिडीओ आहे. जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले काळकुटे यांना डूकरासारखे धरून नेतो असं धनंजय मुंडे म्हटल्याची कबुली दादा गरड यांनी जरांगे यांच्या सहकाऱ्यांकडे व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या संशयित आरोपीमध्ये दादा गरुड याचा समावेश आहे. गरड हा बीड जिल्ह्यातील गेवराई येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
काय होते जरांगे पाटीलांचे आरोप?
मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, बीडचा कांचन पाटील नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे किंवा पीए आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचे काम केले. बीडच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींना परळीला नेले. तिथे एक मोठी बैठक सुरू होती ती बैठक धनंजय मुंडे यांनी सोडली आणि यांच्याकडे गेले. त्यांची वारंवार धनंजय मुंडेंशी भेट व्हायची. कांचन पाटील आणि धनंजय मुंडे यांची 20 मिनिटे बैठक झाली होती. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील होती. भाऊबीजेच्या दिवशी बैठक झाली होती. मला जुनी गाडी द्या, मी गाडीनेच ठोकतो, असे आरोपी म्हणाले. घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. धनंजय मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही.