Vivekanad Patil: ‘सहकाराच्या नावाखाली स्वाहाकार’, विवेकानंद पाटील यांचं काळजाला भिडणारं भाषण, कृषिमंत्र्यांना दिलं थेट आव्हान!

सामान्य शेतकऱ्यांची मुले MPSC-UPSC चा अभ्यास करत असताना, राजकारण्यांची मुले मात्र परदेशात शिक्षण घेतात आणि वयाची २५-२६ वर्षे पूर्ण होताच निवडणुकांच्या तोंडावर 'युवा नेते' म्हणून बॅनरवर झळकतात," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. 

Vivekanad Patil: सहकाराच्या नावाखाली स्वाहाकार, विवेकानंद पाटील यांचं काळजाला भिडणारं भाषण, कृषिमंत्र्यांना दिलं थेट आव्हान!
| Updated on: Nov 22, 2026 | 9:43 PM

Vivekanad Patil Speech:  कारखान्याच्या गेटवर साखर नेमकी कोणत्या भावाने विकली जाते आणि तो दर एफआरपी (FRP) ठरवताना विचारात घेतला जातो का, याची माहिती शेतकऱ्यांना असायला हवी. सरकारची धोरणे शंभर टक्के चुकतात हे खरे आहे, पण महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे जर शेतकऱ्यांना जागे व्हायचे असेल, तर त्यांनी सर्वात आधी ‘शहाणे’ होणे गरजेचे आहे, असे म्हणत विवेकानंद पाटील यांनी शेतकरी प्रश्नांवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. जुन्नरमधील ओतुर येथे ते बोलत होते.

‘आमदार- खासदाराची बायको, मेहुणा- मेहुणीही कारखान्यावर…’

Loading...

‘१९४५ पासून सहकार चळवळ वाढली, पण आजही १९४५-५० च्या दशकात ज्यांच्या ताब्यात कारखाने होते, त्यांचीच तिसरी-चौथी पिढी कारखान्यांवर चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक म्हणून बसली आहे. कारखान्याची साखरेची पोती छापणे, डांबरीकरण किंवा रंगरंगोटी यांसारखी सर्व टेंडर्स आणि बजेट केवळ संचालकांच्या घरातील किंवा जवळच्या लोकांनाच मिळतात. आमदार-खासदारांची बायको, मेहुणा आणि मेहुणीसुद्धा कारखान्यावरच असतात. सहकार टिकला पाहिजे हे खरे, पण सध्या सहकाराच्या नावाखाली ‘स्वाहाकार’ सुरू आहे,” अशा शब्दात विवेकानंद पाटील सरकारवर निशाणा साधला.

राज्याच्या कृषिमंत्र्याला आव्हान…! 

“गावामध्ये सर्वात मोठा बंगला कधीही शेतकऱ्याचा (अपवाद वगळता) दिसत नाही तर तो जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, आमदार किंवा खासदारांचाच असतो. महाराष्ट्रात अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शेतकरी कष्टाने पीक पिकवतो, पण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आणि शेतीमालाचा योग्य हमीभाव तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत अजिबात पोहोचत नाही. सरकारच्या शेतीविषयक अज्ञानावर टीका करत, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन शेतकऱ्याच्या मुलाच्या चार छोट्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत,” असे खुले आव्हानही विवेकानंद पाटील यांनी सरकारला दिले.

एमपीएससी प्रश्नावरुनही सरकारवर निशाणा! 

त्यासोबतच विवेकानंद पाटील यांनी एमपीएससी प्रश्नावरुनही सरकारवर निशाणा साधला. “MPSC चा पेपर फुटल्यानंतर सरकारकडून ठोस कारवाई करण्याऐवजी ‘रामरक्षा म्हणा’ असे सल्ले दिले जातात, हे ‘जखम मांडीला आणि मलमपट्टी शेंडीला’ असे प्रकार आहेत. तसेच, १६ हजार पदांच्या मेगा भरतीच्या नावाखाली केवळ कारकून (क्लार्क) आणि नॉन-गॅझेटेड पदे भरली जात असून, एकही क्लास वन गॅझेटेड पद नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. सामान्य शेतकऱ्यांची मुले MPSC-UPSC चा अभ्यास करत असताना, राजकारण्यांची मुले मात्र परदेशात शिक्षण घेतात आणि वयाची २५-२६ वर्षे पूर्ण होताच निवडणुकांच्या तोंडावर ‘युवा नेते’ म्हणून बॅनरवर झळकतात,” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us