महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या 23 जूनला होणार प्रसिद्ध; 1 जुलै पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार

| Updated on: Jun 16, 2022 | 5:39 PM

भारत निवडणूक आयोगाकडून तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्याच निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्या 23 जूनला होणार प्रसिद्ध; 1 जुलै पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई: बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी (General elections of the corporation) सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या (Ward wise draft voter lists) 23 जून रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 1 जुलै पर्यंत हरकती व सूचना (Objections and suggestions till July 1) दाखल करता येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 जून रोजी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता.

सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या

त्यानुसार 17 जून रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या केल्या जाणार होत्या. मात्र आता सुधारित कार्यक्रमानुसार प्रारूप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यावर 1 जुलै पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहेत. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै रोजी प्रसिद्ध केल्या जाणार असल्याचेही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्याच ग्राह्य

भारत निवडणूक आयोगाकडून तयार केलेल्या व 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्याच निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात.

मतदार यादीत दुरुस्त्या

या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.