उद्धव ठाकरे यांच्या गटाचा जिल्हाप्रमुखच महिला शहरप्रमुखाच्या जीवावर उठला? पोलिसांकडून अटक

वाशिम पोलिसांनी रंजना पौळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाच्याच जिल्हाप्रमुखाला बेड्या ठोकल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या गटाचा जिल्हाप्रमुखच महिला शहरप्रमुखाच्या जीवावर उठला? पोलिसांकडून अटक
| Edited By: | Updated on: Nov 26, 2022 | 10:57 PM

वाशिम : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वाशिम महिला शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी महत्त्वाची बातमी समोर आलीय. वाशिम पोलिसांनी रंजना पौळकर यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांना अटक केलीय. ठाकरे गटाच्या महिला शहरप्रमुखावरील हल्ल्याप्रकरणी जिल्हाप्रमुखाला अटक करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय.

शिवसेनेच्या वाशिम महिला शहरप्रमुख रंजना पौळकर यांच्यावर 10 नोव्हेंबरला भरदिवसा जीवघेणा चाकू हल्ला झाला होता. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.

या हल्ल्याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठत संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली होती. तसेच वाशिम शहर पोलीस ठाण्यात कलम 307 आणि अॅट्रोसिटीच्या कायद्यान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या ही सहावर गेलीय. विशेष म्हणजे या प्रकरणी हल्ला करणारा मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.