
Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ भारताला चांगलीच बसत आहे. आज युद्धाचा 17 वा दिवस आहे. परंतु अजूनही हे युद्ध थांबण्याची शक्यता नाही. या युद्धामुळे भारतात उर्जेचं मोठं संकट निर्माण झालं आहे. एलपीजी, पीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा भाव 60 रुपयांनी महागला आहे. आता खाद्यतेलांची किंमतही वाढली आहे. असे असतानाच आता सामान्यांची चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. बिसलेरी बॉटल, कोळसादेखील चांगलाच महागणार असून नागरिकांना आणखी फटका बसणार आहे.
आखातातील युद्धाचा पुण्यातील माढा तालुक्यात मोठा फटका बसताना दिसतोय. येते बाटली बंद पाण्याची किंमत चांगलीच वाढली आहे. येथे बाटली बंद पाण्याच्या दरात 20 ते 25 रुपयांची वाढ झाली आहे.प्लॅस्टिकची पाण्याची बाटली तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल महागला आहे. सोबतच कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात सर्व सामांन्याना हा फटका बसत आहे. येथे 12 बाटल्याचा बाॅक्स जवळपास 20 ते 25 रुपयांनी महागला आहे. अगोदर 75 रुपयांना मिळणारा बाॅक्स आज 95 रुपये ते 100 रुपयापर्यंत पोहचला असून युद्ध सुरूच राहिल्यास हा दर आणखी वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे पाण्याची बाटली अगोदर 10 रुपयांना विकली जात होती. ती बॉटल आता बाजारात 15 ते 20 रुपयांच्या पुढे विकली जात आहे.
दुसरीकडे व्यावसायिक गॅसमुळे आता कोळशाच्या मागणीत वाढ झाली झाली आहे. हॉटेल व्यवसायिकांकडून अधिक प्रमाणात कोळसा खरेदी केला जात आहे. कोळशाची मागणी वाढल्यामुळे कोळशाच्या दरात देखील वाढ झाली आहे. अगोदर तीस रुपये किलोने विकला जाणारा कोळसा आता 35 रुपये किलोने विकला जातोय. व्यावसायिक गॅस टंचाईमुळे कोळशाला अनेक हॉटेल व्यवसायिकांकडून प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच कोळशाचा भाव वाढत आहे.
गॅसच्या टंचाईमुळे सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही फटका बसायला लागला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयाजवळ असलेल्या उपहारगृहात गॅस टंचाईमुळे मोजकेच पदार्थ ठेवण्यात आलेले आहेत. गॅस मिळत नसल्याने उपहारगृहचालकांनी कोळशाच्या इलेक्ट्रिक शेगडीचा वापर करत मोजके पदार्थ देण्याचा प्रयत्न चालू ठेवलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेत तसेच चित्र दिसून आले आहे.