राज्यात पावसाने आठवडाभर दाणादाण उडणार, अनेक जिल्ह्यात परतीच्या पावसाचे धुमशान
राज्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच सोमवारी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी राज्यातील अनेक भागांना पावसाने हजेरी दाखवल्याने अनेक जिल्ह्यात हवा थंड झाली असून पिकांसाठी हा पाऊस वरदान असल्याने शेतकरी सुखावला आहे.

नगर, रायगड आणि पुण्यातील काही भागात पावसाने जोरदार पुनरागमन केल्याने पाण्याचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. रायगड जिल्ह्यात सोमवारी पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. खालापूर, कर्जत, खोपोली, रसायनी आणि माथेरान परिसरात जोरदार पावसासह वादळी वारे आणि विजांचा कडकडाट झाल्याने बळीराजा सुखावला आहे. आकाशात काळेकुट्ट ढग दाटून आले आणि त्यानंतर अचानक पावसाला सुरुवात झाली आहे. सायंकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह ढगांचा मोठा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. खालापूर-कर्जत परिसरासह खोपोली, रसायनी आणि माथेरान भागात पावसाने जोर धरला. जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अहिल्यानगरात मोठ्या प्रतीक्षेनंतर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी दाखविली. तब्बल तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नगर जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असताना पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी पिके करपून चालली असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर झाला आहे. असाच पाऊस कायम राहिल्यास शेतकरी आणि जनावरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई परिसरात दुपारी चारच्या सुमारास अचानक जोरदार पावसाचे आगमन झाले. दुपारी चारच्या सुमारास अचानक जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. मुसळधार पावसाने आठवडी बाजारातील व्यापारी आणि ग्राहकांची धावपळ उडाली. काही व्यापाऱ्यांचा भाजीपाला पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने नुकसान झाले.पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून, पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. आणखी समाधानकारक पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
पावसाचा सांगावा…काय
कोकण आणि गोव्यामध्ये २२ ते २७ सप्टेंबर, मध्य महाराष्ट्रात २२-२३ सप्टेंबर, आणि मराठवाड्यात २३ सप्टेंबर रोजी मध्यम ते व्यापक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान, मराठवाड्यात २१-२३ सप्टेंबर दरम्यान, तसेच गुजरात प्रदेश आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये २१ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (वेग ताशी ४०-५० किमी, सोसाट्याच्या वाऱ्यासह ६० किमीपर्यंत) वाहण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, २२ सप्टेंबर रोजी गुजरात प्रदेश आणि सौराष्ट्र-कच्छमध्ये सोसाट्याचा वारा (वेग ताशी ३० ते ५० किमीपर्यंत) वाहण्याची शक्यता आहे.
