
नागपूर | 6 मार्च 2024 : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांची एकूण संपत्ती सुमारे $149 अब्ज आहे. जगातील पाचव्या क्रमांकाचे ते श्रीमंत व्यक्ती आहेत. बिल गेट्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर दिसताच खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. बिल गेट्स जेव्हा भारत दौऱ्यावर येतात तेव्हा ते नेहमीच एखादा व्हिडिओ किंवा फोटो शेअर करतात. त्याची नेहमीच चर्चा होते. बिल गेट्स यांनी नुकताच नागपूर येथील प्रसिद्ध डॉली चायवालाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यामध्ये बिल गेट्स ‘वन टी प्लीज’ म्हणताना दिसले होते. यानंतर आता डॉली चायवाला याच्या संपत्तीची माहिती समोर आलीय.
बिल गेट्स यांनी डॉली चायवालाचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर तो अधिक चर्चेत आला आहे. डॉली चायवाला याची स्टाईल लोकांना खूपच भावत आहे. त्याचा लुकही वेगळं आणि आकर्षित करणारा आहे. चमकदार शर्ट, चष्मा आणि रंगीबेरंगी शैली यामुळे डॉली चायवाला वेगळा वाटतो. रजनीकांत स्टाईलमध्ये चहा देण्याची त्याची पद्धत लोकांना आवडते.
गेल्या 16 वर्षांपासून डॉली नागपुरमध्ये चहाचा स्टॉल लावत आहे. अनेक सेलिब्रिटी डॉलीच्या चहाचे चाहते आहेत. डॉलीच्या टपरीवर असे अनेक सेलिब्रिटी चहा प्यायला येतात. चहाच्या स्टॉलमधून डॉलीची चांगली कमाई होते. डॉली हा सुमारे 10 लाख रुपयांच्या मालमत्तेचा मालक आहे.
डॉली चायवालाची चहा बनवण्याची पद्धत लोकांना आवडते. अनेक फूड व्लॉगर्स त्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी दुरदुरवरून नागपूरला येतात. त्याचे व्हिडिओ बनवून ते सोशल मीडियावर शेअरही करतात. मात्र, बिल गेट्स यांनी त्याच्या टपरीवर चहा घेतला तेव्हापासून मात्र डॉली चायवाला अधिकच प्रसिद्ध झाला आहे.
डॉली चायवाला याचे खरे नाव सुनील पाटील आहे. तो नागपूरचाच रहिवासी आहे. डॉली सामान्य घरातून आला आहे. 1998 मध्ये जन्मलेल्या डॉलीचे इंस्टाग्रामवर 11 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. डॉली रोज सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत चहा विकतो. डॉली दररोज 350 ते 500 कप चहा विकतो. त्याच्या एका कप चहाची किंमत 7 रुपयांपासून सुरू होते.