Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांनी स्वत:चं नाव, फोटो रजिस्टर केलेला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन कायदा काय आहे? वाचा सविस्तर…
ट्रेडमार्क नोंदणी म्हणजे संबंधित व्यक्तीवर कोणीही टीका करू नये, प्रश्न विचारू नयेत किंवा तिच्या सार्वजनिक कार्याचे परीक्षण करू नये, असा अधिकार नव्हे. लोकशाही व्यवस्थेमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पत्रकारिता, सामाजिक टीका आणि जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित आहे.

Rupali Chakankar : राज्यात सध्या महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स या चित्रपटाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. एकीकडे दिग्दर्शक, निर्माते हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक असल्याचे सांगत आहेत. तर दुसरीकडे हा चित्रपट भोंदू अशोक खरात याने केलेल्या महिलांच्या शोषणावर आधारित असल्याचा दावा केला जातोय. या चित्रपटात अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी साकारलेली व्यक्तिरेखा ही राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्याशी मिळतीजुळती असल्याचा दावा केला जातोय. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे रुपाली चाकणकर यांनी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी स्वत:चे नाव, फोटो आणि वैयक्तिक शैलीचे ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन केले आहे. याच पार्श्वभूमीवर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन म्हणजे काय हे विचारले जात आहे. म्हणूनच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ या…
ट्रेडमार्क नोंदणी हा प्रत्येक व्यक्तीचा कायदेशीर अधिकार
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सर्वात अगोदर भारत सरकारकडे 2021 साली स्वतःचे नाव फोटो आणि वैयक्तिक ओळख यासाठी अधिकृत ट्रेडमार्क नोंदणी केलेली आहे. भारत सरकारकडे स्वतःची ओळख ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करणाऱ्या महाराष्ट्रातल्या पहिल्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तृप्ती देसाईंची नोंद आहे. याबाबत त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचित केली आहे. ट्रेडमार्क नोंदणी हा प्रत्येक व्यक्तीचा कायदेशीर अधिकार आहे. महिलांनी आपल्या नावाची आणि ओळखीची कायदेशीर ताकद ओळखली पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.
तृप्ती देसाई यांनी अगोदरच…
रुपाली चाकणकर यांनी स्वतःचे नाव, फोटो आणि वैयक्तिक ओळख यासंदर्भात ट्रेडमार्क नोंदणी करण्याचा निर्णय घेतला असेल, तर त्याबाबत माझी भूमिका सकारात्मक आहे. कारण प्रत्येक व्यक्तीला आपल्या नावाचा, प्रतिमेचा आणि ओळखीचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याचा अधिकार आहे. मी स्वतःदेखील अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळी, महिला सक्षमीकरण, जनआंदोलने आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून माझी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. म्हणजेच ट्रेडमार्क नोंदणी ही केवळ आजच्या चर्चेचा विषय नाही, तर स्वतःच्या नावाची आणि ओळखीची कायदेशीर सुरक्षितता जपण्यासाठी मी स्वतःही केलेली कृती आहे, असंही मत पुढे तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलंय.
ट्रेडमार्क कायदा नेमका काय अधिकार देतो?
भारतामध्ये ट्रेडमार्क नोंदणी ही Trade Marks Act, 1999 अंतर्गत केली जाते. या कायद्यातील कलम 28 नुसार वैधरीत्या नोंदणीकृत ट्रेडमार्कच्या मालकाला नोंदणीमध्ये नमूद केलेल्या वस्तू किंवा सेवांच्या संदर्भात विशेष वापराचा अधिकार प्राप्त होतो. कलम 29 नुसार नोंदणीकृत ट्रेडमार्कशी समान किंवा दिशाभूल करणारे साम्य असलेले चिन्ह व्यापाराच्या संदर्भात अनधिकृतपणे वापरल्यास ट्रेडमार्क उल्लंघनाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या नावाचा, फोटोचा किंवा नोंदणीकृत चिन्हाचा व्यावसायिक फायदा घेण्यासाठी अनधिकृत वापर होत असेल, तर कायदेशीर कारवाईचे मार्ग उपलब्ध आहेत. मात्र कोणत्या सेवांसाठी नेमके संरक्षण मिळते, हे संबंधित ट्रेडमार्कच्या नोंदणीकृत तपशिलांवर अवलंबून असते.
नाव आणि फोटोचा गैरवापर रोखणे आवश्यक
आज सोशल मीडिया, चित्रपट, जाहिराती, रील्स आणि डिजिटल माध्यमांमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव, छायाचित्र किंवा प्रतिमा वापरून व्यावसायिक फायदा मिळवण्याचे प्रकार घडू शकतात. एखाद्या व्यक्तीच्या पूर्वपरवानगीशिवाय तिची ओळख वापरून जनतेची दिशाभूल केली जात असेल किंवा त्या व्यक्तीशी संबंध असल्याचा खोटा आभास निर्माण केला जात असेल, तर संबंधित प्रकरणाच्या स्वरूपानुसार दिवाणी कायदेशीर उपाय आणि इतर लागू कायदेशीर तरतुदींचा आधार घेता येतो.
ट्रेडमार्क म्हणजे टीका करण्यावर बंदी नव्हे
याचबरोबर एक महत्त्वाची कायदेशीर बाब स्पष्ट करणे आवश्यक आहे. ट्रेडमार्क नोंदणी म्हणजे संबंधित व्यक्तीवर कोणीही टीका करू नये, प्रश्न विचारू नयेत किंवा तिच्या सार्वजनिक कार्याचे परीक्षण करू नये, असा अधिकार नव्हे. लोकशाही व्यवस्थेमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्य, पत्रकारिता, सामाजिक टीका आणि जनतेला प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित आहे. ट्रेडमार्क कायद्यातही काही मर्यादा आणि अपवाद आहेत. त्यामुळे प्रत्येक वापराचा स्वतंत्रपणे कायदेशीर विचार करावा लागतो.
पुढे बोलताना तृप्ती देसाई यांनी ट्रेडमार्क कायद्यावर सविस्तर मत मांडले आहे. माझ्या मते, महिलांनी स्वतःच्या नावाची, कर्तृत्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची कायदेशीर ओळख निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणे ही स्वागतार्ह बाब आहे. महिलांनी एकमेकींच्या कायदेशीर अधिकारांचा सन्मान केला पाहिजे. स्वतःचे नाव, स्वतःची ओळख आणि स्वतःच्या कर्तृत्वाचे संरक्षण करण्यासाठी कायद्याची माहिती घेतली पाहिजे. रुपाली चाकणकर यांनी ट्रेडमार्क नोंदणी केली असेल, तर त्याचे मी स्वागत करते. कारण मीदेखील माझ्या नावाची आणि फोटोची Class 41 आणि Class 45 अंतर्गत नोंदणी करून स्वतःच्या ओळखीच्या संरक्षणासाठी कायदेशीर पाऊल उचललेले आहे. माझी स्पष्ट भूमिका आहे. नाव कमवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागतो; पण त्या नावाचा गैरवापर होऊ नये यासाठी कायदेशीर संरक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असं मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलं.
