
‘हा समाजाचा तमाशा! खेळ जातींचा!
खेळती सारे पाच वर्षांनी’
अशी एक गझल सुरेश भटांनी लिहिली आहे. सध्यस्थितीवर या गझलमधील काही ओळी चपखल बसतात. राज्यात औरंगजेबाची कबर एकाएक राजकारणाच्या केंद्रस्थानी आली. त्यावरून हिंदू संघटना, नेते फतवे काढत आहेत. तर काही जण कबरीवर जाऊन फुलांचा वर्षाव करत आहे, जणू औरंगजेब हा कोणी संत अवलिया होऊन गेला. तर अचानक राग औरंगजेबी छेडण्यामागे काय कारण आहे, यावर महाविकास आघाडीतील या खासदाराने मोठा खुलासा केला आहे. जालना जिल्ह्याचे खासदार आणि काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांनी या सर्व घडामोडींवर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
निवडणुका आल्या की असे मुद्दे निघणारच
औरंगजेब याच्या कबर हा चर्चा करण्यासारखा हा विषय नाही. निवडणुका जवळ आल्या की कोणाला कबर दिसते, कोणाला प्रभू रामचंद्र दिसतात, असा चिमटा खासदार काळे यांनी काढला. आम्ही सर्वधर्म समभाववाले आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यावर न बोललेलं बरं, .मात्र हे सगळे मुद्दे निवडणुकीपुरते आणि राजकारणापुरते मर्यादित असतात, असे ते म्हणाले.
आताच का काढला विषय?
इतके दिवस कबर इथे होती तोपर्यंत कोणाला काही वाटलं नाही, आता महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक आल्या तर कबरीचा विषय सुरू झाला, असा खुलासा खासदार कल्याण काळे यांनी केला. उद्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल राज्यभर आंदोलन करत आहे. मागील 4 ते 5 वर्षांमध्ये जातीय तेढ आणि धार्मिकतेत निर्माण करण्याची प्रसंग समोर येत आहे. हे आपल्या पुरोगामी राज्यकरता शोभदायक नाही. मग तो हिंदू-मुस्लिम वाद असो दलित सुवर्ण वाद असो हा वाद आपल्याला परवडणार नाही, असे काळे म्हणाले.
चंद्रकांत खैरे यांनी सुनावले
आमदार नितेश राणे यांनी यांच्या विधानानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. औरंगजेबाची कबर राज्यात नको अशी भूमिका घेण्यात येत आहे. यावर उद्धव ठाकरे सेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. हा सगळा मुद्दा केवळ राजकारणाच्या दृष्टिकोनातून पुढे आणला जात आहे. हिंमत असेल तर त्यांनी तिकडे आहेत त्या कबरी आधी काढाव्या. इथली कबर काढायला माझा विरोध नाही. त्याचं काय करायचं ते सरकार करेल. पण इथेच भद्रा मारुतीचं मंदिर आहे. सध्या या ठिकाणी काय होईल या भीतीमुळे इथल्या भाविकांची संख्या ही अर्ध्यांहून कमी झाल्याचे ते म्हणाले. इथलं वातावरण खबार होत असल्याचे ते म्हणाले. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला पाहिजे. आम्हाला देखील औरंगजेबचा राग आहे. पण कशाला पाहिजे त्याचा विषय? ज्याने आपले हिंदू मारले. मंदिरं तोडली. तो इथं मेला त्याची कबर इथं टाकली. आता हा विषय संपवला पाहिजे, असे आवाहन खैरे यांनी केले.