कोण आहेत शशिकांत शिंदे ? शरद पवारांचे विश्वासू, माथाडी चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व…

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाल्यानंतर पक्षाने मराठा नेते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर ही धुरा आता सोपवली आहे. कोण आहेत शशिकांत शिंदे ? वाचा

कोण आहेत शशिकांत शिंदे ? शरद पवारांचे विश्वासू, माथाडी चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व...
sharad pawar and shashikant shinde
| Updated on: Jul 15, 2025 | 10:06 PM

महाराष्ट्रात पालिका आणि जिल्हा परिषद अशा स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होण्यापूर्वी शरद पवार यांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बदल होणार असल्याचे संकेत दिले जात होते. आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पश्चिम महाराष्ट्रातील नेते शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेते असलेल्या शशिकांत शिंदे यांना पश्चिम महाराष्ट्रासह राज्यभरात पक्षांची वाढ करण्याची जबाबदारी असणार असून त्यांची परीक्षा स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत होणार आहे.

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदावर शशिकांत शिंदे यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात होते. जयंत पाटील यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी हे पद सोडणार असल्याचे संकेत दिले होते, ते म्हणाले होते की, शरद पवार साहेबांनी मला खुप संधी दिली. माझ्याकडे पक्षाचे सात वर्षे प्रदेशाध्यक्षपद राहीले. अखेर पार्टीत नव्या चेहऱ्यांना संधी मिळायला हवी. मला पदमुक्त करा ही माझी नम्र विनंती आहे. हा पक्ष शरद पवार साहेब यांचा आहे. त्यांनी यावर निर्णय घ्यायला हवा, आपल्याला खुप पुढे यायचे आहे असे पाटील म्हणाले होते.

कोण आहेत शशिकांत शिंदे ?

शशिकांत शिंदे यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी झाला असून ते जावळी तालुक्यातील हुमगावचे रहीवासी आहे. त्यांना माथाडी कामगार चळवळीतील प्रभावशाली नेते म्हटले जाते. कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असलेले शशिकांत शिंदे हे तरुण वयापासूनच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव जयवंतराव आणि आईचे नाव कौशल्या आहे.

एनसीपी शरद पवार गटाचे नवीन प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झालेल्या शशिकांत शिंदे यांना शरद पवार यांचा अत्यंत विश्वासू साथीदार म्हटले जाते. शशिकांत शिंदे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोरेगांव विधानसभा मतदार संघात सक्रीय असून ते दोनदा आमदार झालेले आहेत.

लोकसभेत उदयन राजे विरोधात लढले, विधानसभेत थोडक्यात पराभव

साल १९९९ मध्ये शिंदे यांनी जावळी विधानसभा मतदार संघातून आपली पहिली आमदारकीची निवडूक जिंकली होती. त्यांनी कृष्णा खोरे जलसिंचन महामंडळात जल संधारण मंत्री म्हणून काम केले आहे.

२००९ ते २०१४ दरम्यान शशिकांत शिंदे कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार होते. त्यांनी शालिनीताई पाटील यांना हरवले होते. ते दोन वेळा जावळी आणि दोनदा कोरेगावमधून आमदार म्हणून निवडून आले.

२०१९ मध्ये शिंदे यांचा महेश शिंदे यांच्याकडून पराभव झाला. तर २०१९ मध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून त्यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली त्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

साल २०२४ मध्ये शशिकांत शिंदे यांचा विधानसभेतही पराभव झाला. सध्या विधान परिषदेचे सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे ( शरद पवार गट ) मुख्य प्रतोद असून आता प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्यावर नविन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.