
अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री रिकामं झालं आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजित दादांची जागा कोण घेणार असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 31 जानेवारीला त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळपासून राजकीय घडामोडींना वेग आला होता. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आज आपण सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास कसा आहे? त्यांचे प्रारंभिक जीवन कसे होते? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिवमध्ये झाला. सुनेत्रा पवार यांना जन्मापासून राजकीय वारसा लाभलेला आहे. माजी मंत्री पद्मसिंह पाटील हे त्यांचे वडील आहेत. 1985 मध्ये सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे लग्न झाले. लग्नानंतर सुनेत्रा पवार या प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या प्रचारादरम्यान अजित पवारांसोबत दिसल्या होत्या. त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणुकही लढवली होती, मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या.
सुनेत्रा पवार या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत आणि राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा देखील आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्यात सक्रिय सहभागी नोंदवलेला आहे. 2010 मध्ये सुनेत्रा पवार यांनी एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया (EFOI) ची स्थापना केली. ही संस्था सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी काम करते.
सुनेत्रा पवार यांनी समाजकारणासह शैक्षणिक क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त देखील आहेत. या अनुभवाचा त्यांना आगामी काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. या आधी कोणत्याही महिलेने या पदावर काम केलेले नाही. पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचे काम आता त्या करणार आहेत. संपूर्ण राज्यातून उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी करण्यात येत होती, त्यानंतर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.