उदयनराजेंविरोधात युतीचा उमेदवार कोण?

उदयनराजेंविरोधात युतीचा उमेदवार कोण?

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघ हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर इथे राष्ट्रवादीचीच निर्विवाद सत्ता आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोदी लाटेने सुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा  बालेकिल्ला ढासळला नाही. खासदार उदयनराजे भोसलेंच्या रुपाने या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत आहे. मात्र उदयनराजेंविरोधात 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी युतीचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. […]

सचिन पाटील

|

Jul 05, 2019 | 4:14 PM

सातारा: सातारा लोकसभा मतदारसंघ हा कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उदयानंतर इथे राष्ट्रवादीचीच निर्विवाद सत्ता आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोदी लाटेने सुद्धा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा  बालेकिल्ला ढासळला नाही. खासदार उदयनराजे भोसलेंच्या रुपाने या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत आहे. मात्र उदयनराजेंविरोधात 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी युतीचा उमेदवार कोण? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

साताऱ्याची जागा 1999 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने खेचून आणली, तेव्हापासून ती राष्ट्रवादीकडेच आहे. 1999 ते 2009 पर्यंत दिवंगत लक्ष्मणराव पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 2009 मध्ये शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांचा पराभव करत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आजपर्यंत हा गड राखला आहे. यंदाही हा गड उदयनराजे भोसले राखणार का हे पाहावं लागणार आहे.

युतीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. त्यामुळे शिवसेना उदयनराजेंविरोधात कुणाला उतरवते हे अद्याप कळू शकलेलं नाही. सध्या शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांच्या नावाची चर्चा आहे. पुरुषोत्तम जाधव यांनी सलग दोन टर्म लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढवली.

जाधव यांनी 2009 मध्ये शिवसेनेतून तर 2014 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली. त्यांनी 2009 मध्ये 2 लाख 35 हजार मते, तर 2014 मध्ये अपक्ष असूनही 1 लाख 55 हजार मते मिळवली.

पुरुषोत्तम जाधव यांनी युतीकडून तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून पुन्हा एकदा पुरुषोत्तम जाधव यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे भाजपकडून माथाडी कामगारांचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांचंही नाव या मतदारसंघात चर्चेत आहे. यामुळे नरेंद्र पाटील यांनी सातारा इथे येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठी‌भेटी घेण्यास सुरुवात केली आहे. सातारा जिल्ह्यात माथाडी वर्ग मोठा आहे. या सर्वांचा मताधिक्याच्या रुपात फायदा आपल्याला होईल, असा दावा नरेंद्र पाटील यांचा आहे.

ही सर्व पार्श्वभूमी एकीकडे तर दुसरीकडे पक्षातून विरोध हे आव्हान घेऊन विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना यंदा निवडणूक लढायची आहे.

राष्ट्रवादीचे साताऱ्याचे सर्व आमदार वरिष्ठांचा आदेश पाळून सध्या कामाला लागले आहेत. मात्र उदयनराजेंनी मागील काही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांविरोधात काम केल्याचा काहींचा आरोप आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात आहे.

या पदाधिकाऱ्यांची मनधरणी उदयनराजे कशा प्रकारे करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अन्यथा लोकसभा निवडणुकीत उदयराजेंच्या मताधिक्यावर यावेळी मोठा परिणाम झालेला पहायला मिळेल.

दुसरीकडे उदयनराजेंविरोधात शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव निवडणुकीत उतरणार की भाजपचे नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळवण्यात यश येणार, हे येत्या काही दिवसात समजेल.

नरेंद्र पाटील हे मुख्यमंत्र्यांचे जवळचे सहकारी असून, त्यांना शिवसेनेने उमेदवारी द्यावी यासाठी स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरल्याचं सांगण्यात येत आहे. काहीही करुन उदयनराजे यांना शह दयायचा अशा मानसिकतेत युती असून, येत्या दोन दिवसात महायुतीचा उमेदवार नरेंद्र पाटील की पुरुषोत्तम जाधव याबाबत निर्णय होऊ शकतो.

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें