स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे, अजितदादांसोबत लढवणार का? अखेर भाजपने पत्ते उघडले, सर्वात मोठी बातमी समोर

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून, निवडणुकांसंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिंदे, अजितदादांसोबत लढवणार का? अखेर भाजपने पत्ते उघडले, सर्वात मोठी बातमी समोर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 04, 2025 | 4:14 PM

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे, मात्र या निवडणुका कशा लढवल्या जाणार? महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून या निवडणुका लढवल्या जाणार की? स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलत असताना भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आता मोठं वक्तव्य केलं आहे, ते कोल्हापुरात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील? 

लोकसभा, विधानसभेपेक्षाही नेत्याची खरी निवडणूक ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका असते. लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे. कदाचित आज संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होईल, आता कुणीतरी म्हणतील निवडणूक आयोगाशी दादांची चर्चा झाली वाटतं, पण मी 40 वर्षे यामध्ये घालवली आहेत, त्यामुळे मी अंदाज मांडला, असा मिष्किल टोला यावेळी पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की  जानेवारीच्या शेवटी महानगरपालिका निवडणुका होतील,  दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता जाहीर होईल.  त्यामुळे आपण आता  निवडणुकीच्या तयारीला लागलं पाहिजे.  2019 साली ज्यांना तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले. निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफार्मवर जो राहील तो राहील मात्र नाराज होऊ नका.  राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागतं, असं यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.

दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे, 2017 ची परिस्थिती बदला, त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या. लोकांना भेटून संपर्क वाढवा. निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे,  मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील. पण आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही,  राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू, पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाणार नाही, असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.