
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. 16 जानेवारीपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 5 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. तर 7 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. अशातच आता निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष व ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी धनगर, बहुजन समाजाच्या कुलस्वामिनी चिंचणी मायाक्का देवी यात्रेमुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी पत्रात केली आहे. शेंडगे यांनी आपल्या पत्रात म्हटले की, सध्या जाहीर झालेल्या 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांचे मतदान दि 5 फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येण्याचे जाहीर केले असून त्याच दिवशी धनगर व बहुजन समाजाची कुलस्वामिनी चिंचनी मायाक्का देवी यात्रा भरणार असून ही वार्षिक पवित्र यात्रा कर्नाटक क महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येते. 5 फेब्रुवारी 2026 हा यात्रेचा प्रमुख दिवस असून या दिवशी महाराष्ट्रातील लाखो भक्त आपल्या कुटुंबासहित लाखोंच्या संख्येने या यात्रेस सहभागी होतात ही यात्रा झाल्यावर सर्व भाविक दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी आपापल्या गावी परत पोहचतात.
या यात्रेसाठी महाराष्ट्र राज्यातून लाखो धनगर व बहुजन बांधव पारंपरिक पद्धतीने कर्नाटक राज्यात जाण्यासाठी घराबाहेर पडतात. ही यात्रा धार्मिक श्रद्धेशी जोडलेली असून समाजासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याच कालावधीत 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान दिवस आल्यास मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. परिणामी नोक्तडिशी प्रक्रियेत अपेक्षित मतदान टक्केवारी कमी होण्याची दाट शक्यता निर्माण होईल.
तरी लोकशाही प्रक्रियेत सर्व समाज घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी, निवडणूक कार्यक्रम दोन 2 दिवस पुढे ढकलण्यात यावा, ही नम विनंती आहे.आपण या विषयाची सहानुभूतीपूर्वक दखल घेऊन योग्य तो सकारात्मक निर्णय घ्याल, ही अपेक्षा आहे.