क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हजर राहा, प्रताप सरनाईकांना ईडीचे समन्स

सरनाईकांनी विलगीकरणात असल्याचं कारण सांगत ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती

  • सुधाकर काश्यप, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 10:55 AM, 26 Nov 2020
ShivSena Pratap Saranaik ED

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर ईडीसमोर हजर राहा, असा आदेश प्रताप सरनाईक यांना देण्यात आला आहे. मुंबईबाहेरुन आल्यामुळे सरनाईकांनी विलगीकरणात असल्याचं कारण सांगत ईडीला पुढच्या आठवड्यात चौकशी करण्याची विनंती केली होती. कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात सरनाईक कुटुंब ईडीच्या रडारवर आहे. (ED Summons Shivsena MLA Pratap Sarnaik to appear after quarantine period)

ईडीने मंगळवारी प्रताप सरनाईक आणि त्यांचे सुपुत्र विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापे मारले होते. त्यानंतर विहंग यांची ईडीने पाच तास चौकशी केली. काल (बुधवारी) प्रताप सरनाईक यांनाही नोटीस बजावून ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, आपण परदेशातून आल्याने आठ दिवस आपल्याला सक्तीने क्वारंटाईन राहावं लागत आहे. शिवाय विहंगची पत्नीही आजारी आहे. त्यामुळे मला चौकशीला उपस्थित राहता येणार नाही, असं सरनाईक यांनी ईडीला कळवलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण?

ईडीने मंगळवारी सरनाईक यांच्या घर, कार्यालय आणि हॉटेलसह 10 ठिकाणांवर छापे मारले होते. त्यावेळी प्रताप सरनाईक भारताबाहेर होते. मात्र, ईडीचे छापे पडल्याचं कळताच ते मुंबईत परतले आणि त्यांनी तडक प्रभादेवीतील ‘सामना’ कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. तब्बल दीड तास या दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर बोलताना ईडीने कारवाई का केली? कशासाठी केली? याची काहीच कल्पना नसल्याचं सरनाईक यांनी सांगितलं होतं.

सोमय्यांचा चिमटा

“प्रताप सरनाईक हे क्वारंटाईन असतील तर ते काल दिवसभरात कुणा कुणाला भेटले त्यांची नावं जाहीर करावीत आणि शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत यांच्यासह सरनाईक ज्यांना ज्यांना भेटले त्यांनाही क्वारंटाईन करण्यात यावं. महापालिका आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन या लोकांना क्वारंटाईन करावं. त्यांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे” असा टोला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी लगावला होता. यावेळी त्यांनी शिवसेना कोव्हिडला घाबरतेय की ईडीला असा चिमटाही काढला. (ED Summons Shivsena MLA Pratap Sarnaik to appear after quarantine period)

संबंधित बातम्या :

प्रताप सरनाईकांचे व्यावसायिक भागीदार अमित चांदोळेंना अटक, ईडीकडून सलग 12 तास चौकशी

क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा; प्रताप सरनाईक यांची ईडीला विनंती

(ED Summons Shivsena MLA Pratap Sarnaik to appear after quarantine period)