
मध्य प्रदेशातील छींदवाडा येथील बालकांच्या मृत्यूने देशभरात दहशत पसरली आहे. येथे कफसिरप प्यायल्याने अनेक लहानग्यांच्या किडनी फेल होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी आणखीन मुलांचा मृ्त्यू झाल्यानंतर या प्रकरणातील मृत्यूची संख्या आता ११ झाली आहे. त्यानंतर राज्य सरकारने कारवाई सुरु केली आहे. या कफसिरपची तपासणी लॅबोरेटरीत करण्यात आली आहे. त्यात प्रतिबंधित विषारी घटक आढळल्यानंतर मध्य प्रदेश सरकारने त्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. हे औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरालाही अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील छींदवाडा भागात मुलांना कफसिरप दिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणात डॉ. प्रवीण सोनी यांना छींदवाडा येथील परासिया येथून अटक केली आहे. डॉ.प्रवीण सोनी परासियातील नामवंत बालरोग तज्ज्ञ आहेत. सर्दी तापाने त्रस्त मुलांना त्यांनी कोल्ड्रीफ कफ सिरप देण्याचा सल्ला दिला होता. या कफ सिरपचे सेवन केल्यानंतर अनेक मुले गंभीर आजारी बनली. त्यांची लघवी बंद झाली आणि त्यानंतर त्यांचा किडनी फेल होऊन मृत्यू झाल्याने खळबळ उडाली.
मध्यप्रदेश सरकारला तामिळनाडू औषध नियंत्र विभागाने शनिवारी या संदर्भात तपासणी अहवाल पाठवला आहे. या अहवालात सांगितले आहे की जे सँपल पाठवले होते त्यात भेसळ झालेली होती. या सिरपमध्ये 48.6 टक्के डायएथिलीन ग्लायकॉल आढळले. एंटी-फ्रीज आणि ब्रेक फ्लूईड्समध्ये वापरले जाणार डीईजी पोटात गेल्यानंतर किडनी फेल होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते.
मध्य प्रदेश सरकारने तामिळनाडूत कोल्ड्रीफ कफ सिरफ बनवणाऱ्या श्रीशन फार्मास्युटिकल कंपनीवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने सर्व औषध निरीक्षकांना या कफ सिरपचा संपूर्ण स्टॉक जप्त करण्याचे आदेश दिले आहे. तसेच पुढील विक्रीवर बंदी आणि तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशचे सीएम मोहन यादव यांनी या प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या पालकांच्या दु:खात आपण सहभागी आहोत असे सोशल मिडियावर लिहीले आहे. शनिवारी मृत नातेवाईकांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही यादव यांनी केली आहे. ज्या मुलांवर उपचार सुरु आहेत त्यांचा खर्च सरकारने उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मध्य प्रदेश आणि राजस्थानात कफ सिरपने मृ्त्यू झाल्यानंतर अनेक राज्यांनी या कफ सिरपच्या चौकशीचे आदेश जारी केले आहेत. आणि सर्व प्रकारच्या खबरदारीचे आदेश जारी झाले आहेत. केंद्रीय औषध नियंत्रण संघटनेने आता पर्यंत सहा राज्यात औषध निर्माण करणाऱ्या कंपन्यांची चौकशी सुरु केली आहे.
राज्य सरकारने कफ सिरप, तापाचे औषधे, एंटीबायोटिक बनवणाऱ्या कंपन्या यांची तपासणी सुरु केली आहे. या सर्व औषधांचे नमूने केंद्रीय औषध नियंत्रण संघटनेने जेथे मृत्यू झाला आहे तेथून जमा केले आहेत.
मध्य प्रदेशातील छींदवाडात ऑगस्टच्या अखेरपासून सर्वात आधी मृत्यूच्या केस समोर आल्या होत्या. बहुतांश मुलांचा मृत्यू किडनी फेल झाल्याने झाला आहे. मुलांमध्ये सुरुवातीला सर्दी आणि तापाची लक्षणे दिसत होती. त्यानंतर त्यांनी कफ सिपर आणि नियमित औषधांसह एक नियमित उपचार केला गेला. त्यानंतर त्या मुलांची तब्येत अचानक बिघडली. त्यानंतर किडनी फेल झाल्याने त्यांचा मृ्त्यू झाला.