70 लाख कॅश, 48 घड्याळं, ADM रवींद्र कुमार यांच्या घरावरील छाप्यात हाती लागलं घबाड, नोटांची बंडलं अजून…
ADM Ravindra Kumar House Raid: अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर दक्षता तपास पथकाने धाड घातली असता घबाड हाती लागले. 70 लाख कॅश, 48 घड्याळं आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. नोटांची बंडलांची मोजणी सुरूच होती. यामुळे एडीएमच्या बेहिशोबी मालमत्ता वाढण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या घरावर दक्षता तपास पथकाने (Vigilance Investigation Bureau) धाड घातली. या छाप्यात मोठे घबाड हाती लागले आहे. या धडक कारवाईत अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र कुमार दिवाकर यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाला. रवींद्र कुमार दिवाकर हे पाटण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत. त्यांची पत्नी आणि डानरपूरच्या दुय्यम निबंधक कुमारी स्वीटी यांच्या विविध ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. त्यात कोट्यवधींची बेहिशोबी संपत्ती आणि नोटांचा डोंगर तपास यंत्रणेच्या हाती लागला.
धाडीत सापडले मोठे घबाड
तपास पथकाने पाटणा, बेगुसराय येथील विविध ठिकाणांवर एकाच वेळी छापा मारला. या कारवाईत पाटण्यातून 70 लाख रुपये तर बेगुसरायमधून 9 लाख रुपये असे एकूण 79 लाखांपेक्षा अधिकची रोकड जप्त करण्यात आली. रोख रक्कमच इतकी होती की नोटांची मोजदाद करण्यासाठी मशिन्स मागवण्यात आल्या. घराच्या झडतीत जवळापस 6 लाखांच्या 48 महागडी घड्याळं, लाखो रुपयांची दागिने आणि बेहिशोबी मालमत्तांची कागदपत्रं पथकाच्या हाती लागली.
मिळकतीपेक्षा अधिक उत्पन्न
प्राथमिक तपासात रवींद्र कुमार दिवाकर यांच्याकडे मिळकतीपेक्षा अधिकची रक्कम आढळली. त्यांच्या उत्पन्नापेक्षा 1 कोटी 6 लाख 85 हजार 900 रुपयांची संपत्ती अधिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर इतर ठिकाणच्या मालमत्ता आणि वस्तूंची मोजदाद सुरू आहे. याप्रकरणी अगोदरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या वॉरंटनंतर ही कारवाई करण्यात आली हे विशेष. प्रशासकीय सेवेत रवींद्र कुमार यांनी विविध पदावर काम केले आहे. त्यांच्या संपत्तीचा हा मनोरा पाहून तपास यंत्रणाही चक्रावून गेली. कागदपत्रांच्या छाननीनंतर संपत्तीचा आकडा अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे.
केव्हा कोणत्या पदावर रवींद्र दिवाकर?
रवींद्र कुमार दिवाकर हे ऑक्टोबर 2025 पासून अतिरिक्त जिल्हाधिकारी (पुरवठा) पाटणा येथे कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी 2024 मध्ये एडीसी म्हणून पाटणा येथे काम पाहिले. 2023 मध्ये ते एडीएस पदावर होते. यापूर्वी त्यांनी समस्तीपूर, सहरसा, दरभंगा , कटिहार, सारण येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून विविध पदावर काम केले आहे. विशेष म्हणजे ते अगोदर शिक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर प्रशासकीय सेवेत दाखल झाले.
