Aaditya Thackeray : शरद पवारांकडून एकनाथ शिंदेंच कौतुक, आदित्य ठाकरे म्हणाले, ‘कोणी कोणाचं…’
Aaditya Thackeray : "राज्यात निवडणूक आयोगाचं बहुमताचं सरकार आहे. या तिन्ही पक्षांनी फोडाफोडीच्या पुढे जाऊन, ज्यांना घ्यायचं आहे ते घ्या. ज्यांच्यावर डाग असेल त्यांना घ्या. पण जनतेच्या प्रश्नावर काही काम करणार का? राज्यात वाद काय, तर मुख्यमंत्री कोण होणार? पालकमंत्री कोण होणार? विस्तार कधी होणार? असे वाद सुरू होते. जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते, दिले का? लाडक्या भावाचे 10 हजार दिले का?" असे प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारले.

ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज दिल्लीमध्ये आहेत. काल रात्री त्यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. आज दिल्लीत आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी उपस्थित होत्या. यावेळी पत्रकारांनी आदित्य ठाकरे यांना शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं, त्या बद्दल विचारलं. त्यावर “कोणी कोणाचं कौतुक करावं हा त्यांचा विषय आहे. राऊत साहेबांनी काल यावर उत्तर दिलय. एकनाथ शिंदे यांनी आमच्याबरोबरच नाही, महाराष्ट्राबरोबर गद्दारी केली. अनेक लोक पक्ष फोडतात, पण राग या गोष्टीचा आहे की, एकनाथ शिंदे यांनी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडण्याच पाप केलं. त्यांनी दिलेल नाव, चिन्ह चोरण्याचं पाप केलं. त्यापुढे जाऊन एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी आणण्यासाठी आम्ही जे करार केले होते, ते सगळे प्रकल्प दुसऱ्या राज्यात पाठवण्याच पाप एकनाथ शिंदे यांनी केलं” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमाला खासदार संजय दीना पाटील उपस्थित होते, असा प्रश्न विचारला, त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले की, “ते उपस्थित असतील, पण ते कोणासाठी गेले होते, शरद पवारांसाठी गेले असतील” त्यांना शरद पवारांना भेटणार का? म्हणून विचारलं. त्यावर ‘आज भेटणार नाही’ असं उत्तर दिलं.
“महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकीत एक साम्य आहे. जे कोणी जिंकलं आहे, त्यात आयोगाचा मोठा हात आहे. निवडणूक आयोगाचे आभार मानताना भाजपच्यावतीने आम्ही ही चर्चा करतोय, निवडणुकीत फ्रॉड झालं आहे. ते जगासमोर आणणं गरजेचं आहे. निवडणूक निपक्षपातीपणे होतात का, याचं उत्तर आयोगाने द्यावं” असं आदित्य ठाकरे म्हणाले. “आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील राज्यभरातील नेते भेटत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ही यंत्रणा फ्रि आणि फेयर वाटत नाही” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
‘व्हीव्हीपॅटमधील मतांची पावती खाली पडते का?’
“ईव्हीएमबाबत अनेक पक्षाची वेगळी मते आहेत. आम्ही जिंकलो आणि हरलो तरी आमचं मत ठाम आहे. निवडणुकीत आमचं मत कुठे जातं, ते आयोगाने स्पष्ट करावं. रिकाऊंटही आयोग देत नाही. मॉकपोल घ्या म्हणून सांगितलं जातं. ईव्हीएमबाबत अजून स्पष्टता येणं गरजेचं आहे. व्हीव्हीपॅटमधील मतांची पावती खाली पडते का?. महाराष्ट्रात मतदान कसं वाढलं? हे सांगा. मतदानाच्या शेवटच्या वेळेत टोकन दिलं जातं. मतदारांना किती टोकन दिलं हे आयोगाने सांगा” असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेत.
‘आम्ही त्यांचं कधीच कौतुक करणार नाही’
“जे पळून जात आहेत, ते जय महाराष्ट्र करत नाहीत, जय गुजरात करत जात आहेत. चौकशीला घाबरून जात आहेत. त्यामुळे ते जय महाराष्ट्र म्हणू शकत नाहीत. आम्ही मागच्या महिन्यात शरद पवारांना भेटलो. आम्ही त्यांना नेहमी भेटत असतो. आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो, ते कशासाठी भेटलो ते समोर आहे. आम्ही त्यांचं कौतुक केलं नाही. आम्ही विकासाला दूर करण्यासाठी कौतुक केलं नाही. जे महाराष्ट्राला लुटतात, पक्ष फोडतात, कुटुंब फोडतात आम्ही त्यांचं कधीच कौतुक करणार नाही” असं आदित्य ठाकरे म्हणाले.