एका क्षणात पक्ष फुटला… 7 खासदारांनी तडकाफडकी पक्ष सोडल्यानंतर आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया समोर; या पक्षावर केला गंभीर आरोप
AAP MPs Resign : आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. 7 खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. यानंतर आता पक्षाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

देशाच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. 7 खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला असून पत्रकार परिषदेत भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. राघव चड्ढा यांनी आपल्या सोबत आणखी आठ जणांची नावे जाहीर केली, जे देखील भाजपमध्ये जाणार आहेत. यानंतर आता आम आदमी पार्टीने यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आपने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.
आम आदमी पार्टीची पहिली प्रतिक्रिया
राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडून 7 राज्यसभा खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केल्यानंतर, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या घटनेला भाजपचे ऑपरेशन लोटस आणि अत्यंत घाणेरड्या राजकारणाचा खेळ असल्याचे म्हटले. संजय सिंह म्हणाले की,’आज भाजपने आम आदमी पक्षाचे 7 राज्यसभा खासदार फोडून घाणेरडे राजकारण केले आहे. पंजाबमधील लोक हे कधीही विसरणार नाहीत. पंजाबची जनता यांना कधीच माफ करणार नाही.
ज्या जनतेने मोठे केले त्यांनीच विश्वासघात केला
पुढे बोलताना संजय सिंह यांनी म्हटले की, राघव चड्डा यांना पक्षाने खासदार आणि आमदार बनवले आणि जनतेनेही त्यांना भरभरून पाठिंबा दिला. मात्र, ते आता भाजपसोबत गेले आहेत. संदीप पाठक यांचा उल्लेख सिंह म्हणाले की, पक्षाने त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आणि राज्यसभेत पाठवले. याशिवाय बलबीर सिंह, अशोक मित्तल, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालीवाल आणि हरभजन सिंह यांची नावे घेत संजय सिंह यांनी म्हटले की, या सर्वांना जनतेने मोठे केले, पण आता त्यांनी त्याच जनतेचा विश्वासघात केला आहे.
राघव चड्डा काय म्हणाले?
भाजपसोबत जाण्याची घोषणा करताना राघव चड्डा यांनी म्हटले की, गेल्या एका वर्षांपासून मी पक्षाच्या कार्यक्रमापासून दूर होतो. तुम्ही दूर का राहताय, असे मला विचारले जायचे. मी सर्वकाही सुरळीत होईल, यासाठी वाट पाहात होतो. परंतु आज मी तुम्हाला खरे कारण सांगतो. आम आदमी पार्टीच्या गुन्ह्यांमध्ये मला सामील व्हायचे नव्हते. आमच्याकडे फक्त दोन पर्याय होते. एक तर राजकारण सोडा किंवा आमच्या अनुभवाचा वापर करून काही सकारात्मक राजकारण करावे, हे दोन पर्याय होते. त्यामुळेच आम्ही आम आदमी पार्टीच्या राज्यसभेच्या दोन तृतीयांश खासदारांनी भाजपा पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेण्याचा घेतला आहे.